झाकी, शेरिफ : ( २४ नोव्हेंबर १९५५ — २१ नोव्हेंबर २०२१). अमेरिकन रोगनिदानशास्त्रज्ञ. ते सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) येथील संक्रामण रोगाच्या रोगनिदान शाखेचे (विकृतिशास्त्र) प्रमुख होते. त्यांना रोग शोधक यानावानेही ओळखले जाते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ईबोला विषाणूचा उद्रेक, झिका विषाणूचा उद्रेक, २००१ अँथ्रक्स प्रादुर्भाव, निपाह विषाणू, लेप्टोस्पायरोसिस, कोविड-१९ यांवर संशोधन केले आहे.
झाकी यांचा जन्म ॲलेक्झांड्रिया (ईजिप्त) येथे झाला. ॲलेक्झांड्रिया विद्यापीठामधून त्यांनी वैद्यकशास्त्राची पदवी घेतली (१९७८). रोग निदानाबाबत त्यांना विलक्षण आवड होती. त्यामुळे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलायना ॲट चॅपेल हिल येथे पीएच.डी. करण्याकरिता शिष्यवृत्ती मिळविली. त्यांना लहानपणापासून रहस्यकथा वाचण्याची आवड होती. रोगनिदानशास्त्रात रोगाचा उगम कुठे झाला, त्याची यंत्रणा काय आहे, इत्यादींचा शोध घेणे एक कोडे सोडवण्यासारखेच मनोरंजक आहे असे त्यांना वाटत असे. ईजिप्तमध्ये शवविच्छेदनास परवानगी नसल्याने रोगनिदानशास्त्राचा पाठपुरावा करणे कठीण होते. प्रायोगिक रोगनिदानशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एमोरी विद्यापीठ येथे पीएच.डी. साठी प्रवेश घेतला. तेथे शिकत असतानाच सीडीसी या संस्थेने त्यांना नियुक्ती दिली (१९८८). सीडीसी या संस्थेमध्ये येण्यापूर्वी त्यांनी संसर्गजन्य रोग विभागामध्ये रोगनिदानशास्त्राच्या कामाची तरतूद नव्हती.
झाकीमध्ये पेशींमधील संसर्गजन्य जीव ओळखण्याची क्षमता होती. त्यांनी जन्मानंतर गूढ आजाराने मृत्यू झालेल्या ब्राझिलीयन नवजात बालकांच्या मेंदूमध्ये झिका विषाणू शोधून काढला. दहशतवादी हल्ल्यानंतर दहशत फैलावण्यासाठी पाकिटांमधून पाठवलेल्या पदार्थामध्ये अँथ्रॅक्सचे जीवाणू असल्याचे त्यांनी शोधून काढले. तसेच निकाराग्वामध्ये लेप्टोस्पायरोसिस आजार त्यांनी शोधला. कोव्हिड-१९ या सार्वत्रिक आजाराच्या लाटेमध्ये झाकी यांनी SARS-CoV-२ या विषाणूमुळे होणारे मृत्यू आणि त्या विषाणूचा गर्भधारणेवरील परिणाम यांवर संशोधन केले. सीडीसी या संस्थेने जगाच्या विविध भागामधील अनेक वैद्यकीय रहस्ये उलगडली आहेत. अवयव प्रत्यारोपण झालेल्या चार पैकी तीन रुग्ण मृत्युमुखी पडले. ऱ्होड आयलंड आणि मॅसॅचूसेट्सचा आरोग्य विभाग याचे कारण शोधून काढू शकले नाहीत. झाकी आणि त्यांच्या चमूने हा लिंफोसायटीक कोरियोमेनिंजायटिस आहे, असे शोधून काढले. हा विषाणू उंदरांमध्ये असतो आणि माणसांमध्ये क्वचितच हा आजार आढळतो. येथे अवयव दान करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीकडे एक हॅमस्टर होता. झाकींच्या रहस्य शोधून काढण्याच्या स्वभावामुळे याचा शोध लागला.
झाकींच्या कारकिर्दीत रोगनिदानस्त्रातील संशोधनामुळे सीडीसी या संस्थेला सार्वजनिक आरोग्यासाठी हितकारक पावले उचलणे शक्य झाले. रुग्ण तपासणी कार्याव्यतिरिक्त त्यांनी स्वतःला तरुण शास्त्रज्ञांचे शिक्षण आणि मार्गदर्शन या कामाला वाहून घेतले होते. या कामासाठी ते आफ्रिका, दक्षिण अमेरिका या देशांतही फिरत असत. त्यांचे ४०० वैज्ञानिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आणि त्यांचा एच-गुणांक १०२ इतका होता (नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांना कमीत कमी ३५ – ७० एच गुणांक असावा लागतो). झाकींच्या योगदानाकरिता त्यांच्या विभागाचा हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेस सेक्रेटरीस ॲवॉर्ड हा अत्युच्च सन्मान सलग नऊ वेळा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
झाकी यांचे ॲटलांटा (जॉर्जिया) येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #रोगनिदानशास्त्रज्ञ #झिका #विषाणू
संदर्भ :
समीक्षक : अनिल गांधी