जगदाळे, ‍निवृत्ती गोविंद (Jagdale, Nivrutti Govind) : (४ फेब्रुवारी १९०३ – ३० मे १९८१)‍. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक शिक्षण प्रसारक व समाजसुधारक. जगदाळे मामा म्हणून परिचित. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चारे हे त्यांचे गाव. त्यांचा जन्म भिकार सारोळे, जि. उस्मानाबाद (धाराशिव) येथे आजोळी झाला. वडील गोविंदराव व आई मुक्ताबाई शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबात वारकरी परंपरा होती. मामांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण चारे येथील प्राथमिक शाळेत झाले. एकत्र कुटुंब आणि पसाऱ्याची शेती यांमुळे त्यांच्या पुढील शिक्षणाला घरातून विरोध झाला; मात्र त्या विरोधाला डावलून त्यांनी बार्शी येथील नगरपालिका मुलांची शाळा क्र. १ मध्ये चौथीला प्रवेश घेतला (१९१९). पुढे नार्थकोट हायस्कूल, सोलापूर येथे इंग्रजी माध्यमाचे सातवीचे (मॅट्रिक) शिक्षण घेतले (१९३०). दरम्यान त्यांचा विवाह मानेगावच्या देशमुखांची कन्या लक्ष्मीबाई (माहेरचे नाव पार्वती) यांच्याशी झाला; मात्र‍ वडिलांनी मनाविरुद्ध लग्न लावून दिल्यावरून ते एकटेच आळंदी येथे वास्तव्यास गेले. तेथे त्यांनी मृदुंगवादनाचे धडे गिरविले.

आळंदीहून परतल्यानंतर मामांनी सोलापूर को-ऑपरेटिव्ह सुपरवायझिंग युनियनमध्ये सुपरवायझर, तसेच बार्शी नगरपालिका येथे वसुली अधिकारी (कलेक्शन इन्स्पेक्टर) म्हणून नोकरी केली. परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता न आल्याची खंत त्यांना होती. तसेच महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता. यातूनच त्यांनी काही गरीब विद्यार्थी आणि बहिणीच्या मुलांना घेऊन ‘श्री. शिवाजी मराठा बोर्डिंग’ची स्थापना केली (१९३४). कृष्णात राऊत हे बोर्डिंगचे अध्यक्ष, तर नरसिंगतात्या देशमुख हे सचिव होते. बोर्डिंगमधील बहिणीची व इतर मुले त्यांना ‘मामा’ म्हणत. त्यामुळे ते सर्वांचे ‘मामा’ झाले. नोकरी सांभाळून बोर्डिंगची सर्व व्यवस्था ते स्वत: पाहात. पुढे नोकरीतील त्रासाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ शैक्षणिक कार्यास वाहून घेतले. ‘एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ॥’ हे संत तुकारामांच्या विचारांचे ब्रीदवाक्य घेऊन, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून, त्यांनी ‘श्री. शिवाजी मराठा बोर्डिंग’चे रूपांतर ‘श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळा’त केले (१९४७).

ग्रामीण भागात वसतिगृहयुक्त विद्यालये हा मामांच्या शिक्षणप्रणालीचा आस्थेचा भाग होता. तत्कालीन दळणवळणाच्या अभावग्रस्त काळात विद्यालयाच्या आसपासच्या गावातील शेतकरी, कष्टकरी, दलित मुलांना शिक्षणाची सोय व्हावी, हाच त्यांचा ध्यास होता. गुणवत्तापूर्ण अभ्यास, श्रमसंस्कार व शिस्त यांमुळे त्यांच्या गुरुकुलासम वसतिगृहांतील विद्यार्थीसंख्या वाढू लागली. त्यात ग्रामीण भागातील मुलींसाठीही मामांनी संत गाडगेबाबा यांच्या हस्ते भारतीय बालिकाश्रमाची सुरुवात केली. ‘वसतिगृहासोबतच स्वत:चे विद्यालय असावे’, अशी सूचना बार्शीत झालेल्या भेटीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मामांना केली. त्या सूचनेचे पालन करत मामांनी १९५२ मध्ये येडशी येथे ‍बोर्डिंग व विद्यालय; १९५४ मध्ये बार्शी येथे अध्यापक विद्यालय व महाराष्ट्र विद्यालय; १९६० मध्ये श्री. शिवाजी महाविद्यालय यांची स्थापना केली. बार्शी आणि परिसरातून धान्य व मिळेल ती मदत गोळा करत त्यांनी बोर्डिंगचा विस्तार केला.

शाळा इमारत बांधकाम पाहणी दरम्यान पडल्याने मामासाहेबांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली (२१ मे १९५०). पुढे तब्बल चार महिनयांच्या उपचारानंतर ते त्यातून बरे झाले. मामांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच शेतकी व तंत्र शिक्षणावरही भर दिला. शिवाय त्यांनी शेती, आडत दुकान, कापड दुकान, छापखाना, रेशन दुकान (स्वस्त धान्य दुकान), कुक्कुटपालन, धेनुसंवर्धन असे अनेक लोकोपयोगी व्यवसायदेखील संस्थेमार्फत चालविले.

मामांना संत गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील आणि कर्मवीरांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक कार्याबरोबरच अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबंदी, सदृढ पिढी घडविण्यासाठी कुस्ती स्पर्धांचे आयोजन, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन असे विविध सामाजिक कार्यदेखील त्यांनी नि:स्वार्थ भावनेने केले. त्यांनी हरिजन सेवक मंडळ, कर्मवीर युवक मंडळ, कृषी विज्ञान, कामधेनू मंडळ अशा संस्था स्थापन केल्या.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी जगन्नाथ शिंदे यांच्या पत्नी राहीबाई शिंदे यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मामांनी त्यांना घर व मानधन मिळवून दिले. तत्पूर्वी राहीबाईंना त्यांनी आपल्या संस्थेकडून मानधन दिले. वीर पत्नी व वीर माता-पिता यांचा सन्मान करण्याचे व्रत कायम ठेवले. स्वातंत्र्यचळवळीतील, तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामातील भूमिगत क्रांतिकारकांना आपल्या संस्थेत हक्काचा आश्रय दिला. व्यापक समाजकारणाचा भाग म्हणून १९७२ मध्ये बार्शीच्या राजकारणातील एकाच कुटुंबाची असणारी मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी संस्थेतील शैलजा शितोळे यांना आमदार म्हणून निवडून आणले.

शाळेच्या इमारतीवरून पडून झालेला अपघात, तसेच अर्धांगवायूचा झटका यांमुळे मिरज येथे घ्यावे लागलेले उपचार व आलेला खर्च यांचा विचार करून मामांनी गोरगरीब ग्रामीण जनतेला वाजवी दरात आरोग्य सेवा मिळावी, या उदात्त हेतूने त्यांनी बार्शी येथे आपल्या शैक्षणिक संस्थेमार्फत ४ फेब्रुवारी १९७५ रोजी आरोग्य मंदिराची स्थापना केली. हे आरोग्य मंदिर ‘जगदाळे मामा हॉस्पिटल’ या नावाने ओळखले जाते. अत्याधुनिक सुविधांचे ३५० खाटांचे व ट्रॉमा युनिटचे हे सर्वोपचार रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या निर्मितीत व विकासाच्या वाटचालीत मामांचे विद्यार्थी डॉ. बी. वाय. यादव यांचा मोलाचा सहभाग आहे.

मामांच्या १९५० साली झालेल्या अपघातानंतर बोर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘पूज्य जगदाळे मामा सत्कार समिती’ स्थापन केली. याच समितीच्या आयोजित समारंभात लोकांनी त्यांना ‘कर्मवीर’ ही पदवी बहाल केली. मामांना मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांनी ‘डी. लिट’ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदव्या देऊन सन्मानित केले आहे.

अर्धांगवायूने बार्शी येथे त्यांचे निधन झाले.

साप्रंत मामांनी स्थापन केलेल्या श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे  कार्यक्षेत्र सोलापूर आणि धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यांत असून संस्थेचा प्राथमिक शाळा (५), माध्यमिक विद्यालये (१४), उच्च माध्यमिक विद्यालये (१४), महाविद्यालये (५), कृषितंत्रनिकेतन (२), कृषी महाविद्यालय (१), नर्सिंग कॉलेज (१), मुलांची वसतिगृहे (१०) आणि मुलींची वसतिगृहे (५) असा विस्तार आहे. या संस्थेतून हजारो गरीब विद्यार्थी प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा लाभ घेत आहेत. मर्यादित प्रादेशिक अवकाशात परिपूर्ण शैक्षणिक विकास घडविता येतो, हे मामांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याने दाखवून दिले. शिक्षणाने मन, मनगट व मेंदू विकसित व्हावा, हा मामांचा ध्यास होता. त्यानुसार संस्थेच्या विकासाची वाटचाल सुरू आहे. ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वाचा अवलंब आजही मामांच्या संस्थेत केला जात आहे.

संदर्भ :

  • अिंगळे, व.‍ न., ज्ञानतपस्वी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचं जीवन चरित्र, औरंगाबाद, २००६.
  • अिंगळे, व. न.; मोरे, चंद्रकांत व इतर, संपा., परीस – स्पर्श : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जन्मशताब्दी, बार्शी, २००४.

समीक्षक : चंद्रकांत मोरे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.