ग्रीसच्या पूर्वेकडील इजीअन समुद्राच्या वायव्य भागामधील ग्रीक मॅसिडोनियाच्या दक्षिण किनाऱ्यावरील आखात. या आखाताच्या ईशान्येस ग्रीसचे सलॉनिक (थेसालोनायकी) हे शहर आहे. या शहराच्या प्राचीन थर्मा या नावावरून या आखातास थर्मिक आखात असेही म्हणतात. रोमन लोक याला थर्मायकस किंवा थर्मायस सायनस म्हणजे थर्माचे आखात किंवा मॅसिडोनिअस सायनस म्हणजे मॅसिडोनियाचे आखात म्हणत असत. या आखाताची लांबी १०० किमी., तर कसांड्राच्या संयोगभूमीजवळ त्याची जास्तीत जास्त रुंदी ६५ किमी आहे. आखाताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये सलॉनिक बंदराजवळ हे आखात अरुंद म्हणजे केवळ ८ किमी आहे.
ग्रीसमधील पिनिअस, आलीइक्मॉन, लाउडियाज, गल्लीकॉस आणि वार्दर (एक्सिऑस) इत्यादी नद्या सलॉनिकाच्या आखातास येऊन मिळतात. या नद्या मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. त्यामुळे आखाताच्या किनारपट्टीवर दलदलीही आहेत. तसेच डोंगराळ किनारपट्टीमुळे येथे काही नैसर्गिक बंदरे निर्माण झाली आहेत. सलॉनिक हे त्यांपैकी सर्वांत मोठे आणि सर्वांत जास्त वाहतुकीचे बंदर असून ते ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. याशिवाय आखाती भागात काटेरीनी, कसांड्रा, न्येआमिखानियोना इत्यादी लहान मोठी १२ बंदरे आहेत. उत्तर ग्रीसमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे सलॉनिका आखाताच्या पश्चिम किनारपट्टीवर पसरले असून त्याद्वारे तेथील महत्त्वाची शहरे आणि राजधानी अथेन्सला जोडली गेली आहेत. या आखाताच्या किनारीभागातील पोटॅमॉस, नेआ पॅरालिया, पेराईआ, स्टाव्हरोस, आगिआ, त्रिआदा, नेओई इपिव्हॅट्स इत्यादी पुळणी पर्यटकांची आकर्षणे आहेत.
समीक्षक ꞉ मा. ल. चौंडे