(स्थापना : १९६९). अंतराळक्षेत्रात संशोधन करणारी भारतातील एक महत्त्वपूर्ण संस्था. येथे अंतराळक्षेत्रात पृथ्वीबाह्य अवकाशाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते. यामध्ये वातावरणातील घटकांपासून उपग्रह, ग्रह तसेच अन्य खगोलीय घटकांचा समावेश असतो. हा अभ्यास भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्र या मुलभूत शास्त्र शाखांबरोबरच आंतरविज्ञान तसेच अभियांत्रिकी शाखांच्या माध्यमातूनही केला जातो. अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि त्याचा उपयोग राष्ट्रीय कार्यात करणे हे इस्रो या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. ध्येय पूर्ततेसाठी इस्त्रो पृथ्वी निरीक्षण, संदेशवहन, हवामान व पर्यावरण, दिशादिग्दर्शन, अवकाशविज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन या विषय क्षेत्रांमध्ये कार्य करते. या कार्यासाठी इस्रो अग्निबाण, यान, कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण, नियंत्रण-अवलोकन, संदेशवहन, सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग), उपकरण, माहिती व्यवस्थापन इ. विविध यंत्रणा प्रणालीचा विकास करते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित अंतराळ विभागाच्या अखत्यारीत इस्रोचे कार्य चालते.

स्वतंत्र भारतात अंतराळविषयक वैज्ञानिक उपक्रमांची सुरुवात १९६१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंच्या कारकिर्दीत झाली. त्या दरम्यान डॉ. होमी भाभा अध्यक्ष असलेल्या अणुऊर्जा आयोगाने भारतीय अवकाश संशोधन समितीची स्थापना केली. या समितीने डॉ. विक्रम साराभाईंच्या नेतृत्वाखाली अवकाश कार्यक्रम प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. तसेच त्या अंतर्गत पुढच्याच वर्षी पश्चिम किनारपट्टीवरील केरळ राज्यातील थुंबा या ठिकाणाहून, पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले. या समितीतून पुढे १९६९ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ आकाराला आली.

१९६०-७०च्या दशकात जागतिक राजकारण तसेच देशांतर्गत सामाजिक-आर्थिक विकास साधण्यासाठी भारताला स्वतः चा अंतराळ कार्यक्रम राबवणे भाग पडले. या कालखंडात रशियासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे अंतराळविषयक उपक्रम पार पाडणे सोपे गेले. पुढे इस्रोने वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करत, अंतराळ संशोधनात जगाच्या पटलावर स्वतःचे स्थान निर्माण केले. यामध्ये २०१७ मध्ये एकाच अग्निबाण उड्डाणातून प्रक्षेपित केलेल्या १०४ कृत्रिम उपग्रहांची मोहीम विशेष ठरली आहे.

इस्त्रोच्या अंतर्गत एकूण १५ संस्था तसेच विभाग कार्यरत आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे – (१) मुख्यालय इस्त्रो आणि अवकाश विभाग, बंगळुरू (२) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, त्रिवेंद्रम (३) लिक्विड प्रॉपल्शन सिस्टम्स सेंटर, बंगळुरू (४) सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा (५) यु. आर. राव सॅटेलाईट सेंटर बंगळुरू (६) इस्रो प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स, महेंद्रगिरी (७) स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद (८) नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैद्राबाद (९) इस्रो टेलिमेटरी ट्रॅकिंग अॅण्ड कमांड नेटवर्क, बंगळुरू आणि लखनौ (१०) इस्रो इनर्शियल सिस्टम्स युनिट, त्रिवेंद्रम (११) लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रोऑप्टीक्स सिस्टिम्स, बंगळुरू (१२) डेव्हलपमेंट अॅण्ड एज्युकेशनल कम्युनिकेशन युनिट, अहमदाबाद (१२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग, डेहराडून (१४) मास्टर कन्ट्रोल फॅसिलिटी, हमन आणि भोपाळ (१५) अंतरिक्ष कार्पोरेशन लिमिटेड, बंगळुरू.

इस्रोने भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९७५ मध्ये, तर दुसरा उपग्रह भास्कर १९७९ मध्ये प्रक्षेपित केले. या दोन्ही उपग्रहांचे प्रक्षेपण रशियाकडून केले गेले होते. १९८० नंतर भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण भारतातून होण्यास प्रारंभ झाला. रोहिणी हा श्रीहरीकोटास्थित उड्डाणमंचावरून प्रक्षेपित झालेला पहिला उपग्रह ठरला. या नंतर इस्रोने आर्यभट्ट आणि रोहिणी मालिकेतील आणखी काही उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. उपग्रहांचे संदेशवहन, पृथ्वीनिरीक्षण, दिशादिग्दर्शन, प्रायोगिक आणि शैक्षणिक तसेच अवकाशविज्ञान आणि संशोधन इ. कार्याच्या अनुषंगाने वर्गीकरण केले जाते.

संदेशवहन प्रकारच्या उपग्रहाचा उपयोग आकाशवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी, आंतरजाल (इंटरनेट : वैश्विक पातळीवर संगणक प्रणाली, एकमेकांशी जोडणारी यंत्रणा) तसेच संरक्षण या विषय क्षेत्रांच्या संदेशवहनासाठी केला जातो. पृथ्वीनिरीक्षण करणाऱ्या उपग्रहांचा उपयोग कृषीविषयक पाहणी, जलस्रोत अभ्यास, शहर नियोजन, ग्रामीण विकास, खनिज संशोधन, सागर अवलोकन, तसेच वन, पर्यावरण आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी केला जातो. अवकाशविज्ञान आणि संशोधन कार्यातील उपग्रह खगोलशास्त्र, खगोलभौतिकी, वातावरण तसेच पर्यावरणविज्ञान, पृथ्वीविज्ञान या विषयक्षेत्रातील संशोधनाशी निगडीत प्रयोग प्रात्यक्षिकांसाठी उपयोगात येतात. इस्रोने २०२२ पर्यंत इन्सॅट (INSAT) तसेच जीसॅट (GSAT) असे ४४ संदेशवहन उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.

इस्रोने पृथ्वीनिरीक्षण कार्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (आयआयआरएस) या उपग्रह मालिकेची सुरुवात १९७९ मध्ये प्रक्षेपित केलेल्या भास्कर उपग्रहापासून केलेली आहे. पृथ्वीनिरीक्षण कार्याशी संबंधित उपग्रह मालिका विविध प्रकारचे अद्ययावत बदल करत कार्यरत आहे. तसेच या कार्यासाठी २०२२ पर्यंत एकूण ४१ उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत. या उपग्रह मालिकांमधील मेघ ट्रॉपिक्स, स्कॅटसॅट १ आणि कार्टोसॅट या उपग्रहांबरोबर इस्रोने विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ५ उपग्रहांचेही प्रक्षेपण केलेले आहे. अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित नवनवीन प्रयोग, प्रात्यक्षिके, चाचण्या करण्यासाठी इस्रोने काही खास वैज्ञानिक प्रयोगांशी संबंधीत अशा ९ उपग्रहांचेही प्रक्षेपण केलेले आहे.

उपग्रहांच्या वापरातून पृथ्वीतलावरील स्थाननिश्चिती आणि त्या अनुषंगाने दिशादिग्दर्शन (नॅव्हीगेशन) ही संकल्पना विविध प्रकारच्या निरीक्षणांसाठी आवश्यक ठरत असून हे उदयास येत असलेले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. इस्रोने दिशादिग्दर्शन कार्यासाठी इंडियन रिजनल नॅव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टम (आयआरएनएसएस; IRNSS) ही ९ उपग्रहांची मालिका २०१३ पासून राबवली आहे. इस्त्रो आणि भारताच्या विमानतळ प्राधिकरणाच्या सहयोगातून देशाची स्वतंत्र दिशादिग्दर्शन प्रणाली स्थापित होत आहे. यातून देशाची स्वतंत्र वैश्विक स्थान निश्चिती यंत्रणा (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम; जीपीएस) उभारण्यासाठी जीपीएस अॅडेड जिओ ऑगमेंटेड नॅव्हीगेशन (गगन) नामक प्रकल्प राबवला जात आहे. स्वतःची जीपीएस प्रणाली असलेला भारत जगातील पाचवा देश ठरला आहे.

इस्रोने अवकाशविज्ञान आणि संशोधन कार्याशी संबंधित ७ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. तसेच या उपग्रहांच्या यादीत ॲस्ट्रोसॅटचे महत्त्व वेगळे आहे. अवकाशीय खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेच्या प्रकारात समाविष्ट असलेला भारताचा हा पहिलाच उपग्रह आहे. खगोलीय निरीक्षणांसंदर्भात दृष्यीय अतिनील आणि क्ष-किरणांच्या वर्णपटांमध्ये निरीक्षण करू शकतील अशी पाच उपकरणे या उपग्रहाशी जोडलेली आहेत. ही उपकरणे इस्रोबरोबरच रामन संशोधन संस्थ बंगळुरू, भारतीय खगोलभौतिकी संस्था बंगळुरू, भौतिकीय संशोधन प्रयोगशाळा अहमदाबाद, टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई आणि आंतरविद्यापिठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र; आयुका पुणे या संस्थांनी निर्माण केली आहेत. ॲस्ट्रोसॅटच्या निमित्ताने अवकाशामध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा असलेला भारत जगातील पाचवा देश ठरला आहे. ऑरबिट

उपग्रहांच्या अनुषंगाने वातावरणात त्यांच्या फिरण्याच्या किंवा स्थिर राहण्याच्या कक्षा (ऑर्बिट) हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यासंदर्भात (१) निम्नस्तरीय कक्षा [पृथ्वीच्या वातावरणान (१५० ते २,००० किमी. उंचीदरम्यान असलेली कक्षा)] (२) मध्यमस्तरीय कक्षा [पृथ्वीच्या वातावरणात २,००० ते ३५,७८६ किमी. उंचीदरम्यान असलेली कक्षा)] आणि (3) उच्चस्तरीय कक्षा [पृथ्वीच्या वातावरणात ३५,७८६ किमी.पासून पुढील उंचीवरस्थान असलेली कक्षा)]; विषुववृत्तीय प्रतलाच्या संदर्भाने विषुववृत्तीय कक्षेत पृथ्वीच्या फिरण्याबरोबर उपग्रहाचाही असलेला मार्ग म्हणजेच भूस्थिर (जिओ-स्टेशनरी) कक्षा, विषुववृत्तीय कक्षेत मात्र समांतर नसलेला, लंबवर्तुळाकार पद्धतीत तसेच पृथ्वीच्या परिवलन वेळेशी सुसंगतपणा राखत पृथ्वीबरोबर फिरण्याचा मार्ग म्हणजे भूसमकालिक (जिओसिंक्रोनस) कक्षा, पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या संदर्भाने दोन्ही ध्रुवांदरम्यान फिरण्याचा मार्ग म्हणजे ध्रुवीय (पोलर) कक्षा, ध्रुवीय कक्षा प्रकारात प्रत्येक फेरीत उपग्रह नेहमी सूर्याच्या दिशेने राहील असा मार्ग सूर्यसमकालिक (सनसिंक्रोनस) कला, या विविध कलांचा अंतर्भाव आहे. या विविध कक्षापर्यंत उपग्रह वाहून नेण्यासाठी तसेच कक्षांदरम्यान उपग्रह स्थापित करण्यासाठी किंवा भ्रमणकक्षेत मार्गस्थ करण्यासाठी इस्रोने वैविध्यपूर्ण अग्निबाण प्रणाली विकसित करत उड्डाण वाहनांचा (लॉन्च व्हेइकल) विकास केलेला आहे. या संदर्भात इस्रोने सन १९६५ मध्ये हवामानाचा वेध घेणारी अग्निबाण (साउंडिंग रॉकेट) प्रणाली निर्माण करण्यापासून सुरुवात केली होती. ही अग्निबाण प्रणाली १०किग्रॅ. वजन वातावरणात ८० किमी.उंचीपर्यंत वाहून नेणारी होती.

पुढे १९७९ पासून उपग्रह उड्डाण वाहन मालिकेत सॅटेलाईट लाँच व्हेइकल (एसएलव्हीचा) विकास करण्यात आला. एमएलटीनंतर १९८७ मध्ये विस्तारित उपग्रह उड्डाण वाहन (ऑगमेंटेड सॅटेलाईट लाँच व्हेइकल- एएसएलव्ही) मालिका निर्माण केली गेली. या उपग्रह उड्डाण वाहनासाठी पाच चरणांनी युक्त असलेली अग्निबाण यंत्रणा वापरण्यात आली होती. हे उड्डाण वाहन १५० किग्रॅ. वजन वातावरणात ४०० किमी. उंचीपर्यंत वाहून नेणारे होते. एसएलव्ही आणि एएसएलव्ही मालिकेत प्रत्येकी ४ प्रकारच्या अग्निबाण प्रणालींची निर्मिती झाली.

ध्रुवीय कक्षेसंदर्भात इस्रोने सन १९९३ पासून ध्रुवीय उपग्रह उड्डाण वाहन मालिकेचा (पोलर सॅटेलाईट लाँच व्हेइकल; पीएसएलव्ही) विकास केला. मुख्यत्वे ध्रुवीय तसेच भूसमकालिक आणि सूर्यसमकालीक कक्षांमध्ये उपग्रह स्थापित किंवा मार्गस्थ करण्यासाठी पीएसएलव्हीचा वापर केला जातो. या अवकाश वाहनांच्या वापरातून ३,००० किग्रॅ. पेक्षा जास्त वजन वाहून नेणे सहज शक्य झाले. पीएसएलव्ही मालिकेत ४२ अग्निबाण प्रणालींची निर्मिती झाली, तर या अग्निबाणांच्या मदतीने ४४ अवकाश उड्डाणे साध्य करण्यात आली.

इस्त्रोने भूसमकालिक कक्षांसाठीही उपग्रह उड्डाण वाहन मालिकेचा (जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेइकल; जीएसएलव्ही) विकास केला आहे. या मालिकेत १२ अग्निबाण प्रणालींची निर्मिती झाली आणि तेवढीच अवकाश उड्डाणे साध्य करण्यात आली आहेत. उपग्रहांबाबतच्या वर्तुळाकार आणि दीर्घ वर्तुळाकार कक्षांच्या स्थानांतरासंदर्भात जीएसएलव्ही मालिकेत अद्ययावत अग्निबाण प्रणाली (जीएसएलव्ही-३) विकसित करण्यात आली आहे. या अग्निबाण प्रणालीच्या मदतीने १०,००० किग्रॅ.पेक्षाही जास्त वजन वाहून नेता येते. इस्रोने २०१६ मध्ये पुनर्वापर करता येईल अशा उड्डाण वाहनांच्या (रियुजेबल लाँच व्हेइकल) अनुषंगाने अग्निबाण प्रणालीचा विकास केला असून संबंधित तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली आहे. तसेच वातावरणातील पुनर्प्रवेश करू शकेल, अशा यानाशी जोडल्या जाणाऱ्या खास कोशाच्या (कॅप्सूल) प्रारूपाची निर्मिती केली आहे. याच बरोबर इस्रोने श्राव्य लहरींच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने प्रवास करू शकतील स्वनातीत (अल्ट्रासॉनिक) वेगाच्या अग्निबाण प्रणालीचा विकास केला आहे.

अद्ययावत अग्निबाण प्रणालीच्या अनुषंगाने इस्रोने आजवर स्वतःच्या १०० पेक्षाही जास्त उपग्रहांबरोबरच अन्य २३ देशांचे २०९ उपग्रह वातावरणातील विविध थरांमध्ये यशस्वी रीत्या स्थापित करत भारताची ओळख यानांचा ताफा असलेला देश अशी केली आहे. पृथ्वीबाह्य अवकाश संशोधनात इस्रोने २००८ पासून प्रारंभ केला आहे. या संदर्भात चांद्रयान-१ ही पहिली मोहीम ठरली. दि. २२ ऑक्टोबर २००८ रोजी या चांद्रयान अवकाशयानाने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केले. मानवरहीत असलेल्या या यानात चंद्राला प्रदक्षिणा घालणारा आणि चांद्रभूमीवर आदळणारा असे दोन भाग होत. २२ दिवसानंतर या यानाचा अन्वेषक (प्रोब) भाग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आदळला. चांद्रयानाच्या निमित्ताने स्वतंत्रपणे चांद्रमोहिम राबवणारा भारत चौथा देश ठरला आहे. भारताआधी रशिया, अमेरिका आणि जपान या देशांनी चांद्र मोहिमा राबवल्या आहेत.

चांद्रयानाशी जोडलेल्या यंत्रणांमध्ये भूप्रदेशांच्या उंचसखलपणाचे छायाचित्रांच्या माध्यमातून निरीक्षण करणारी प्रणाली, खनिजजन्य भूपृष्ठाचे निरीक्षण करण्यासाठी उच्चवर्णपटीय शिक्षण करणारे साधन, लेसर किरणांच्या माध्यमातून भूस्वरूपाचे मोजमाप करणारे उपकरण, क्ष-किरणांच्या माध्यमातून चंद्राच्या जमिनीवरील किरणोत्सारी कणांचा अभ्यास करणारी साधने आहे.

दक्षिण ध्रुवावर आदळलेल्या अन्वेषक भागाने चांद्रभूमीवर उतरताना दृष्यीय वर्णपटात चित्रण केले. याचबरोबर वातावरणाची उंची आणि दाबाचे मोजमाप करत, तसेच घनतेचे विश्लेषण करणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून चांद्रभूमीवर पाण्याचे अस्तित्व असल्याचे संकेत पाठवले. चांद्रयान मोहिमेत इस्रोबरोबरच नासा, यूरोपियन स्पेस एजन्सी (एसा) या संस्थांचे तसेच इंग्लंड, बल्गेरिया, पोलंड येथील वैज्ञानिक संस्थांची चांद्रविषयक अभ्यास करणारी उपकरणे होती.

इस्त्रोने २०१३ मध्ये मंगळ ग्रहाबाबतची कक्षीय भ्रमण मोहिम (मार्स ऑर्ब‍िटर मिशन) अर्थात, मंगळयान मोहिम राबवली आहे. दि. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केलेले मंगळयान २५ दिवसांच्या पृथ्वीभोवतालच्या भ्रमणानंतर मंगळाच्या दिशेकडे झेपावले. यानंतर सुमारे १० महिन्यांच्या कालावधीनंतर दि. २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश करत स्थिरावले. मंगळाभोवती ४२२ ते ७७,००० किमी. लंबवर्तृळाकार कक्षेत भ्रमण करत मंगळावरील भूरचनेचा, भूगर्भाचा तसेच वातावरणाचा अभ्यास या मोहिमेद्वारे केला गेला.

हा अभ्यास करण्यासाठी मंगळयानात आल्फा कणांचे मापन करणारे साधन, मिथेन वायूचा संवेदक, औष्णिक अवरक्त किरण वर्णपट विश्लेषक, बाह्यावरणातील कणांची रचना तपासणारे उपकरण आणि रंगीत छायाचित्रण करणारी प्रणाली आहेत. वैज्ञानिक प्रयोगांबरोबरच पृथ्वीबाह्य ग्रहांच्या मोहिमांसंदर्भात अद्ययावत तंत्रज्ञानाची तपासणी करण्याच्या दृष्टीकोनातून दिशादिग्दर्शन यानाशी संबंधित संदेशवहन आणि संगणकीय प्रणाली इ.  संदर्भात या मोहिमेत काही प्रयोग-प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. मंगळाच्या कक्षेत स्थिरावल्यानंतर पुढे सु. ६ महिने या यानाकडून कार्य होणे अपेक्षित असताना मंगळयान २०१८ पर्यंत कार्यरत राहिले आहे. अपेक्षपेक्षाही जास्त यशस्वी झालेल्या पहिल्या मंगळयान मोहिमेनंतर इस्रोने २०२१-२२ दरम्यान मंगळयान-२ मोहिमची आखणी केली आहे.

चांद्रयान-१ नंतर २०१९ मध्ये चांद्रयान-२ मोहीम राबण्यात आली. या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या कक्षेत भ्रमण करणारा उपग्रह (ऑर्बिटर) तसेच चांद्रभूमीवर उतरणारे यान (लॅण्डर) आणि या यानातून बाहेर पडत स्वयंचलीत पद्धतीने तिथल्या पृष्ठभागावर चालणारे छोटे वाहन (रोव्हर) असा समावेश होता. तथापि, या मोहिमेतील लॅण्डर आणि रोव्हर प्रकारात अपयश आले. मात्र ऑर्बिटर यशस्वी ठरले.

चांद्रयान व मंगळयान मोहिमांबरोबरच इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठीही ‘आदित्य’ नावाने एक सूर्यमोहिम आखली आहे. या मोहिमेत सूर्याच्या दिशेने सु. १५ लाख किमी. अंतरापुढील सूर्यकेंद्री कक्षेत अवकाशयान पाठवून सूर्य किरणांमधील अतिनील वर्ण, सौर कण, सौर किरीट, सौर वात आणि चुंबकीय वातावरण इत्यादींचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी सौर किरीट वर्णप टविश्लेषक, अतिनील किरणांची दुर्बीण, चुंबकीय प्रभाव मापक तसेच क्ष-किरणांचे विश्लेषक आणि प्लाझ्मा कणांचा विश्लेषक अशा उपकरण प्रणाली वापरून संशोधन केले जाणार आहे.

इस्रोकडून भविष्यात पुढील चांद्रयान तसेच मंगळयान मोहिमांबरोबरच पृथ्वीबाह्यग्रहांच्या मोहिमांसंदर्भात शुक्र आणि गुरू या ग्रहांसंदर्भातील मोहिमा तसेच समानव अवकाश आणि अवकाश स्थानक मोहिमांची आखणी केली जात आहे.

कार्यक्षेत्रा संदर्भात इस्रोने तुमचे शिक्षण-विषयक्षेत्र सांगा आणि इस्रोची ठिकाणे निवडा, तुमच्या पुढ्यात संधी हजर होतील, अशी सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. इस्रोच्या त्रिवेंद्रम येथे भारतीय अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था असून या संस्थेत हवाई अभियांत्रिकी, उड्डाणशास्त्र, भौतिक, रसायन, पृथ्वी व अवकाशविज्ञान, गणित आणि मानवता या विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण-संशोधनाच्या संधी उपलब्ध असतात.

कळीचे शब्द : #संदेशवहन #हवामान व पर्यावरण #दिशादिग्दर्शन #अवकाशविज्ञान #आपत्ती व्यवस्थापन #इस्रो #अग्निबाण #यान #कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण #सुदूर संवेदन #रिमोट सेन्सिंग

संदर्भ :

समीक्षक : अ.पां. देशपांडे