सपुष्प जातिवृत्त वर्ग (Angiosperm Phylogeny group; APG) हे वनस्पती शास्त्रज्ञांनी स्थापित केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनौपचारिक मंडळ आहे. हे मंडळ सपुष्प वनस्पतींच्या पद्धतशीरपणे मांडलेल्या वर्गीकरणावरील एकमत तसेच या वनस्पतींचे जातिवृत्तांवर आधारित परस्परसंबंध यांवरील अद्ययावत ज्ञान दर्शविते. जातिवृत्त या जीवशास्त्राच्या शाखेत दोन वा त्यापेक्षा जास्त अशा जवळच्या जातींमधील, उत्क्रांतीशी निगडित संबंधांनुसार प्रजातींची मांडणी केली जाते. यातून विभिन्न प्रजातींचा उगम कोणत्या पूर्वजापासून झाला हे ओळखता येते. अशा एकाच पूर्वजापासून विकसित झालेल्या (प्राणी वा वनस्पती) प्रजातींच्या समूहाला क्लेड म्हणून संबोधतात. या शाखेमुळे आधुनिक वर्गीकरण सुलभ व अचूक होण्यात यश येत आहे.
सन २०१७ सालापर्यंत वर्गीकरण पद्धतीच्या चार सुधारित आवृत्त्या ह्या सपुष्प जातिवृत्त वर्ग (सजाव) सहयोगामुळे प्रकाशित झाल्या आहेत (अनुक्रमे १९९८, २००३, २००९ व २०१६ मध्ये प्रकाशित). सजाव प्रकाशने शास्त्रीय दृष्ट्या वाढत्या प्रमाणात प्रभावी ठरत असल्याने अनेक प्रमुख वनस्पतिसंग्रह संस्था त्यांचे संग्रहित वनस्पतींचे नमुने या वर्गीकरणानुसार अद्ययावत करीत आहेत. विस्तृत जनुकीय पुरावे उपलब्ध होईपर्यंत सपुष्प वनस्पतींचे वर्गीकरण त्यांच्या फुलांच्या आकारावर व जीवरसायनशास्त्रावर (विशेषतः फुलांमधील रसायनांवर केल्या जाणाऱ्या अभ्यासाच्या आधारे) होत असे. यातून विविध वनस्पतिशास्त्रज्ञांनी मांडलेल्या अनेक वर्गीकरणपद्धती निर्माण झाल्याने विशिष्ट अशा प्रमाण पद्धतीचा अभाव जाणवत असे. हा अभाव नाहीसा होण्यासाठी ‘सजाव’ची स्थापना करण्यात आली.
‘सजाव’ची वर्गीकरणामागील तत्त्वे १९९८ सालाच्या पहिल्या प्रकाशनात मांडली असून ती थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत :
- कार्ल लिनीअस यांच्या ‘गण व कुल’ (orders & family) प्रणालीचे पालन केले पाहिजे. ‘वनस्पतीचे कुल हे सपुष्प वर्गीकरणाचे केंद्रस्थान आहे.’ कुलांचे क्रमवार वर्गीकरण हे ‘व्यापक फायद्याचे संदर्भ साधन’ म्हणून मांडले आहे. शैक्षणिक स्तरावर तसेच कुलांच्या परस्परसंबंधांच्या अभ्यासात गण यास विशेष महत्त्व आहे.
- गट (Groups) एकस्त्रोतोद्भव (Monophyletic) असावेत (म्हणजे एकाच पूर्वजाचे सर्व वंशज त्यात समाविष्ट). पूर्वप्रचलित वर्गीकरणपद्धती ह्या जातिविकसित (phylogenetic) नव्हत्या व याच कारणास्तव त्या नाकारल्या गेल्या.
- गटाच्या मर्यादा सुनिश्चित करण्यासाठी व्यापक उपाययोजना आखल्या आहेत. गणांसाठी असे ठरविण्यात आले आहे, की संख्येने मर्यादित असे मोठे (फुगीर) गण अधिक फायदेशीर ठरतील. गटांच्या एकस्त्रोतोद्भवी आवश्यकतेचे उल्लंघन न करता शक्य तेथे एकच प्रजाति (जाति अंक/genus) असलेली कुलं व एकच कुल असलेले गण टाळले आहेत.
- गण व कुल यांचा वापर जरी होत असला तरी, या पातळीवरील नामकरणासाठी पूर्वनामांकित ‘क्लेड्स’चाही मुक्तपणे उपयोग केला जातो (काही क्लेड्सना २००९ सालच्या सजाव प्रकाशनात नव्याने औपचारिक नावे देण्यात आली आहेत). जातिवृत्तावलीतील (Phylogenetic tree) सर्व क्लेड्सचे नामकरण “शक्य नाही वा अपेक्षितही नाही” असे लेखकांचे मत आहे; तरीदेखील, शास्त्रीय संवाद व चर्चा यांच्या सुलभतेसाठी, वर्गीकरण करणाऱ्यांनी काही क्लेड्सच्या, विशेषतः गण व कुल यांच्या, नामकरणाबाबत एकमत दाखविणे गरजेचे आहे.
सजाव प्रकाशनांच्या लेखकांपैकी ‘पीटर एफ. स्टेवेनस्’ हे ‘मिसुरी वनस्पती उद्यान’ आश्रित APweb म्हणून संकेतस्थळ चालवीत असून ते २००१ सालापासून वारंवार अद्ययावत केले जाते. हे संकेतस्थळ माहितीचा स्रोत म्हणून सपुष्प जातिवृत्ताच्या ‘सजाव’ला अनुसरून अशा नवीनतम संशोधनात मोलाची मदत करते.
संदर्भ : http://francescofiume.altervista.org/taxa/APG.pdf
समीक्षक : डॉ.बाळ फोंडके