(स्थापना : ऑगस्ट २०१४). भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र हे देशातील भूकंपांवर लक्ष ठेवणारी शासनाची एक मध्यवर्ती संस्था आहे. भूकंपांमुळे होणाऱ्या जीवित, वित्त व मालमत्ता हानीचा विचार करता भूकंपशास्त्राचा संशोधनात्मक अभ्यास करणे व त्यासंबंधीच्या तंत्रज्ञानाचा विकास करणे अत्यावश्यक होते, तसेच भूकंपांच्या नोंदी घेणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणेसह वेधशाळांची संख्या वाढवणे व या सर्व वेधशाळांवर नियंत्रण ठेवणारी एक केंद्रीय प्रणाली तयार करणे आवश्यक होते. ही गरज लक्षात घेऊन ऑगस्ट २०१४ मध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागातील भूकंपशास्त्र कक्ष आणि भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे भूकंपांच्या धोक्यांचे मूल्यांकन केंद्र एकत्र येऊन त्यांचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र झाले. हे केंद्र दिल्ली येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या परिसरात कार्यरत आहे.

भूकंपशास्त्र वेधशाळा उपग्रह संप्रेषणाद्वारे जोडलेल्या आहेत. याद्वारे भूकंपासंबंधीची वास्तविक वेळेची नोंद ठेवणाऱ्या वेधशाळांचे महाजाल हे देशातील व देशाच्या शेजारच्या भागातील भूकंप व त्सूनामीची माहिती २४ तास राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राला पुरवते. यामुळे कमी क्षमतेच्या भूकंपांचीही अचूक माहिती पाच मिनिटांच्या आत या केंद्राला मिळते. मिमिक, पोर्ट ब्लेअर आणि शिलॉंग येथील माहितीही जगभरात पोहचवली जाते.

हे केंद्र देशातील १५५ भूकंपमापन स्थानकांच्या म्हणजे वेधशाळांचे जाळे असलेल्या प्रणालीची देखभाल करते. ही स्थानके व त्यांचे जाळे अत्याधुनिक यंत्रसामग्रीनी सज्ज असून २४ तास सक्षमपणे काम करते. भूकंप झाल्यावर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या भूकंप लहरी व जमिनीला बसणाऱ्या हादऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची वेधशाळाही स्थापन केली जाते. याशिवाय हे केंद्र भूकंपप्रवण क्षेत्रांची लहान लहान क्षेत्रांमध्ये विभागणी करते व त्यांचा सखोल अभ्यास करते.

हे केंद्र देशातील भूकंपशास्त्र वेधशाळा व त्यांचे राष्ट्रीय स्तरावरील जाळे सक्षमपणे कार्यरत ठेवून भूकंपासंबंधीची निरीक्षणे व माहिती सतत मिळवत असते. भूकंपप्रवण क्षेत्रांचा, भूकंपानंतरच्या स्थितीचा व भूकंप होण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करते. तसेच भूकंपासंबंधीची निरीक्षणे, संकलित माहिती व अहवाल, राज्य व केंद्र शासनाचे विभाग, विमा कंपन्या, कारखाने, वीज निर्मिती क्षेत्रे, नदी खोरे प्रकल्प, आपत्ती शमन व पुनर्वसन संस्था, आपत्ती निवारण व्यवस्थापन इत्यादी विविध संस्थांना मागणीनुसार पुरवीत असते.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मदतीने गुगलने भारतातील ‘भूकंप इशारा प्रणाली’ नुकतीच विकसित केली आहे. ही प्रणाली मोबाईल स्मार्टफोनद्वारे काम करते. भूकंप संदेशासाठी स्मार्टफोनमधील ॲक्सिलोमीटर भूकंपमापनाच्या सिस्मॉमीटरप्रमाणे काम करतो. त्याला भूकंपाच्या प्राथमिक लहरींची जाणीव होऊन ही माहिती गुगल सर्व्हरला जाते आणि या सर्व्हरवरून स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या परिसरातील भूकंपाचा इशारात्मक संदेश पाठवला जातो. अशा प्रकारच्या प्रणालीचा वापर अनेक देशांमध्ये करण्यात येत आहे.

भूकंपप्रवण क्षेत्रांची लहान लहान क्षेत्रांमध्ये विभागणी करून त्यांचे सर्वेक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र करत आहे. यामध्ये भूकंपप्रवण क्षेत्रांची विभागणी ही त्यांच्या भूगर्भीय व भूभौतिक वैशिष्ट्यांनुसार केलेली  असते. यामध्ये जमीन हादरणे, द्रवीकरण संवेदनशीलता, भूस्खलन, दरड कोसळण्याचे धोके, भूकंपानंतरची पूर स्थिती, इत्यादींची निरीक्षणे व अभ्यास यांचा समावेश असतो. यासाठी देशातील ३० शहरांची निवड केलेली आहे.

भूकंपप्रवण क्षेत्र विभागणीकरणाचा उपयोग त्या विभागांचे मार्गदर्शक नकाशे तयार करण्यासाठी होतो. या नकाशांच्या आधारे भूकंपांमुळे होणाऱ्या हानीचे प्रकार व तीव्रता यांचे विभागानुसार पुर्वानुमान देता येते. हे नकाशे संबंधित क्षेत्रातील सामाजिक व शासकीय यंत्रणेला पुरवले जातात. हे नकाशे भूकंपांचे धोके व हानी कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, तसेच नागरिकांना सतर्क राहण्यासाठी उपयुक्त आहेत.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रामार्फत भूकंपप्रवण क्षेत्रातील इमारतींची भूकंपांपासून सुरक्षित असण्याच्या दृष्टीकोनातून तपासणी केली जाते. तसेच हे केंद्र भूकंपप्रवण क्षेत्रातील जनतेनी भूकंपापासून संरक्षण करण्यासाठी कशा प्रकारे तयारी करावी व कोणती काळजी घ्यावी याची प्रात्यक्षिके वेळोवेळी आयोजित करत असते. या कामात मदत करणाऱ्या ‘आपदा मित्र’ या स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे स्वयंसेवक प्रशिक्षित असून त्यांच्याजवळ बचावासाठी उपयुक्त वस्तूंचा संच असतो.

सर्वेक्षणानुसार भारत देशाचा ५९ टक्के भाग हा भूकंपप्रवण आहे. यामध्ये विविध क्षमतेच्या भूकंपांचा समावेश आहे. जगात कोणत्याही देशात भूकंपाचे दीर्घ किंवा मध्यम कालावधीचे पूर्वानुमान देणाऱ्या सक्षम प्रणालीची निर्मिती झालेली नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र भूकंपप्रवण क्षेत्रात अशा प्रकारची भूकंपाचा पुर्वानुमान देणारी सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचे नियोजन करत आहे. याचा पहिला मार्गदर्शी प्रकल्प हिमालय क्षेत्रासाठी असेल.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या पुढाकाराने भूकंपांमुळे होणारी जीवित, मालमत्ता व वित्त हानी कमी करण्यासाठी भारतीय मानक संस्था, इमारत बांधकाम सामुग्री आणि तंत्रज्ञान परिषद, गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे भूकंपरोधक इमारतींचे आराखडे व रचना यासाठी मार्गदर्शक तत्त्वे व नियमावली तयार केली आहेत.

कळीचे शब्द : #भूकंप #अंदाज #मापन

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा