सांगवान, वीरेन्दर सिंग : (२२ ऑगस्ट १९६४). भारतीय नेत्रशल्यचिकित्सक. ते डॉ. पॉल डुबॉर्ड चेअर प्राध्यापक आणि एल.व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट, हैदराबाद या संस्थेचे संचालक आहेत. डोळ्यातील पारपटल आणि श्वेतपटल यांदरम्यान असणाऱ्या किनार (लिंबस) यांतील लिंबल स्टेम सेलवरील संशोधनासाठी ते ओळखले जातात. भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कारापैकी वैद्यकीय विज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना २००६ मध्ये शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सांगवान यांचा जन्म हरयाणातील भिवानी जिल्ह्यात झाला. महर्षी दयानंद विद्यापीठामधून त्यांनी वैद्यक शाखेतील पदवी मिळवली (१९८६). नंतर ते नेत्रशल्यशास्त्रात एम.एस. झाले (१९९१). त्यानंतर ते एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये पारपटल आणि डोळ्याच्या पुढील भागाच्या शस्त्रक्रियांमध्ये अधिछात्रशिष्यवृत्ती घेऊन कार्यरत राहिले. पुढे त्यांनी ऑर्बिस फ्लाइंग आय रुग्णालयातील अठरा महिने संचालकपद स्वीकारले. हार्वर्ड मेडिकल स्कूल यांच्याशी संलग्न असणाऱ्या मॅसॅच्युसेट्स आय अँड इअर येथे चार्ल्स स्टीफन फॉस्टर यांच्या अंतर्गत त्यांनी नेत्र प्रतिक्षमताशास्त्र (ऑक्युलर इम्युनॉलॉजी) आणि असितपटल यांवर काम करण्याकरिता दुसरी अधिछात्रशिष्यवृत्ती मिळविली. भारतात परतल्यानंतर ते पुन्हा एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटमध्ये पारपटलतज्ञ म्हणून काम पाहू लागले. ‘सृजन’- सेंटर फॉर इनोव्हेशनचे ते उपसंचालक आणि नंतर पूर्ण वेळ संचालक झाले. हा विभाग मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट यांचा संयुक्त भाग होता. या संयुक्त प्रकल्पातून डोळ्याचे काही भाग प्रयोगशाळेत विकसित करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. पॉल ड्युबोर्ड अध्यासन हे पद त्यांच्यासाठी एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटमध्ये निर्माण करण्यात आले. त्याचबरोबर ते युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टरमध्ये सहप्राध्यापक होते. सध्या ते दिल्ली येथील डॉ. श्रॉफ्स चॅरिटी आय हॉस्पिटल येथे भाषांतरित संशोधन आणि नवोपक्रम या विभागाचे संचालक आहेत.
डोळ्याचा बाह्यथर पारपटल या नावाने ओळखला जातो. त्याखाली असलेल्या भागास असितपटल (Uvea) असे म्हणतात. असितपटल बुबुळ, समायोजी पिंड (सिलियरी बॉडी) आणि रंजित पटल या तीन भागांनी बनलेले असते. बुबुळ डोळ्यात येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी करते, समायोजी पिंडाचे स्नायू नेत्रभिंगाची जाडी कमी-अधिक करतात तसेच डोळ्याच्या पुढील भागात तयार होणारे नेत्रोद (Aqueous humor) समायोजी पिंड स्रवते. रंजित पटल वरील व खालील थरांना रक्तपुरवठा करते. एकट्या अमेरिकेत असितपटलदाह (Uveitis) या आजाराने पाच लाख व्यक्ती अंध होतात किंवा त्यांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम होतो.
सांगवान यांनी डोळ्यातील पारपटल किनार (लिंबस) भागातील मूल पेशीवर विस्तृत संशोधन केले. लिंबल स्टेम सेल यांना पारपटलीय अभिस्तर मूल पेशी असे सुद्धा म्हणतात. या पेशी पारपटलीय किनाऱ्याच्या तलीय अभिस्तरात आढळत असून त्या एकविभवी (unipotent) असतात. या पेशी सावकाश वाढतात. त्यांचा चयापचय वेग कमी असतो. या पेशी पूर्ण पारपटल नव्याने बनवता येईल या क्षमतेच्या असतात. पारपटलाची झीज भरून काढण्यासाठी या पेशींची योजना असते. ही झीज अश्र्रूंमुळे पारपटलाच्या पेशी निघून गेल्यामुळे झालेली असते. पारपटलाची इजा झालेल्या रुग्णांची दृष्टी पूर्ववत करण्यासाठी सांगवान मदत करीत होते. गीता के. वेमूगंती या नेत्रतज्ञांना पारपटल किनारीमधील मूल पेशी उपचारामध्ये काम करायचे होते. सांगवान आणि वेमूगंती या दोघांनी इजा झालेल्या पारपटलावरील उपचार आणि मानवी डोळ्यामध्ये पारपटल रोपण करण्याची पद्धत शोधून काढली. इतर वेळी पारपटल मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मृत व्यक्तीच्या डोळ्याचे पारपटल रोपण हा असतो. उपलब्ध डोळे व मागणी यातील तफावत कायमची आहे. २०११ मध्ये या पद्धतीच्या चिकित्सा चाचण्या त्यांनी सुरू केल्या. सुधाकर आणि श्रीकांत रवी यांच्या सौजन्याने त्यांनी मूल पेशी जीवशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली. रुग्णांच्या निरोगी डोळ्यातील मूल पेशी भ्रूण आवरणावर वाढवून त्याचे रोपण करण्याच्या आठशेहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. अशा शस्त्रक्रियेतील ७६% शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.
सांगवान यांचे पुढील संशोधन पारपटल किनार मूल पेशींच्या साहाय्याने डोळ्याच्या बाह्य आवरणाची इजा झालेल्या रुग्णांवर उपचार करणे. हे सर्व उपचार त्यांनी शोधनिबंध गूगल स्कॉलर आणि रिसर्च गेट अशा ठिकाणी प्रसिद्ध केले. सुधाकर आणि श्रीकांत रवी स्टेम सेल बायॉलॉजी लॅबोरेटरी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या अनेक चिकित्सा प्रकल्पामध्ये सांगवान सहभागी होते.
असितपटलशोथ विकारामध्ये डोळ्यामध्ये वेदना आणि दृष्टी बदल होतो. उपचाराने हा विकार बरा होतो. त्यावर स्टेरॉइडयुक्त औषधोपचार केले जातात. परंतु कधीकधी डोळ्याच्या विकारात ग्लॅकोमा आणि मोतीबिंदू उद्भवतो. सांगवान यांना असितपटलशोथ विकारावर भारतात उपचार करणारे नरसिंग ए. राव, आमोद गुप्ता, राजीव बड्डी, ज्योतीराम बिश्वास आणि एस. आर. रथीनाम यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या सर्वांनी युइटीस सोसायटी ऑफ इंडिया संस्थेची स्थापना केली. सांगवान संस्थेचे संस्थापक सदस्य, संस्थापक सचिव आणि खजिनदार होते. संस्थेच्या सल्लागार मंडळावर ते पूर्वीपासून होते. एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट आणि हिमालयन व्हिजन प्रॉजेक्ट हे हिमालयन हेल्थ प्रॉजेक्ट आणि एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट यांचा संयुक्त प्रकल्प याबरोबर ते जोडलेले होते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिके उदा., इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी, कॉम्प्रेसिव्ह ऑप्थॅलमॉलॉजिकल अपडेट, क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल ऑप्थॅल्मॉलॉजी, इंटरनॅशनल ऑप्थॅल्मॉलॉजी आणि ब्रिटिश जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी याबरोबर सांगवान जोडलेले होते. आफ्रिका, एल साल्व्हादोर आणि पेरूमधील राष्ट्रीय सोसायटीबरोबर त्यांचे संबंध होते. लक्स युव्हिइटिस मल्टिसेंटर इन्व्हेस्टिगेशन ऑफ अप्रोच टू ट्रीटमेंट [Lux Uveitis Multicenter Investigation of a New Approach to Treatment (LUMINATE)] यांच्या पारपटल अस्वीकार संशोधन गटामध्ये त्यांचा सहभाग मोलाचा होता. एक उत्तम शल्यचिकित्सक असण्याबरोबर त्यांना मॅरेथॉनमध्ये सहभागाची आवड होती. तेलुगू भाषेची देखील त्यांना जाण असल्याने ते तेलुगू भाषिक रुग्णांशी सहज संवाद साधतात.
सांगवान यांना डॉ. पी. सिवा रेड्डी रिसर्चर ऑफ द इयर या आंध्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (२००२). त्यांच्या दोन शोधनिबंधाना मिळालेला आंध्र प्रदेश ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीचा कर्नल रंगाचारी पुरस्कार मिळालेला आहे (२००३ व २००५). नॅशनल टेक्नॉलॉजी ॲवार्ड ऑफ डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (२००७) या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी या संस्थेतर्फे अचिव्हमेंट ॲवॉर्ड देण्यात आला. फॉर्च्यून मॅगेझिनमध्ये त्यांचा मूल पेशीसंबंधी संशोधन लेख प्रसिद्ध झाला (ऑक्टोबर २००७). भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना नॅशनल टेक्नॉलॉजी पुरस्कार देण्यात आला.
कळीचे शब्द : #पारपटल #श्वेतपटल #किनार #मूल पेशी #लिंबस #नेत्रपटल #रोपण
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा