मिळकत व खर्च यांत ताळमेळ राहण्याकरिता कुटुंबाने बनविलेले जमा, खर्च व शिल्लक यांचे अंदाजपत्रक. याचे स्वरूप सरकारी किंवा मोठ्या उद्योगधंद्याच्या अंदाजपत्रकासारखेच, पण लहान प्रमाणात असते. एकीकडे वर्षाची अंदाजी प्राप्ती व दुसरीकडे अन्नखर्च, घरभाडे, वीज, वस्त्रखर्च इत्यादी आवश्यक, ठराविक, नैमित्तिक, सामाजिक व वैयक्तिक खर्च यांचा अंदाज धरून शिल्लक काढली जाते. अर्थात प्रत्यक्ष होणाऱ्या दैनंदिन खर्चाशी वेळोवळी तुलना करून प्रत्येक बाबीवर होणारा खर्च कमीअधिक करता येतो. हे पत्रक म्हणजे कौटुंबिक पातळीवर योजनापत्रकच होय. त्यायोगे कुटुंबे साधारण कोणकोणत्या बाबींवर किती खर्च करतात, याची माहिती मिळते.
कुटुंबे आपले मासिक उत्पन्न कसे खर्च करतात, यासंबंधी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणासही ‘कौटुंबिक अंदाजपत्रक’ म्हणतात. वस्तुत: ती उपभोगखर्चाची अभ्यासपूर्ण सर्वेक्षणेच असतात. कुटुंबसमूहांकडून अथवा प्रतिनिधिक कुटुंबांकडून माहिती गोळा केली जाते. ही अंदाजपत्रके, कुटुंबे ठराविक काळात विशिष्ट प्रकारच्या वस्तूंवर किती खर्च करतात हे दाखवितात. निरनिराळ्या उत्पन्नपातळींवरील विविध व्यावसायिक गटांतील, लहानमोठ्या आकारांच्या आणि विशिष्ट भागांत राहणाऱ्या कुटुंबांकरिता अशी अंदाजपत्रके बनविली जातात. त्यांमध्ये एकूण खर्चाच्या प्रमाणात प्रत्येक बाबीवरील खर्च टक्केवारीने दाखविण्यात येतो. सर्वेक्षणांचा उपयोग अन्नासारख्या उपभोग्य वस्तूंच्या मागणीचा अदमास (अंदाज) घेण्यासाठी, कुटुंबाची उपभोग पातळी व तिच्या प्रवृत्ती ठरविण्यासाठी, त्याच प्रमाणे किमतींमधील बदल सूचित करण्यासाठीही केला जातो. कौटुंबिक अंदाजपत्रकांच्या अभ्यासाचा उपयोग राहणीमानाचा निर्देशांक काढण्यासाठी व त्यांवरून कारखान्यातील मजूर, नोकरवर्ग वगैरेंच्या महागाईभत्ता ठरविण्यासाठी केला जातो. महागाईभत्ता राहणीमानाच्या निर्देशांकाशी निगडित असल्याने तो कमीजास्त होतो. सर्वसाधारण किंमत पातळीत बदल झाला, म्हणजे कामगारांच्या राहणीमानाच्या निर्देशांकात चढउतार होतो व त्यानुसार महागाईभत्यात बदल करावा लागतो.
कौटुंबिक अंदाजपत्रकांचा तौलनिक अभ्यास केला असता असे आढळते की, कुटुंबाचे उत्पन्न वाढले, तरी कुटुंबाचा वेगवेगळ्या बाबींवरील खर्च सारख्याच प्रमाणात वाढत नाही. यासंबंधात एकोणिसाव्या शतकातील सुप्रसिद्ध जर्मन शास्त्रज्ञ अर्न्स्ट एंगेल यांनी प्रशियामधील काही कुटुंबांच्या अंदाजपत्रकांचा तौलनिक अभ्यास करून काही महत्त्वाची सर्वसाधारण अनुमाने काढली. ती ‘एंगेलचा कुटुंबखर्चाविषयीचा नियम’ म्हणून ओळखली जातात. या नियमानुसार ‘कुटुंबाचे उत्पन्न वाढले, तर कुटुंबाचा सर्वच वस्तूंवरील खर्च सारख्याच प्रमाणात न वाढता, अन्नावरील खर्चाचे शेकडा प्रमाण कमी होते आणि सुखसोयी व चैनीच्या वस्तूंवरील खर्चाचे प्रमाण वाढते’. परंतु, एंगेल यांचा हा नियम आफ्रिकेतील अनेक आदिवासी कुटुंबांसाठी लागू होऊ शकत नाही. तसेच कुंटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढले असे गृहित धरले, तरी आज सर्वत्र त्याच प्रमाणामध्ये महागाई वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे येथेही त्यांचा नियम लागू होईलच, असे नाही.
कौटुंबिक अंदाजपत्रकांचा अभ्यास सरकारला नवीन करयोजना तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मोटारी, सिगरेट, रेडिओ, मौल्यवान दागिने, मद्य, विद्युतीय उपकरणे यांसारख्या चैनीच्या वस्तूंसाठी वाढीव उत्पन्न खर्च होण्याचा संभव असतो. त्यांवरील करांचे प्रमाण वाढविण्यात येते.
समीक्षक : संतोष शा. ग्या. गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.