(स्थापना – १९४४). जर्मनीमध्ये ब्लॅक फॉरेस्ट भागातील ओबरवोल्फाक येथे असलेली एक आंतरराष्ट्रीय गणित संस्था (एमएफओ). गणितज्ञ विल्हेम सुस (Wilhelm Süss; ७ मार्च १८९५ — २१ मे १९५८) हे या संस्थेचे संस्थापक आणि पहिले संचालक होते.
वैज्ञानिक प्रगतीला कोणत्याही प्रकारचा भेदभाव खीळ घालत असल्याने ‘जगभरातील उत्कृष्ट आणि होतकरू गणित संशोधकांना एकत्र आणून गणिताच्या विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणे’ हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. किमान वेळात सखोल अभ्यासासाठी अत्यावश्यक असे प्रेरणादायी वातावरण येथे मिळते. शाश्वत संरचना, कार्यपद्धती आणि व्यवस्थापनाच्या विकासाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन संस्था करते. त्यात गणिती संशोधनाला प्रोत्साहन, शास्त्रीय सहयोगाला उत्तेजन, गणित आणि संबंधित क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षण यावर भर आणि कनिष्ठ संशोधकांना संधी देणे यांचा समावेश आहे.
एमएफओच्या सुयोग्य कारभारासाठी शास्त्रीय समिती, प्रशासकीय परिषद आणि शास्त्रीय मार्गदर्शक मंडळ आहे. शास्त्रीय समितीत गणितक्षेत्रातील सर्व शाखांतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या असाधारण प्रतिभावंत शास्त्रज्ञांचे प्रतिनिधित्व करणारे २० गणिती असतात. ही समिती शास्त्रीय उपक्रम आखून ते संचालकांशी चर्चा करून अंतिम करते. प्रशासकीय परिषद संस्थेची आर्थिक बाजू सांभाळते आणि दीर्घकालीन विकासाचे नियोजन करते. शास्त्रीय मार्गदर्शक मंडळ प्रशासकीय परिषदेला मार्गदर्शन करते आणि शास्त्रीय कामाचे मूल्यमापनही करते. याशिवाय संचालक, उपसंचालक आणि आयोजकांचे बहुस्तरीय गुणवत्ता नियंत्रण असते. दूरगामी निर्णय आणि सर्व शास्त्रीय उपक्रमांची आर्थिक तजवीज जर्मन फेडरल सरकार आणि जर्मनीच्या त्या प्रदेशाचे स्थानिक सरकार पाहते. युरोपियन युनियन आणि काही उद्योगही संस्थेला देणगी देतात.
लघुकार्यशाळा, कार्यशाळा, परिसंवाद, अभ्यासवर्ग, ओबरवोल्फाक संशोधन फेलो आणि ओबरवोल्फाक लिब्नीझ फेलो असे सहा शास्त्रीय उपक्रम संस्था आयोजित करते. या सहा उपक्रमांतील सहभागी शास्त्रीय निकषांवर निवडले जातात आणि आयोजकांच्या शिफारशीनुसार संचालक किंवा उपसंचालकांच्या निमंत्रणानंतरच भाग घेऊ शकतात. उपक्रमात भाग घेण्यासाठी संशोधकाला अत्यंत कठीण पण पारदर्शी आणि अनेक टप्पे असलेल्या निवडप्रक्रियेतून जावे लागते. अल्पसंख्याक आणि महिला संशोधकांना विशेष प्रोत्साहन दिले जाते.
सक्रिय संशोधनावर भर देणाऱ्या साप्ताहिक कार्यशाळेत ४५-४८ तज्ज्ञ सहभागी असतात. त्यांना त्यांच्या अद्ययावत संशोधनाचे निष्कर्ष प्रस्तुत करता येतात, उदा., नव्या पद्धती, संकल्पना वा अटकळी. कार्यशाळेत विषयावर चर्चा करतांना एकमेकांच्या अनुभवाचा आणि तात्कालिक ज्ञानाचा सहभागींना लाभ मिळतो. त्यामुळे त्यांच्या भविष्यकालीन संशोधनाला दिशा मिळते. त्याशिवाय १५ ते १७ उत्तम कनिष्ठ संशोधक असलेले लहान गट सप्ताहातील तीन समांतर लघुकार्यशाळेत सहभागी होतात. त्यांना सत्र आयोजित करायची संधी तसेच त्यांच्या नव्या संशोधनाला प्रेरणा मिळते.
गणित क्षेत्रातील अग्रगण्य तज्ज्ञांनी आयोजित केलेल्या परिसंवादात जगभरातील उत्कृष्ट आणि होतकरू पीएच.डी. आणि पोस्ट – पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते. त्यात सहभागींना अद्ययावत विकासाचा परिचय करून दिला जातो. परिसंवादासाठी प्रस्ताव संपूर्ण गणित समुदायाकडूनही मागवले जातात. भविष्यकालीन संशोधनात रूची असलेले ५० कनिष्ठ संशोधक दरवर्षी दोनदा आयोजित होणाऱ्या अभ्यासवर्गात सहभागी होतात. गणिताकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन तयार होण्यासाठी हे अभ्यासगट महत्त्वाचे ठरतात. या अभ्यासवर्गाचा विषय एक वर्ष आधीच लोकशाही पद्धतीने निवडला जातो.
गणिताच्या सर्व क्षेत्रांतील प्रकल्पांना साहाय्यभूत होणाऱ्या आणि आंतरशाखीय संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणाऱ्या ओबरवोल्फाक संशोधन फेलो (OWRF) उपक्रमात संशोधकांचे लघू गट करून त्यांना एकत्र आणून संयुक्त रीत्या संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. ओबरवोल्फाक लिब्नीझ फेलो (OWLF) चा उद्देश आहे की, आपल्या महत्त्वपूर्ण शास्त्रीय कारकिर्दीत स्वतःचे संशोधन प्रकल्प पूर्ण करणाऱ्या आणि अतिरिक्त गुणवत्ता असलेल्या कनिष्ठ संशोधकांना साहाय्य करणे. जास्त सखोल संशोधनाचे टप्पे असलेले संशोधन बाहेरही करता यावे, या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरतो.
आंतरजालाने अनेक संस्थांशी जोडलेली आणि जर्मन फाऊंडेशनच्या पुढाकाराने चालवलेली हायडेलबर्ग लॉरेट फोरमशी (HLF), गणिताचे उपयोजन, शिक्षण आणि संशोधनाला तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनुभवांच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन देणाऱ्या डॉईश मॅथेमेटिकेर फेराइनजुंग (DMV) या जर्मन गणितज्ज्ञांच्या मुख्य व्यावसायिक सोसायटीशी आणि दक्षिण आफ्रिका, तैवान, दक्षिण कोरिया, उरुग्वे आणि इस्रायलमधील गणित शिक्षणाला उत्तेजन देणाऱ्या अनेक संस्थांशी संपर्क असलेल्या इमॅजिनरी (Imaginary) संस्थेशी एमएफओ सहकार्य करते.
विकसनशील देशांतील अत्युत्तम गुणवत्ता असलेल्या कनिष्ठ संशोधकांच्या शिक्षण आणि कौशल्यप्राप्तीसाठी आणि त्यांच्या वैज्ञानिक नैपुण्याच्या विकसनासाठी एमएफओ इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरेटिकल फिजिक्स (ICTP)शी सहकार्य करते. तसेच दरवर्षी प्रतिभासंपन्न जर्मन विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडसाठी अंतिम प्रशिक्षण सप्ताह आयोजित करते.
जर्मनीमधील विद्यापीठेतर सर्व प्रकारच्या संशोधन संस्थाच्या संशोधनात सुसूत्रता आणि जोडणी व्हावी म्हणून १९९० साली ‘लिब्नीझ संघटना’ स्थापन करण्यात आली. तिच्यातर्फे लोकपालाची नियुक्ती करून संशोधक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि मतभेद तसेच दुर्व्यवहाराच्या आरोपांची बारकाईने चौकशी केली जाते. संशोधनविषयी तक्रारी, आरोप, वाद, आणि अस्वीकारार्ह वागणूकीबद्दल लोकपालाकडे तक्रार नोंदवायला सहभागींना उत्तेजन दिले जाते. या संघटनेने केलेले मूल्यमापन संशोधनकार्याच्या गुणवत्तेचे प्रमाण मानले जाते. एमएफओ लिब्नीझ संघटनेची २००५ मध्ये सभासद झाली आणि ती तिच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते.
लिब्नीझ संघटनेच्या मुक्त प्रवेश धोरणानुसार संशोधनातील नवनव्या कल्पनांची गती, पारदर्शिकता आणि सत्यता पडताळून पाहण्याची क्षमता वाढावी यासाठी संस्थेच्या स्वतःच्या प्रकाशनाच्या चार मालिका आहेत. खात्रीलायक गुणवत्ता असलेल्या आणि पद्धतशीरपणे केलेल्या दस्ताऐवजीकरणामुळे लघुकार्यशाळेत आणि कार्यशाळेत झालेल्या व्याख्यानांचा विस्तारीत गोषवारा, अतिथी गणितींनी त्यांच्या वास्तव्यात प्रस्तुत किंवा विकसित केलेले संशोधन, पीएच.डी आणि पोस्ट-डॉक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परिसंवादातील व्याख्यानांच्या टीपा त्यांत प्रकाशित होतात.
एमएफओ सारखीच गणिती संशोधन संस्था भारतातही असावी या हेतूने आयआयटी मुंबई आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) या संस्थांनी संयुक्तपणे ‘नॅशनल सेंटर फॉर मॅथेमेटिक्स्’ (NCM) ची स्थापना २०११ साली आयआयटी मुंबईच्या पवई येथील संकुलात केली.
कळीचे शब्द : #गणिती #संशोधन #ओबरवोल्फाक #फेलो #लिब्नीझ
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Mathematical_Research_Institute_of_Oberwolfach
- https://www.mfo.de
- leibniz-gemeinschaft.de
- https://www.ncmath.org
समीक्षक : विवेक पाटकर