(स्थापना : १९६२). विक्रम साराभाई अंतराळ केंद्र किंवा विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी; VSSC) हे भारत सरकारच्या अंतराळ विभाग (डिपार्टमेंट ऑफ स्पेस; DOS) अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन; इस्रो; ISRO) चे प्रमुख केंद्र आहे. दूरदर्शी आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
अंतराळ विज्ञान संशोधन आणि ग्रहांच्या शोधाचा पाठपुरावा करताना राष्ट्रीय विकासासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करणे हे या संस्थेचे ध्येय आहे. या संस्थेचे अंतराळ प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी तिरुवनंतपूरम येथे एक प्रमुख केंद्र आहे. हे केंद्र अंतराळ विज्ञान, क्षेपणास्त्र संबंधित धातू, प्रक्षेपण वाहनांच्या विविध यंत्रणा, प्रक्षेपण वाहन एकत्रीकरण, अंतराळ विज्ञानासाठी लागणारी रसायने, प्रणोदन, अंतराळ आयुधे, अंतराळ भौतिकशास्त्र आणि विश्वसनीय प्रणाली या क्षेत्रांत संशोधन आणि विकासका र्यात सक्रिय आहे. हे केंद्र विविध अंतराळ मोहिमांसाठी लागणाऱ्या उपप्रणालींच्या परिपूर्तीसाठीचे आराखडे, उत्पादन, विश्लेषण, सुधारणा आणि चाचण्या यावर संशोधन अशा कळीच्या गोष्टी हाती घेते. या केंद्राद्वारे प्रकल्पांचे नियोजन, मूल्यांकन, तंत्रज्ञान हस्तांतरण, उद्योगांशी सुसंवाद, मानव संसाधन विकास आणि सुरक्षा आदी अनेक गोष्टी यशस्वी रीत्या पार पाडल्या जातात. या केंद्राशी निगडित सर्व नागरी कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि निगराणी हे याच केंद्रामार्फत केले जाते.
व्हीएसएससी या संस्थेची विस्तार केंद्रे वलियमला येथे आहेत. तेथे इस्रोचे द्रवप्रणोदनप्रणाली केंद्र आहे. तेथे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनासाठी (पीएसएलव्ही; पोलार सॅटेलाइट लाँचिंग व्हेईकल; PSLV) द्रवप्रणोदक इंजिनावर संशोधन आणि विकास कार्य चालते. तसेच तेथे प्रक्षेपकाच्या विविध यंत्रणांचे उत्पादन, प्रक्षेपक जोडणी आणि तपासणीच्या सोयी उपलब्ध आहेत.
वाट्टीयरकावू येथे संमिश्र धातू विकसित केले जातात. येथेच इस्त्रोचे जडत्व संहती केंद्र (इनर्शियल सिस्टम्स युनिट; आयआयएसयू; IISU) आहे. इस्रोची प्रक्षेपण वाहने व अंतराळयान मोहिमा यासाठी जडत्व संहती आराखडे येथे विकसित केले जातात. यांत्रिक घूर्णदर्शी (मेकॅनिकल गायरोस्कोप), प्रकाश वाहक तंतूच्या साहाय्याने माहिती मिळवणारे घूर्णदर्शी (ऑप्टिकल गायरोस्कोप), जमिनीपासून ऊंची मोजणारी यंत्रणा, प्रत्येक क्षणाला अग्निबाणाचा जमिनीशी असणारा कोन मोजण्याचे संयंत्र (रेट गायरोसिस्टम) व प्रवेग मापके (ॲक्सिलरेटर) यावर आधारलेली जडत्व दिक्चलन प्रणाली (इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टम) यांसारख्या प्रमुख प्रणाली येथे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केल्या जातात. आयआयएसयू अंतराळयान आणि संबंधित उपयोजनासाठी ॲक्च्युएटर्स यंत्रणादेखील आरेखित आणि विकसित करते.
व्हीएसएससीने नेकोचीजवळ अलूवा येथे अमोनियम परक्लोरेट प्रायोगिक उत्पादन केंद्र उभारलेले आहे. अमोनियम परक्लोरेट रसायनाद्वारा अग्निबाण इंधनास ऑक्सिजन पुरवला जातो. Reusable Launch Vehicle (RLV)
व्हीएसएससी या केंद्राच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहक, पृथ्वीच्या वेगानुसार त्याभोवती फिरत राहणारा उपग्रह प्रक्षेपक वाहक (जीएसएलव्ही; जिओ-सिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेईकल; GSLV) आणि रोहिणी अग्निबाण यांचा समावेश होतो. पृथ्वीच्या वेगानुसार त्याभोवती फिरत राहणारा उपग्रह प्रक्षेपक वाहक जीएसएलव्ही मार्क ३ (GSLV MkIII; LMV3 याही नावाने परिचित; ध्वनीच्या तिप्पट वेगाने जाणारा अग्निबाण), पुन:पुन्हा वापरता येणारा प्रक्षेपक (रियुजेबल लाँच व्हेईकल; RLV), हवा श्वसन प्रणोदन प्रकल्प (एअर ब्रीदिंग प्रॉपल्शन प्रोजेक्ट; अग्निबाण उड्डाणाच्या वेळी वापरण्यात येणारे इंजिन जळालेले इंधनवायू वेगाने हवेमध्ये सोडते, यास एअर ब्रीदिंग प्रॉपल्शन म्हणतात.), याशिवाय मानवी अंतरिक्ष उड्डाण तंत्रज्ञान विकसित करण्याबद्दल येथे संशोधन चालते.
तिरुवनंतपूरमपासून जवळ असलेल्या थुंबा येथे विषुववृत्तीय अग्निबाण प्रक्षेपक स्थानक आहे. त्याची स्थापना २१ नोव्हेंबर १९६३ रोजी झाली. त्याचे संचलन भारतीय अंतराळ संशोधन केंद्राद्वारे केले जाते. थुंबा पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर आहे. यामुळे दोन भाग अग्निबाण (साऊंडिंग रॉकेट) वापरून कमी उंचीवरील वातावरणाचे प्रयोग करणे अधिक सोयीचे ठरते. विषुववृत्ताच्या वरील भागात असलेल्या आयनमंडळाजवळ (आयनोस्फिअर) असणारा एक अरुंद विद्युत चुंबकीय पट्टा एका दिशेने वाहत असतो. याला इलेक्ट्रॉजेट म्हणतात. अग्निबाण यांच्या दिशेने सोडल्यास अग्निबाणाला अधिक वेग लवकर गाठता येतो. यामुळे प्रक्षेपण केंद्र चुंबकीय विषुववृत्ताजवळ असल्यास रॉकेट्सचे प्रक्षेपण करणे सोयीचे ठरते.
व्हीएसएससी या केंद्रामध्ये एक कायम स्वरूपी अंतराळ संग्रहालय (स्पेस म्यूझीयम) आहे. ते एका भव्य चर्चमध्ये आहे. ते १९६० पर्यंत सेंट मेरी मॅग्डालीन चर्च होते. हे ठिकाण भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जन्मस्थान मानले जाते. यामध्ये प्रथमच अग्निबाण प्रणाली एकत्रित करण्यात आली. या इमारतीने इस्रोच्या प्रारंभिक काळात पहिली प्रयोगशाळा आणि मुख्य कार्यालयाची भूमिका निभावल्या होत्या. यामध्ये ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन, त्याचे उष्णता कवच (हीट शील्ड) आणि एएसएलव्ही अग्निबाणाच्या चौथ्या टप्प्यातील घन इंधन इंजिन मोटरीचे पूर्ण आकाराचे नमुने प्रदर्शित केले आहेत. पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, जीएसएलव्ही एमके – ३ आणि एटीव्ही या प्रक्षेपण वाहनांचे लहान आकारातील नमुने अवकाश संग्रहालय परिसरात उभारण्यात आले आहेत. हे अंतराळ संग्रहालय भारतीय अंतराळ कार्यक्रमाचा इतिहास आणि नजीकच्या भविष्य प्रकल्पातील प्रकल्प दर्शविते.
याव्यतिरिक्त, व्हीएसएससी या केंद्रामध्ये गगनयानचा एक भाग म्हणून, मानवी अंतराळ उड्डाणासाठी तंत्रज्ञान घटक विकसित केले जात आहेत. ज्यात ह्युमन रेटेड लाँच व्हेइकल (HRLV), क्रू मॉड्युल स्ट्रक्चर आणि डिलेरेशन सिस्टम यांचा समावेश आहे. तसेच गगनयानच्या क्रू एस्केप सिस्टमसारख्या प्रगत आराखड्याची संकल्पनांची उड्डाण करण्यासाठी चाचणी वाहन विकसित केले जात आहे. छोट्या उपग्रहांसाठी कमी किमतीच्या लाँचरची जागतिक मागणी ओळखून, केंद्र लहान सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (SSLV) च्या विकासाला वेग देत आहे. व्हीएसएससी रॉकेट्री आणि सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल आरेखित आणि विकास करण्यामध्ये अग्रेसर राहण्यास प्रयत्नशील आहे.
कळीचे शब्द : #इस्रो #व्हीएसएससी #अंतराळ #प्रक्षेपण.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा