डीझेनहोफर, जोहान : (३० सप्टेंबर १९४३). जर्मन-अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक प्रथिनांच्या त्रिमितीय संरचना निश्चित केल्याबद्दल त्यांना हार्टगुट मिखेल आणि रॉबर्ट ह्यूबर यांच्यासमवेत  १९८८ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

डीझेनहोफर यांचा जन्म झुसामाल्थियम, बव्हेरिया (जर्मनी) येथे आला. तेथेच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर अठरा महिन्याची लष्करी सेवा देऊन ते भौतिकी विषयाचा अभ्यास करण्यासाठी म्यूनिक येथील टेक्निकल वि‌द्यापीठात दाखल झाले. क्लाउस ड्रान्सफेल यांच्या प्रयोगशाळेत पद‌विकेकरिता संशोधन करीत असताना कार्ल-फ्रेडरिक रेन्क यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले त्यांचे प्रायोगिक कार्य यशस्वी झाले; त्यांनी फिजिकल रिव्ह्यू लेटरमध्ये ते प्रकाशित केले (१९७१). त्यांनी माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री, जर्मनी येथून रॉबर्ट ह्यूबर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी संपादन केली (१९७४). तेथेच त्यांनी आपले पुढील संशोधन कार्य केले. त्यानंतर ते टेक्सास येथील हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूट येथे जीवरसायनशास्त्र विभागात प्राध्यापक पदावर रुजू झालेत (१९८८). तेथे ते २०१० पर्यंत गुणश्री संशोधक म्हणून कार्यरत होते. सध्या ते  युटी साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटर येथे कार्यरत आहेत.

डीझेनहोफर यांनी मिखेल व ह्यूबर यांच्यासमवेत प्रकाशसंश्लेषी जीवाणूंमध्ये आढळणाऱ्या जटिल प्रथिनांचे संशोधन करण्याचे ठरविले. अशा प्रथिनांना ‘प्रकाशसंश्लेषी प्रक्रिया केंद्र’ म्हटले जाते. साध्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया कार्यान्वित होण्याकरिता अशा प्रकाशसंश्लेषी प्रक्रिया केंद्र महत्त्वाची भूमिका बजावतात. जटिल प्रथिने ही १०,००० हून अधिक अणूंनी बनलेली असतात, ही संरचना ठरविण्यासाठी त्यांनी क्ष-किरण स्फटिकविज्ञान पद्धतीचा वापर केला. या संशोधनामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया समजणे सुकर झाले तसेच वनस्पतीतील प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया व जीवाणू यांतील साम्य ओळखणे स्पष्ट झाले.

डीझेनहोफर यांना अमेरिकन फिजिकल सोसायटीचे बॉयॉलॉजिकल फिजिक्स पारितोषिक (१९८६) व ऑटो बायर पारितोषिक (१९८८) प्रदान करण्यात आले आहे. ते ॲकॅडेमी ऑफ यूरोपचे सद‌स्य, तसेच अमेरिकन ॲसोसिएशनचे फेलो आहेत.

कळीचे शब्द : #क्ष-किरण परावर्तन #जीवाणू #प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया केंद्र #नोबेल पारितोषिक

संदर्भ :

  • https://www.britannica.com/biography/Johann-Deisenhofer
  • https://www.mediatheque.lindau-nobel.org/laureates/deisenhofer
  • https://www.nobelprize.org/prizes/chemistry/1988/summary/
  • https://en.wikipedia.org/wiki/Johann_Deisenhofer

                                                                                                          समीक्षक : रंजन गर्गे

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.