अर्णीकर, हरी जीवन : (६ ऑक्टोबर १९१२ — २१ नोव्हेंबर २०००). भारतीय बहुआयामी आणि आणवीय रसायनशास्त्राचे मूलगामी अभ्यासक, ज्येष्ठ अध्यापक आणि लेखक.

अर्णीकर यांचा जन्म आंध्रप्रदेशातील श्रीकालहस्ती येथे झाला. पितृछत्र लहानपणीच हरपल्याने अल्पशिक्षित आत्यानेच त्यांच्या शिक्षणाची आणि इतर जबाबदारी स्वीकारून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. अर्णीकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण प्रा. चिंतामणी त्रिलोकेकर यांच्या मदतीने बनारस हिंदू विश्वविद्यालयात झाले. तेथेच त्यांनी बी. एस्सी. आणि एम. एस्सी. या दोन्ही पदव्या प्रथम क्रमांकाने प्राप्त केल्या.  प्रा. श्रीधर सर्वोत्तम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘कोरोना प्रेशर अँड द जोशी इफेक्ट इन गॅसेस अंडर डिस्चार्ज’ या विषयावर प्रदीर्घ प्रबंध लिहून पीएच.डी. पदवी प्राप्त केली.  आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाज घटकांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीत भारत सरकारने १९५५ मध्ये  केलेल्या सुधारणा अंतर्गत त्यांना ‘ओव्हरसीज मॉडिफाइड’ शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी पॅरिस विद्यापीठाची डी. एस्सी. ही आपल्याकडील पीएच.डी.ची समकक्ष पदवी प्राप्त केली. यासाठी जगप्रसिद्ध आणवीय संशोधक प्रा. फ्रेडरिक आणि प्रा. इरिना क्यूरी जोलीए यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले ‘सेपरेशन ऑफ आयसोटोप्स बाय इलेक्ट्रोमायग्रेशन इन फ्युज्ड सॉल्ट्स’ हे संशोधन अर्णीकर यांच्या पुढील वाटचालीत खूपच उपयुक्त ठरले. भारतात १९५८ मध्ये परत आल्यावर बनारस हिंदू विद्यापीठात प्रपाठक म्हणून कार्यरत असताना तेथील कार्यकालात डॉ. के. एन. उडुप्पा यांच्या समवेत किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (Isoptopes) उपयोग वैद्यकीय क्षेत्रात कसा करता येईल याबद्दलही त्यांनी संशोधन केले. त्यांना अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन, मॅडिसन येथे १९६२ मध्ये प्रो. विलार्ड यांच्याबरोबर संशोधन करण्यासाठी ‘फुलब्राईट शिष्यवृत्ती’ मिळाली होती. तसेच १९६२ मध्येच पुणे विद्यापीठाच्या (आताच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या) रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. मुंबई येथील भाभा अणुशक्ती केंद्राच्या सहयोगाने तिन्ही अणुवैज्ञानिक रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यानी पुणे विद्यापीठात एक नवीन विद्याशाखा निर्माण केली. तुर्भे अणुकेंद्राबाहेर एखादे आणवीय केंद्र सुरू होण्याची ही पहिलीच वेळ होती. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या अनेक उपक्रम आणि प्रकल्पात त्यांनी भाग घेतला. त्यांचे ३०० शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 33 विद्यार्थ्यांना पीएच.डी. मिळाली. पुणे विद्यापीठात अजूनही हे केंद्र कार्यरत असून अनेक विद्यार्थी तेथे एम. एस्सी. आणि पीएच. डी. साठी संशोधन करत आहेत. युनेस्कोच्या बँकॉक येथील, विशेषेकरून आशियन संस्थासाठी असलेल्या पायलट प्रोजेक्ट ऑन टीचिंग केमिस्ट्री या प्रकल्पाचे ते आंतरराष्ट्रीय सल्लागार होते. या माध्यमातून त्यांनी रसायनशास्त्राच्या अध्यापनात सातत्याने अनेक मौलिक सुधारणा घडवून आणल्या.

अर्णीकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या केमिकल सोसायटीने ग्रामीण विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी फिरत्या प्रयोगशाळेची स्थापना करून ही सुविधा अस्तित्वात नसलेल्या दुर्गम भागात रासायनिक प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून दिली. संगणक प्रणाली भारतात सर्वांसाठी उपलब्ध होऊ लागली तेव्हा बीबीसीद्वारा देणगी म्हणून काही अगदी प्राथमिक अवस्थेतील संगणक त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. यांसारख्या अनेक उपक्रमात त्यांनी सक्रिय भाग घेतला. आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे विद्यार्थी वर्गात तर ते उत्कृष्ट शिक्षक म्हणून प्रख्यात होतेच; याशिवाय त्यांनी सामान्य जनतेसाठी विज्ञान प्रसाराचे कार्यही केले. निवृत्त झाल्यानंतरही विद्यापीठाने त्यांना मानद प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले (१९७७). मिळालेल्या सर्व सुविधांमुळे अध्यापन आणि संशोधनात ते कार्यरत राहिले आणि हॉट ॲटम केमिस्ट्री, फ्यूज्ड इलेक्ट्रोलाईटस, जोशी इफेक्ट यांसारख्या अनेक विषयावर त्यांनी संशोधन केले. कृत्रिम किरणोत्सर्गाच्या १९८५ साली शोधाला ५० वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने भाभा अणुसंशोधन केंद्राच्या सहकार्याने त्यांनी एका भव्य आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी रीत्या आयोजन केले.

अर्णीकर यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक सन्मान, पुणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सावाच्या वेळी जीवनसाधना गौरव पुरस्कार, विद्याव्यास पुरस्कार, एम. व्ही. रमणय्या पुरस्कार, शारदा ज्ञानपीठ पुरस्कार, प्रो. फ्रेडरिक ज्योलिओ क्यूरी एनडाउमेन्ट ॲवॉर्ड, फुलब्राईट शिष्यवृत्ती, इ. अनेक पुरस्कारांनी भूषविले गेले आहे. आणवीय रसायनाव्यतिरिक्त डॉ. लेडबीटर आणि ॲनी बेझंट यांनी गूढ रसायनशास्त्रावर १९०८ मध्ये लिहिलेल्या ऑकल्ट केमिस्ट्री या ग्रंथाचे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून त्यांनी आपले निष्कर्ष काढले आणि त्यावर आधारित ‘इसेन्शियल्स ऑफ ऑकल्ट केमिस्ट्री ‘ हा ग्रंथ 2000 साली वयाच्या 88 व्या वर्षी लिहिला. त्यांनी लिहिलेल्या इसेन्शियल्स ऑफ न्यूक्ल‍िअर केमिस्ट्री अँड आयसोटोप्स इन द ॲटॉमिक एज या पुस्तकाचा सहा यूरोपियन भाषांत अनुवाद झाला आहे. तेलुगू, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

अर्णीकर यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

कळीचे शब्द : #पुणे #विद्यापीठात #अणुरसायनशास्त्र #प्रयोगशाळा #ग्रामीण #फिरती प्रयोगशाळा

संदर्भ :

समीक्षक : श्रीनिवास केळकर