गूटेनबेर्क, योहान : (इ.स. १४०० — ३ फेब्रुवारी १४६८). जर्मन संशोधक. संशोधनाबरोबरच त्यांनी मुद्रण आणि प्रकाशनामधेही योगदान दिले आहे. त्यांना यूरोपातील मुद्रणकलेचे आद्य प्रणेते मानतात. त्यांनी एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज हलवता येणारी चल मुद्रणाची ओळख यूरोपला करून दिली. त्यांच्या या शोधामुळे मुद्रण क्षेत्रात क्रांती घडून आली. त्याचबरोबर ते सुवर्णकारही होते.

गूटेनबेर्क यांचा जन्म  मेंझ, जर्मनी येथे झाला. त्यांचे वडील श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यापारी होते. ते सोन्याचा आणि कापड विकण्याचा व्यवसाय करीत. प्रतिष्ठित लोकांविरुद्ध उठाव झाल्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागले (१४२८). त्यानंतर ते स्ट्रासबर्ग येथे स्थायिक झाले (१४३०—४४). या काळात त्यांनी अरफुर्ट विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी योहान फूस्ट यांच्या भागीदारीत मुद्रणाचा व्यवसाय सुरू केला (१४५०). १४५५ मध्ये त्या दोघांत भांडण होऊन छापखान्याची मालकी फूस्ट यांच्याकडे गेली. याआधी त्यांनी १,२८२ पृष्ठांचे ‘माझारिन बायबल’ छापण्यास सुरुवात केली होती. ते ‘४२ ओळींचे बायबल’ या नावानेही ओळखले जाते. ते लॅटिन भाषेत छापले होते. हे बायबल १४५७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. तथापि मुद्रक म्हणून गूटेनबेर्क यांचे नाव त्यावर नव्हते. इतर अनेक पुस्तकांवर त्यांचे मुद्रक म्हणून नाव दिलेले आढळत नाही, तथापि त्या काळात ते मुद्रणाचा व्यवसाय करीत होते असे निश्चित पुरावे आढळतात. येल विद्यापीठाच्या ग्रंथालयात गूटेनबेर्क यांनी छापलेली प्रत जतन केली आहे. १४६५ मध्ये ते मेंझचे आर्चबिशप आडोल्फ यांच्याकडे नोकरीस राहिले.

मुद्रण यंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर मुद्रण करणे शक्य होते. मुद्रण तंत्रज्ञानात कालानुरूप बदल होत गेले आहेत. बीशेन्ग या चीनी संशोधकाने चल मुद्रणाचा शोध लावला. त्यांनी स्वतंत्र चल अक्षरांची (टाईप सेटींगचे खिळे) योजना केली. त्यामुळे या अक्षरांचा पुनर्वापर करणे शक्य झाले. मातीवर अक्षरे कोरून ती भाजून त्याचा कठीण साचा बनवून त्याला लोखंडी चौकटीत बसवून लोखंडी पाटीवर दाबला जाई. गूटेनबेर्क यांनी या पद्धतीत सुधारण करून लाकडाऐवजी धातूचा वावर केला. तसेच एका मुद्रण साच्याऐवजी स्वतंत्र अक्षरांचा उपयोग केला. त्याचप्रमाणे ही अक्षरे मोठ्या संख्येने उपलब्ध होण्यासाठी त्यांनी प्रतिनिर्मितीच्या पद्धतीचा उपयोग केला. त्यासाठी पितळ या मिश्रणातून उलटी अक्षरे कोरली. त्यातून अक्षरे मिळविण्यासाठी त्यावर वितळलेले शिसे ओतले. अशाप्रकारे एका अक्षरांच्या अनेक प्रती मिळविता आल्या. या मुद्रण पद्धतीत अनेक शोधांचे एकत्रीकरण करण्यात आले होते. चल अक्षरांमुळे पाने जुळविणे सोपे झाले. गूटेनबेर्क यांनी तेलाचा उपयोग करून मुद्रणासाठी शाई बनविली. पाण्यात बनविलेल्या  शाईपेक्षा या शाईचा दर्जा चांगला होता. ही शाई अक्षरावर टाकून तो साचा कागदावर दाबला जाई, या पद्धतीसाठी श्रमांची आवश्यकता असली तरी छपाई वेगाने होत असे. तसेच त्यांनी पंधराव्या शतकात छपाईसाठी वापरता येणारा, सुटसुटीत, टिकाऊ, धातूंपासून बनविलेला टंक बनविला म्हणून त्यांना आधुनिक मुद्रण शास्त्राचे जनक म्हटले जाते.

गूटेनबेर्क यांचे मेंझ येथेच निधन झाले.

कळीचे शब्द : #छपाईचे खिळे #मुद्रणयंत्र #छपाई शाई # तेलबिया यंत्र

संदर्भ :

समीक्षक : सुनीत पोतनीस


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.