सपाट छपराकरिता जलावरोधन पद्धती : सपाट छपराच्या (Flat roof) बाबतीत पावसाचे पाणी छपराच्या फुटलेल्या कौलांमधून, दोषयुक्त कठडाभिंतीमधून (Parapet wall) तसेच तुटलेल्या दरजांमधून आत येते आणि छपराला ओल येते.

भारतामध्ये प्रदेशनिहाय सपाट छपराचे जलावरोधन करण्याच्या विविध पद्धती आहेत, त्या पुढीलप्रमाणे :

आ. १. उष्ण व दमट प्रदेशांतील जलावरोधन पद्धती : (१) गिलावा, (२) चुना क्राँक्रीटचा पृष्ठभाग, (३) सपाट फरशी, (४) सपाट फरशीचा पहिला थर , (५) सपाट फरशीचा दुसरा थर, (६) प्रबलित/सलोह सिमेंट काँक्रीटची लादी, (७) चुना काँक्रीट, (८) गरम बिट्युमेनचा थर, (९) बिट्युमेन भरण असलेला १२ मिमी. चा प्रसरण जोड.

(अ) उष्ण व दमट प्रदेशांतील जलावरोधन पद्धती : या पद्धतीमध्ये सपाट छपराच्या पृष्ठभागावर गरम बिट्युमेनचा (१.७ किग्रॅ./मी.) थर लावला जातो. त्यावर वाळू (०.६ मी./१०० मी.) पसरली जाते. १० सेंमी. जाडीचे चुना काँक्रीट योग्य उतार देऊन टाकले जाते. त्यावर सपाट कौलांचे एकावर एक दोन थर बसविले जातात. हा प्रकार मुंबई, कोलकाता, मद्रास यांसारख्या उष्ण व दमट प्रदेशांत वापरला जातो.

(ब) उष्ण व कोरड्या प्रदेशांतील फरशी व पंकमिश्रणाच्या साहाय्याने जलावरोधन पद्धती : या पद्धतीमध्ये सपाट छपराच्या पृष्ठभागावर गरम बिट्युमेनचा (१.७ किग्रॅ./मी.) थर लावला जातो. त्यावर वाळू (०.६ cum./१०० मी.) पसरली जाते. १० सेंमी. जाडीची विशिष्ट प्रकारची माती, भुसा व पाणी यांच्या पंकमिश्रणाचा (Mud phuska) थर योग्य उतार देऊन दिला जातो. त्यावर सिमेंट मसाल्यामध्ये (१:३) सपाट फरशी बसविली जातात.

हा प्रकार दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश व इतर प्रदेश (ज्या ठिकाणी पर्जन्यमान १००० मिमी. पेक्षा जास्त नाही), अशा ठिकाणी वापरण्यात येते.

आ. २. उष्ण व कोरड्या प्रदेशांतील ओलावा प्रतिबंधन पद्धती : (१) विटांचा ठिबकणी थर, (२) चुना काँक्रीट, (३) गरम बिट्युमेनचा थर, (४) प्रबलित / सलोह सिमेंट काँक्रीटची लादी, (५) पंक मिश्रण, (६) फरशी, (७) खोबण, (८) ६ मिमी. जाडीचा सिमेंट गिलावा, (९) गिलावा, (१०) बिट्युमेन भरण असलेला १२ मिमी. चा प्रसरण जोड.

(क) रुमालेपी अस्फाल्ट व ताग (ज्यूट) अनुरेखन पद्धती : सपाट छपराच्या पृष्ठभागावर गरम रुमालेपी अस्फाल्टचा (Mastic asphalt) थर दिला जातो. त्यावर तागाचे कापड पसरले जाते. पुन्हा गरम रुमालेपी अस्फाल्टचा थर लावून सर्व पृष्ठभागांवर वाळू पसरली जाते. सांध्याच्या ठिकाणी शिसे पत्रा (Lead sheet) आ.३ मध्ये दाखविल्याप्रमाणे बसविला जातो.

(ड) अंत्यरूपण : (Finishing). जलावरोधनासाठी कमी खर्चातील इमारत बांधकामामध्ये सिमेंट मसाल्यामध्ये (१:४) जलावरोधक पदार्थ किंवा मिश्रण घालून सपाट छपराच्या पृष्ठभागाला योग्य उतार देऊन बाह्यपृष्ठभागास चकाकी आणतात किंवा सफाईदारपणे घोटला जातो.

उतरत्या छपरासाठी जलावरोधन पद्धती : सामान्यत: उतरत्या छपरामधून (Pitched roof) पावसाचे पाणी गळण्याचे आणि ओलावा येण्याची कारणे पुढीलप्रमाणे : छत आच्छादक साहित्य (Roof covering material) किंवा कौलांमधील अपूर्ण अंतर, छपराचा अपूर्ण उतार, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पन्हळीची (Gutter) अपूर्ण व्यवस्था.

छपराचे बांधकाम योग्य आराखडा, मार्गदर्शन व काळजी घेऊन केल्यास वरीलपैकी पहिली दोन कारणे शिल्लक राहत नाहीत.

आ.३. रुमालेपी अस्फाल्ट व ताग अनुरेखन पद्धती : (१) कठडा भिंत, (२) शिशाचा थर, (३) वाळू, (४) रुमालेपी ॲस्फाल्ट, (५) तागाचे कापड, (६) प्रबलित सिमेंट काँक्रीटची लादी.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीची पन्हळ पुरेशा क्षमतेची, जलाभेद्य व तापमान बदल सहन करून सुस्थितीत राहणारी असावी. पत्रा किंवा कौले पन्हळीच्या कडेच्या पुढे आलेली असावीत तसचे पन्हळीला आणि  वाढवलेल्या कठड्याच्या पृष्ठभागाला आ. ४ मध्ये दाखवल्याप्रमाणे शिशाने द्रुतीकरण (flashing, म्हणजेच शिशाच्या थराने केलेले एक प्रकारचे लेपन) करावे लागते.

पाया व जोते यांसाठीची जलावरोधन पद्धती : साध्या मातीमधील इमारतीच्या पायामध्ये ओल येण्याची शक्यता असते. जमिनीखालील वीट बांधकामातील विटा व मसाल्याचे जोड सच्छिद्र असल्याने शोषून घेतलेले पाणी केशाकर्षण क्रियेने (Capillary action) एका थरातून दुसऱ्या थरात प्रवास करते. परिणामी भिंतीला ओल येते. योग्य ठिकाणी जलावरोधक थर देऊन हा दोष टाळता येतो.

इमारत तळघराशिवाय (Basement) असल्यास जोत्याची पातळी (Plinth level) ही जलावरोधनाची योग्य जागा आहे आणि जोत्याशिवायच्या संरचनेमध्ये जलावरोधनाचा थर जमिनीच्या स्तरापासून (Level) १५० मिमी. अंतरावर द्यावा. यामध्ये ओलावा प्रतिबंधनासाठी बिट्युमेन, रुमालेपी अस्फाल्ट, सिमेंट काँक्रीट, मसाला इ. साहित्य वापरले जाते.

आ.४. उतरत्या छपरासाठी ओलावा प्रतिबंधन पद्धती : (१) मुंडेरी, (२) शिशाचे जलरोधी पटल, (३) शिशाचे पन्हळ, (४) फरशीने आच्छादलेला भाग, (५) stone template stirrup-strap, (६) बंध तुला, (७) G. bearer, (८) सामान्य वासा, (९) P. Rafter

जमिनीसाठी जलावरोधन पद्धती : दमट किंवा ओल्या मातीमधील इमारतीच्या तळमजल्याची जमीन (Floor) व भिंतींना केशाकर्षणामुळे ओल येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये तळमजल्याच्या सर्व क्षेत्रफळावर (भिंतीच्या जाडीसह) ओलावा प्रतिबंधक थर दिला जातो. यासाठी बिट्युमेन नमद्याचा (Felt) वापर केला जातो. याची पद्धती पुढीलप्रमाणे : तयार केलेल्या पृष्ठभागावर प्राथमिक लेप (Primer coat) म्हणून गरम बिट्युमेन (१.५ किग्रॅ./मी.) पसरले जाते. प्राथमिक थरावर बिट्युमेन नमद्याचा एक थर पसरला जातो. त्यावर गरम बिट्युमेन (१.५ किग्रॅ./मी.) अंत्यरूपण थर (Finishing coat) म्हणून पसरले जाते. त्यावर लगेच बारीक वाळूवर सपाट विटांचा थर लावला जातो. त्यावर काँक्रीट करून त्यावर फरसबंदी (Flooring) केली जाते.

आ.५. पाया व जोते यांसाठीची ओलावा प्रतिबंधन पद्धती

तळघरासाठी जलावरोधन पद्धती : तळघराचे जलावरोधन न केल्यास तळघर निरुपयोगी ठरते. याकरिता अस्फाल्ट आर्द्रतारोधन (Asphalt tanking) पद्धती  वापरतात, ती पुढीलप्रमाणे : यामध्ये तळघराच्या जमिनीला व भिंतीच्या बाहेरील बाजूने उभ्या दिशेत ओलावा प्रतिबंधक थर ‍दिला जातो. यासाठी बिट्युमेन नमद्याचा वापर ओलावा प्रतिबंधक साहित्य म्हणून केला जातो. सामान्यत: ज्या ठिकाणी कमी ओलावा येण्याची शक्यता असेल, अशा ठिकाणी दोन थरांमध्ये तर अन्य ठिकाणी तीन थरांत बिट्युमेन नमदा वापरला जातो. ओलावा प्रतिबंधक थर देण्याचे काम खालील टप्प्यांत केले जाते :

तयार केलेल्या पृष्ठभागावर प्राथमिक लेप म्हणून गरम बिट्युमेन (१.५ किग्रॅ./मी.) पसरले जाते. प्राथमिक थरावर बिट्युमेन नमद्याचा एक थर पसरला जातो. त्यावर गरम बिट्युमेन (१.५ किग्रॅ./मी.) लावले जाते. बिट्युमेन नमद्याचा दुसरा थर लावला जातो. गरम बिट्युमेन (१.५ किग्रॅ./मी.) लावून त्यावर बिट्युमेन नमद्याचा तिसरा थर लावला जातो. आडवा ओलावा प्रतिबंधक थर क्षीण काँक्रीट थराच्या (Lean concrete bed) वरच्या गुळगुळीत पृष्ठभागावर लावला जातो. ओलावा प्रतिबंधक थरानंतर लगेचच त्यावर बारीक वाळूमध्ये सपाट विटांचा थर बसविला जातो. उभा ओलावा प्रतिबंधक थर आडव्या ओलावा प्रतिबंधक थराला सलग व जमीन पातळीच्या वर १५० मिमी. पर्यंत तळघराच्या भिंतींना बाहेरील बाजून लावला जातो. झाडांच्या मुळापासून व मातीमधील क्षार व अम्ल यांपासून ओलावा प्रतिबंधक थराचे संरक्षण होण्यासाठी त्याच्या बाहेरील बाजून अर्धा वीट जाडीची भिंत बांधली जाते.

आ.६. जमिनीसाठी ओलावा प्रतिबंधन पद्धती

भिंतीसाठी ओलावा प्रतिबंधन : विटा व मसाल्याच्या जोडामधील सच्छिद्रपणामुळे भिंतीच्या बाहेरील पृष्ठभागाकडून पाणी आतील पृष्ठभागाकडे येते आणि भिंतीला ओल येते. ओलावा  प्रतिबंधनाठी भिंतीच्या पृष्ठभागावर गिलावा, दरजा भ्रणे, रंगकाम इ. विविध प्रकिया केल्या जातात. सामान्य वातावरणात सिमेंट : चुना : वाळू (१:१:६) यांच्या संयुक्त मसाल्याने केलेला गिलावा ओलावा प्रतिबंधनासाठी जास्त प्रभावी ठरतो.  तर जास्त पावसाच्या क्षेत्रात ओलावा प्रतिबंधन पदार्थ/मिश्रण वापरून केलेला सिमेंट मसाला (१:४) गिलावा ओलावा प्रतिबंधनाचे काम करतो. उघड्या वीटकामावर ओलावा प्रतिबंधनासाठी पृष्ठभागावर जलनिरोधक (Waterproof) सिमेंट रंगाने किंवा रंगविरहित जलनिरोधक रसायनाने रंगकाम केले जाते.

आ.७. तळघरासाठी ओलावा प्रतिबंधन पद्धती : अस्फाल्ट आर्द्रतारोधन पद्धती

शौचालय, स्नानगृह आणि स्वयंपाकघर यांसाठी विशेष ओलावा प्रतिबंधन पद्धती : शौचालय, स्नानगृह आणि स्वयंपाकघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. ते पाणी सहजपणे व जलद गमीने वाहून जाणे आवश्यक असते, अन्यथा ते पाणी जमीन व भिंतींमधून पाझारते आणि ओलावा निर्माण होतो. यासाठी भिंती व जमीन जलाभेद्य करण्यासाठी शौचालय व स्नानगृह येथे काचलेपित फरशी (Glazed tile) वापरतात. ही फरशी बसवण्यासाठी १० मिमी. जाडीचा सिमेंट मसाल्याचा (१:३) थर बांधकामावर अथवा काँक्रीटवर दिला जातो. हा थर कठीण झाल्यावर त्यावर सिमेंट राळ (Slurry) पसरून काचलेपित फरशी बसवितात.

सामान्यत: काचलेपित फरशा शौचालय, स्नानगृह आणि स्वयंपाकघर येथे भिंतीवर किमान १ मी. उंचीपर्यंत लावल्या जातात आणि जमिनीसाठी बसविताना थोडासा उतार दिला जातो की ज्यामुळे पाणी सहजपणे व जलदगतीने वाहून जाईल. काचलेपित फरशीमुळे ओलावा प्रतिबंधन होते तसेच भिंत व जमिनीचा आकर्षकपणा वाढतो.

संदर्भ :

  • Arora, S. P.; Bindra, S. P. Text Book of Building Construction, 2010.
  • Kumar, Sushil, Building Construction.
  • वीर, रवींद्र, इमारत बांधकाम , सातारा.

पहा : जलनिरोधन आणि आर्द्रतारोधन.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.