मंगेशकर, हृदयनाथ : (२६ ऑक्टोबर १९३७). मराठी व हिंदी भावसंगीत तसेच चित्रपटसंगीत यांतील ख्यातनाम संगीतकार व गायक. त्यांचा जन्म प्रख्यात गायकनट मास्टर दीनानाथ मंगेशकर व श्रीमती शुद्धमती ऊर्फ माई या दांपत्यापोटी पुणे येथे झाला. दीनानाथ यांच्या अपत्यांत हे सर्वांत धाकटे (पाचवे) अपत्य. भारतरत्न लता मंगेशकर ह्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका या हृदयनाथांच्या सर्वांत ज्येष्ठ भगिनी होत. तसेच गायिका आशा भोसले, मीना खडीकर व उषा मंगेशकर या त्यांच्या इतर मोठ्या भगिनी संगीतक्षेत्रात प्रसिद्ध आहेत. हृदयनाथांच्या बालपणीच दीनानाथांचे निधन (१९४२) झाल्याने त्यांना वडलांचा फारसा सहवास व प्रत्यक्ष तालीम मिळाली नाही; पण वंशपरंपरेने आलेला संगीतवारसा, शास्त्रीय संगीताची उस्ताद अमीरखाँ यांच्याकडून घेतलेली तालीम, आपल्या समकालीन संगीतकारांच्या स्वररचनांचा हृदयनाथांनी केलेला अभ्यास व स्वतंत्र प्रतिभा यांमुळे सुरुवातीपासूनच हृदयनाथांची एक वेगळी संगीतशैली आकारास आली. त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ‘निसदिन बरसात नैन हमारे’ व ‘बरसे बूंदिया सावन की’ या भक्तिगीतांना स्वरसाज चढविला. ती गीते आजही रसिकप्रिय आहेत. संगीतकार सलील चौधरी यांना गुरुस्थानी मानणाऱ्या हृदयनाथांना त्या वेळच्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या संगीतकारांचा सहवास व काहींची मैत्री लाभली; त्यामुळे त्यांची मूळचीच वेगळी संगीतशैली अधिक विकसित व वैविध्यपूर्ण होत गेली. या शैलीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत तसेच पाश्चिमात्य संगीत यांचा मिलाप होता. या शैलीने विशेषत: भावसंगीताच्या परंपरेला एक सुरेल छेद देऊन, रसिकांसमोर सुरांचे, लयीचे व भावांचे एक वेगळे प्रकटीकरण सिद्ध केले. कशी काळ नागिणी, चांदणे शिंपीत जाशी, तिन्हीसांजा सखे मिळाल्या, दे मला गे चंद्रिके, ये रे घना, जिवलगा राहिले दूर घर माझे, घनतमीं शुक्र राज्य करी, माझे गाणे, ही वाट दूर जाते अशी कित्येक गीते याचे उदाहरण म्हणून सांगता येतील.

हृदयनाथांनी आपल्या विस्तृत संगीत अवकाशामध्ये संत ज्ञानेश्वर, मीराबाई, सूरदास, कबीर आदी संतकवींबरोबरच भा. रा. तांबे, गोविंदाग्रज, स्वा. सावरकर आदी स्वातंत्र्यपूर्व काळातील कवी तसेच आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके, ना. धों. महानोर आदी स्वातंत्र्योत्तर आधुनिक कवी यांच्या विविध रचनांचा समावेश केला. या सर्वांच्या रचनांमधील वैविध्य व विभिन्न भाव समर्थतेने रसिकांपर्यंत पोहोचवले, हे त्यांच्या संगीत-कारकिर्दीतील मोठे यश व सुगम संगीतक्षेत्राला त्यांच्याकडून मिळालेले मोठे योगदान होय. अशा सर्व कवींच्या काव्यातील शब्दांपलीकडचे अमूर्त भाव वेगळ्या सांगीतिक हाताळणीसह स्पंदनशील व श्रुतिप्रधान संगीतरचनांमधून अभिव्यक्त करणे हे त्यांच्या संगीताचे मोठे वैशिष्ट्य आहे. संग्रहातील बंदिशींच्या मुखड्यांचा आधार घेऊन ती बंदिश सुगम संगीतात चपखल वापरून परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम त्यांनी साधला आहे. मोगरा फुलला, ओम नमोजी आद्या, पसायदान, पैल तो गे काऊ कोकताहे, विश्वाचे आर्त अशा ज्ञानेश्वरांच्या कित्येक रचनांचा तसेच रमैय्या बिन नींद न आये, किण्हू संग खेलूं होरी, म्हारा री गिरीधर गोपाल, सांवरा रे म्हारी प्रीत अशा संत मीराबाईंच्या भक्तिरचनांचा ते एक निराळा संगीतप्रत्यय देतात. गालिबच्या गझलांना त्यांच्या स्वररचनांमुळे नवीन परिमाण लाभले. शिवकल्याण राजा ह्या संगीत प्रकल्पामध्ये त्यांनी स्वा. सावरकर, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, कवी भूषण, समर्थ रामदास आदींच्या रचनांना दिलेले संगीत, शिवचरित्रातील सर्व रस व पैलू उलगडणारे ठरले. मी डोलकर, माझ्या सारंगा अशा कोळीगीतांनी तत्कालीन लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कित्येक अर्वाचीन कवींच्या विविध काव्यरचनांना आणि जैत रे जैत, लेकिन, निवडुंग अशा चित्रपटांना दिलेले संगीत यांनी रसिकमनाचा ठाव घेतला आहे. याचे प्रमुख कारण, त्यांची स्वररचना व त्यातील लय ही बहुसंख्य गाण्यांत वक्र व गाण्यास, वाजविण्यास कठीण असली, तरी त्यात रसिकांना विस्मयचकित करणारी सांगीतिक अनपेक्षितता असते. यामुळे रसिकांना एकाच वेळी बौद्धिक व भावनिक आनंद जाणवतो. ही वैशिष्ट्ये हृदयनाथांच्या प्रयोगशील वृत्तीतून व नावीन्याच्या सतत ध्यासातून आलेली आहेत.

हृदयनाथांच्या बहुसंख्य संगीतरचना या स्त्रीस्वरप्रधान आहेत व त्यांपैकी बहुसंख्य त्यांच्या गायिकाभगिनी लता मंगेशकर व आशा भोसले यांनी गायलेल्या आहेत. याशिवाय त्यांनी किशोरी आमोणकर, अनुराधा पौडवाल, पद्मजा फेणाणी, ज्योत्स्ना हर्डीकर, राधा मंगेशकर आदी गायिकांना आणि सुरेश वाडकर, महेंद्र कपूर, अरुण दाते, रवींद्र साठे आदी गायकांना आपल्या संगीत दिग्दर्शनात गाण्याची संधी दिली. त्यांनी अनिल मोहिले, अरुण पौडवाल, अमर हळदीपूर अशा अनेक संगीत-संयोजकांना त्यांच्या गाण्यातील संगतीच्या वाद्यमेळाचे अर्थवाही संयोजन करण्यास मार्गदर्शन केले. हृदयनाथांनी त्यांच्या स्वत:च्या व इतर संगीतकारांच्या संगीतात गायलेली वेगवेगळ्या बाजांची व शैलीची कित्येक भावगीते, भक्तीगीते, चित्रपटगीते लोकप्रिय आहेत.

हृदयनाथांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये लेकिन  या हिंदी चित्रपटाच्या संगीतदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार (१९९०), पं. भीमसेन जोशी व पं. जसराज यांच्या हस्ते ‘पंडित’ ही पदवी, शंकराचार्यांकडून ‘भावगंधर्व’ ही पदवी, शासनाकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार (२००९), सूरसिंगार हे पारितोषिक यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे सुगम संगीत क्षेत्रात कार्यरत असूनही पंडित ही पदवी मिळालेले ते सुगम संगीतातील पहिले कलाकार होत.

त्यांनी खाजगी वाहिन्यांवरील संगीत स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

मराठी नाट्य-चित्रपटांत विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध झालेले दामुअण्णा मालवणकर यांची कन्या भारती या ह्रदयनाथांच्या पत्नी असून त्यांना आदिनाथ, वैजनाथ व राधा ही तीन मुले. पैकी राधा मंगेशकर या हृदयनाथांच्या मार्गदर्शनाखाली गायनक्षेत्रात आहेत.

हृदयनाथांनी ‘हृदयेश आर्ट’ (मुंबई) ही संस्था स्थापन केली असून (२०११) दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत व्यक्तीला हृदयनाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

उत्स्फूर्त व जातिवंत काव्यास स्वत:च्या तितक्याच अभिजात व वैविध्यपूर्ण स्वररचनांनी न्याय देत पं. हृदयनाथ यांनी एकूणच भावसंगीतास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, हे नि:संशय.

समीक्षक – सु. र. देशपांडे

#लता मंगेशकर #आशा भोसले #सुगम संगीत #भावसंगीत

प्रतिक्रिया व्यक्त करा