जोशी, भालचंद्र गोविंद : ( २५ आगष्ट १९३१ – २८ मे १९९५ ). महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोलकी, तबला, दिमडी, एकतारी, हलगी, संबळ, टाळ वादक. त्यांचा जन्म सोलापूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंद जोशी हे रेल्वे खात्यात तिकीट तपासणीस होते. ते ‘अण्णा’ या टोपणनावाने कला व चित्रपट क्षेत्रात खूप प्रसिद्ध होते. अण्णांनी मार्गदर्शन नसतानाही आपल्या अंगभूत कला कौशल्याने ढोलकी,तबला,दिमडी, एकतारी, हलगी ही वाद्ये लोकप्रिय केली. सुरवातीला काही काळ ते शाळेत गेले. गावात निधन झालेल्या अंतयात्रेसमोर ते हालगी वाजवायचे. स्वतः जातीने उच्चवर्णीय असल्याने अण्णांनी अशी कामे करू नयेत यासाठी घरातून त्यांना सतत विरोध होत असे. परंतु अण्णांना नैसर्गिक वाद्य प्रतिभा स्वस्थ बसू देत नव्हती. ते कोणतेही वाद्य हे वाद्य समजूनच वाजवायचे. पंढरपूर येथील दत्तोपंत मंगळवेढेकर यांना त्यांनी गुरू मानले. परंतु त्यांना त्यांच्याकडे फारसे शिकायला मिळाले नाही. मार्गदर्शन नसतानाही केवळ जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ही वेगवेगळ्या वाद्यांची कला बहरवत ठेवली. मराठी चित्रपट,  हिंदी चित्रपटातील अनेक गाजलेल्या गाण्यांना अण्णांनी वेगवेगळ्या वाद्यांची  वेगळेपण सिद्ध करीत साथ दिली ती अद्वितीय ठरली.

भालचंद्र गोविंद जोशी
वडीलांचे निधन झाल्यावर अण्णा १९५० साली मुंबईत आले. ते गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या घरीच रहायला होते. लताबाईचे अण्णांवर खूप प्रेम होते. अण्णा सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत तबलाच वाजवायचे. तबल्यावर तर प्रभाव होताच परंतु स्वतःच ढोलकी वाजवणे शिकून घेत त्यावर हुकूमत देखील गाजविली. यासाठी त्यांना कोणी गुरू लाभला नाही. तबला सम्राट उस्ताद अहमद जान थिरकवा यांचे कार्यक्रम मागे बसून मन लावून ऐकायचे आणि घरी आल्यावर आवर्जून रियाज करायचे. अण्णा नेहमी म्हणायचे लोककला ही शास्त्रीय संगीताची जननी आहे. अण्णांचा स्वभाव मृदू आणि मितभाषी होता. कोणतेही गाणे कसे वाजवायचे याचा अभ्यासच त्यांनी आत्मसात केला होता. ते तबला, ढोलकी, मृदंग, चिपळ्या ,एकतारी हे वाद्य वाजवताना तल्लीन व्हायचे. अण्णांनी ढोलकीवर वाजवलेले बाई मी पतंग उडवीत होते…( चित्रपट: पडछाया), या रावजी तुम्ही बसा भावजी…( चित्रपट: नाव मोठे लक्षण खोटे ), साडी दिली शंभर रुपयाची…( चित्रपट: वैशाख वणवा) यासह अनेक गाणी प्रचंड गाजली. जेष्ठ लावणी गायिका पद्मश्री सुलोचनाबाई चव्हाण यांच्या दोन लावणीच्या कॅसेट मध्ये अफलातून ढोलकीवादन करून या कॅसेट अजरामर केल्या. अण्णांनी गावची इज्जत  चित्रपटात नित्य वाचे प्रभू नाम घ्यावे…हे भजन चक्क ढोलकीवर वाजवून आपल्यातील नैसर्गिक प्रतिभेचे दर्शन घडवून आणले.
अण्णांनी जेजुरीच्या खंडोबाच्या जागरणासाठी जी दिमडी वाजवली जाते ती हिंदी गाण्यात वाजवून एक वेगळेपण सिद्ध करून दाखवले. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटातील गाण्यांना अण्णांनी विविध वाद्यांची अनोखी साथ संगत दिली. जैत रे जैत या मराठी चित्रपटातील ‘ जांभूळ पिकल्या झाडाखाली…’ या गाण्यात अण्णांनी उत्तम प्रकारे ढोल वाजवला. तर ‘हा  छंद जीवाला लावी पिसे…, तुला पाहते मी तुला पाहते… या गाण्यांसाठी त्यांनी तबलावादन केले. ते ढोलकी,  दिमडी, पखवाज या वाद्यात जबरदस्त पारंगत होते.या सर्वच वाद्यांना तालप्रधान आणि भावपूर्ण वाद्य म्हणून त्यांनी विकसित केले. छोट्या मैफली असोत की मोठे मंच, अण्णांनी प्रत्येक सादरीकरणाला तेवढ्याच आत्मियतेने आणि उत्साहाने ते सामोरे गेले. १९६५ ची घटना आहे, ते रस्त्याने चालताना एकदा एक भिकारी त्यांना रस्त्याच्या कडेला बसून एकतारी वाजवत दिसला. कुतूहलाने त्याच्या जवळ जात त्यांनी त्याला लगेच २० रुपये देत एकतारी हे वाद्य कसे वाजवतात हे आत्मसात करून घेतले.  दुसर्‍या दिवशी शंभर रुपयांची एकतारी विकत आणली आणि एकतारी वाद्य  वाजवणे शिकले. गायिका लता मंगेशकर यांनी गायलेली मीराबाईची भजने अण्णांनी एकतारीवर वाजवली. वाद्य विकत घ्यायचे आणि ते वाजवत बसायचे,  त्यासाठी कोणाकडूनही त्यांना शिक्षण मिळाले नाही. दिल्ली, बनारस,  फरुखाबाद या घराण्याची वादनशैली त्यांना लाभली होती. त्या वादयांवरून तुम्ही प्रेमाने हात फिरवा ते आपोआप सांगेल की कसे वाजवायचे असे ते आवर्जून सांगायचे.
अण्णांनी समाज प्रबोधनपर कार्यक्रमात जसे की दारूबंदी,  प्रौढ शिक्षण या उपक्रमात देखील  ढोलकीवादन केले. ते उत्तम अभिनय देखील करायचे. वाजवताना चांगलेच वाजवायचे हा पिंड त्यांनी जपला होता. दादा कोंडके यांच्या चित्रपटातील ‘ बाई गं मी केळेवाली,  तुम्हाला शोभेल का…’ या गाण्यातील हालगी वादनासाठी अण्णांना दादांनी खास बोलावले होते. त्यांचा अनेक नामवंत संगीतकारासोबत स्नेह होता. या संगीतकारांना ढोलकी, तबला किंवा इतर वाद्य वाजवण्यासाठी अण्णाच हवे असायचे.
तबल्यासोबत ढोलकीला त्यांनी एक स्वतंत्र वाद्य म्हणून ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या वादनात एकच ठेका किंवा लय कधीच नव्हता. लावणी जर गायिका आशा भोसले गाणार असतील तर ढोलकी किंवा तबला वाजवण्यासाठी अण्णा जोशी असावेत हे समीकरणं बनले होते. अण्णांनी लोककलेतील या सर्व वाद्यांना जीवापाड जपले. या सर्वच ताल वाद्यांना नवा आत्मा आणि नवा आयाम दिला. याच मनस्वी कलावंताच्या साधनेमुळे कला,लोककला आणि संगीत क्षेत्रात अण्णांचे नाव अग्रेसर राहिले. त्यांनी लोककलेतील या सर्व वाद्यांना जीवापाड जपले. मनाची जिद्द,चिकाटी आत्मविश्वास या जोरावर या कलावंतांने कलाक्षेत्रात आपले नाव कमावले. त्यांनी असंख्य वाजवलेली गाणी आजही रसिकांच्या मनात गुणगुणत राहतात.  म्हणूनच त्यांना तालांचा बादशहा देखील  म्हटले जाते. अण्णांनी या सर्व वाद्यांना बोटांच्या साथीने अजरामर केले.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.