बहुवार्षिक झाडांपासून मिळणारे काष्ठ आणि इतर गवत वर्गातील वनस्पतींचे खोड यांत असलेला मुख्य घटक म्हणजे ‘लिग्नोसेल्युलोज’. यामध्ये मुख्यत्वे सेल्युलोज, लिग्निन आणि हेमिसेल्युलोज असते. संपूर्ण जगामध्ये प्रतिवर्षी २००x१०१२ किग्रॅ. एवढे लिग्नोसेल्युलोज तयार होत असते.
सेल्युलोज एकूण शुष्क भागाच्या ४० % इतके असते व ते पेशीभित्तिकेमध्ये साठविलेले असते. हेमिसेल्युलोज मृदू किंवा कठीण काष्ठांमध्ये झायलॅन या स्वरूपाचे असते. तर लिग्निन या पेशीभित्तीकेमधील पदार्थांची रचना खूप गुंतागुंतीची असते. विघटन झालेले लिग्निन तपकिरी रंगाचे असते, तर विघटन न झालेल्या लाकडामध्ये ते रंगहीन असते. या सगळ्या लिग्नोसेल्युलोजचे जैविक विघटन व नवीकरण होत असते. जंगलामध्ये हे महत्त्वाचे काम मृतजीवी आणि पालापाचोळा कुजविणाऱ्या बुरशी प्रभावीपणे करू शकतात. हे जैविक विघटन करण्यासाठी पेशींमधून बाहेर स्रवणारी विकरे महत्त्वाची असतात. विशिष्ट प्रकारच्या म्हणजेच बॅसिडिओमायसिटी या गटातील बुरशीमध्ये ही विकरे तयार होतात. ह्या विकरांमुळे लिग्नोसेल्युलोजवर ज्वलनाची क्रिया होते.
बॅसिडिओमायसिटी या गटामधील बुरशी लाकडामध्ये दोन प्रकारची कूज तयार करतात. एका गटातील बुरशी तपकिरी कूज व दुसऱ्या गटातील बुरशी पांढरी कूज तयार करतात. तसेच ॲस्कोमायसिटी या गटातील बुरशीसुद्धा ही कामगिरी बजावतात.
तपकिरी कूज बुरशी लाकडामध्ये सेल्युलोज व हेमिसेल्युलोज यांचे विघटन करतात. यात लिग्निनाचे विघटन होत नाही, त्यामुळे ह्या कूजीचा रंग तपकिरी दिसतो. ह्या प्रकारची बुरशी सूचिपर्णी जंगलात जास्त आढळून येतात. लाकडाचे स्वरूप तंतुमय राहत नाही, त्यामुळे लाकडाचा टणकपणा कमी होतो. उदा.,सरप्युला लॅक्रिमन, कोनिओफोरा प्युटीना , फायब्रोपोरिया व्हॅलनटाय, फोमिटॉप्सिस पिनीकोला इत्यादी. तपकिरी कूज बुरशीमध्ये पॅरॉक्सिडेज या नावाचे विकर तयार होते.
पांढरी कूज बुरशी ह्या लाकडामधील सर्व घटकांचे विघटन करतात; परंतु सेल्युलोज योग्य प्रमाणात शिल्लक राहते, म्हणून ह्या कूजीमुळे लाकूड तंतुमय होते. ९० % पेक्षा जास्त बुरशी ह्या पांढरी कूज तयार करतात. ह्या कूजी आवृतबीजी वनस्पतींवर जास्त प्रमाणात आढळून येतात. उदा., ट्रॅमिटिस व्हर्सिकलर, फेलिनस नायग्रोलिमिटॅटस, फेनेरोकिटी क्रायझोस्पोरीयम, फेलिनस पिनी, प्लुरोट्स ऑस्ट्रियाटस या प्रकारच्या बुरशीमध्ये लॅकेझ नावाचे विकर तयार होते.
तिसरा प्रकार म्हणजे मृदू कूज बुरशी. यामध्ये तयार होणाऱ्या विकरामुळे वनस्पतीमधील सेल्युलोजचे विघटन होते. शिवाय लाकडामध्ये सूक्ष्म पोकळ्या तयार होतात व लाकूड रंगहीन होते. अशा प्रकारच्या बुरशींना विकरे तयार करण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. मृदू कूज तयार करणाऱ्या बुरशी ॲस्कोमायसिटी व ड्यूटेरोमायसिटी या गटांमधील असतात. उदा., कीटोमियम, सेरेटोसिस्टीस इत्यादी.
समीक्षक : बाळ फोंडके