हिमक्षेत्राच्या विशिष्ट तऱ्हेच्या निक्षेपण कार्याने निर्माण झालेले नागमोडी लाबंट आकाराचे उंचवटे वा डोंगर. एस्कर हा शब्द आयरिश शब्द ‘एइस्किर’पासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘कटक किंवा लांबट उंचवटा, विशेषत: दोन मैदाने किंवा खळग्यांचे पृष्ठभाग वेगळे करणारा एक उंचवटा’ असा होतो. फिनलंड, पूर्व प्रशिया, स्वीडन, उत्तर इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर संयुक्त संस्थाने या ठिकाणी प्रामुख्याने एस्कर आढळतात. एस्करची उंची ३ ते ३० मी. व लांबी ९० मी. ते २–४ किमी. असते. यात निरनिराळ्या ठिकाणी बराच फरक दिसून येतो. एकाच एस्करच्या विभिन्न भागांतही उंची व जाडी वेगवेगळी असू शकते. संयुक्त संस्थानांतील मेन प्रांतात एस्करची लांबी १६० किमी. पर्यंत आढळते. एखाद्या नदीप्रमाणे एस्करच्याही शाखा व उपशाखा असतात. अंदाजे दहा लाख वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या हिमयुगात हिमक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रदेशांवर झालेला दिसतो. हवामानातील बदलांनुसार हिमक्षेत्राच्या विस्तारात बदल होत असे. हिमयुगाच्या अखेरीस बर्फ साठण्यापेक्षा वितळण्याचे प्रमाण वाढू लागले व हिमक्षेत्राची वाटचाल बंद होऊन त्याचे आकसणे चालू झाले. अशा वेळी हिमक्षेत्रांतर्गत हिमनदीच्या तळाशी बोगदे निर्माण होऊन त्यांतून वितळलेल्या बर्फाच्या पाण्याचे प्रवाह वाहू लागतात. अशा तऱ्हेने आतून वाहणाऱ्या प्रवाहांचे एक जाळेच निर्माण होऊन या प्रवाहांनी वाहून आणलेली वाळू व गोटेमिश्रित गाळ या बोगद्यांत साचतो आणि कालांतराने हिमक्षेत्र पूर्ण वितळल्यावर या गाळाचे एस्कर तयार होतात.
हिमनदीच्या प्रक्रियेने बऱ्याचदा रुंद एस्कर्स तयार होतात, ज्यावर रस्ते आणि महामार्ग बांधले जाऊ शकतात. हिमनदीच्या हालचालीमुळे, तसेच घर्षण आणि दाबामुळे बर्फ तळाशी वितळून पाणी तयार होते. त्यामुळे उभ्या कडा असलेली भिंत, तीव्र-कमानदार बोगदे तयार होऊ शकतात. बर्फामध्ये खडक डबरचे संहनन आणि ज्या दराने बर्फ वितळवून गाळ बोगद्यात वितरित केला जातो, त्यामुळे प्रतीवाह वाहतूक होते, ती एस्करमधील गाळाचे प्रमाण ठरवते. गाळात साधारणपणे भरड कणी, जल निर्मित वाळू आणि खडे (रेव) यांचा समावेश असतो. तसेच त्यामध्ये खडकांचा ढिगारा चिकणमातीने समृद्ध असलेल्या ठिकाणी रेवयुक्त चिकणमाती आढळू शकते. हा गाळ स्तरीकृत आणि वर्गीकृत असून त्यात सहसा खडे/गोटे/टोळ या आकाराचे पदार्थ आणि अधूनमधून मोठे धोंडेसुद्धा आढळतात.
वाळू व गोटे यांच्या मिश्रणामुळे एस्करवरील पाण्याचा त्वरित निचरा होतो. याकारणाने त्यांच्या माथ्यावर फारशी झाडी वाढत नाही. काँक्रीट तयार करण्यास व इतर बांधकामास या मिश्रणाचा चांगला उपयोग होतो.
समीक्षक ꞉ शेख मोहम्मद बाबर