आजगावकर, श्रीधर शांताराम : (१७ जून १९०६ — १२ जून १९९४). मधुमेहतज्ञ, संशोधक व विज्ञानप्रसारक. त्यांचा जन्म मालवण (महाराष्ट्र) येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण सांगलीला, तर वैद्यकीय शिक्षण पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून झाले. उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी ते डब्लिन व व्हिएन्नाला गेले. डोळ्यांचे विकार या विषयात प्राविण्य मिळवून ते भारतात परत आले आणि मालवणला आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. जवळपास १५ वर्षे त्यांनी मालवणला वैद्यकीय सेवा दिली.

आजगावकरांना वाचन आणि संशोधन यांची विशेष आवड होती. त्यांचे वडिल आणि चुलते जवळपास १९४५ च्या सुमारास मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त झालेत. तेव्हा भारतात मधुमेहाविषयी फारशी उपचारपद्धती ज्ञात नव्हती. त्यामुळे वेळीच निदान व उपचार न झाल्याने वडी़ल आणि चुलते मधुमेहाला बळी पडले. त्या काळात नुकताच इन्शुलीनचा शोध लागला होता आणि भारतात तो उपलब्धही नव्हता. या घटनेने आजगावकरांमध्ये मधुमेहाविषयी कुतूहल निर्माण होऊन त्यांनी  १९४५ साली मुंबई गाठली. पुढील मार्गदर्शनासाठी ते ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजचे औषधविभाग प्रमुख रा. वि. साठे यांना भेटले. डॉ. साठेंनीही त्यांच्या विचारांना दुजोरा दिला. मधुमेहाचे रुग्ण भारतातही आढळत होते, परंतु उपचार करणाऱ्या वैद्यकांची कमतरता होती. डॉ. साठेंनी आजगावकरांना डोळ्याचा उपचार करण्याचे थांबवून मधुमेहाचा अभ्यास आणि संशोधन करण्याविषयी प्रोत्साहित केले. त्यानंतर आजगावकरांनी आपला वैद्यकीय व्यवसाय थांबवून मधुमेहावर आयुर्वेदात सांगितलेल्या जसद भस्माच्या उपचारपद्धतीवर  अलोपॅथी उपचारपद्धतीने प्रयोग सुरू केले. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने त्यांच्या संशोधनाला १९६० साली मान्यता दिल्यानंतर त्यांनी जे. जे. रुग्णालयात मधुमेहाचे उपचार केंद्र सुरू केले.

आजगावकरांनी मधुमेह म्हणजे काय, त्याची लक्षणे, करावयाच्या चाचण्या, मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम, उपलब्ध उपचारपद्धती, आहारातील पथ्य, योग्य व्यायाम इ. विषयांवर माहिती करून देण्यासाठी भारतभर भ्रमंती केली. फिरस्तीवर असताना ते आपले सरकचित्र प्रक्षेपी (स्लाईड प्रोजेक्टर) घेऊन जात. कालांतराने त्यांना जाणवले की, हे फक्त एकट्याच्याने होणारे काम नाही, त्यासाठी जनसाहाय्य असायला हवे. त्यांच्या पुढाकाराने डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली (१९५५). त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिक्स ही आणखी एक संस्था स्थापली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये ३२ शाखा काढून कार्याची व्याप्ती भारतभर पसरवली. अमेरिकेतील जोस्लिन क्लिनिक हे खास मधुमेह्यांसाठीचे रुग्णालय पाहून प्रभावित झालेल्या आजगावकरांनी १९८१ ला मुंबईत माहीमला २०० खाटांचे मधुमेहांसाठी विशेष रहेजा रुग्णालय सुरू केले.

आजगावकर १९६४ पासून आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्थेचे सभासद होते. त्यांच्या प्रयत्नांनी दिल्लीमध्ये १९७६ मध्ये  आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद भरवली गेली. तेव्हा संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून आणि १९७९ मध्ये अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले. महाराष्ट्रातील मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून ते १९९४ पर्यंत सतत २८ वर्षे ते परिषदेशी निगडित असून त्यांनी  सभासद, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त इ. विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांची  मधुमेहावर मराठी आणि इंग्रजी भाषेत पुस्तके प्रसिद्ध आहेत. मधुमेहासह सहजीवन हे त्यापैकी एक आहे.

आजगावकर यांचे मुंबई येथे निधन झाले.

कळीचे शब्द : #मधुमेह

संदर्भ :

  • फोंडके, डॉ. बाळ; देशपांडे, डॉ. अं. पां. विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश, मुंबई, २००९.
  • फोंडके, डॉ. बाळ; देशपांडे, डॉ. अं. पां. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश खंड ३  भाग १ विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षण, पृ. क्र. ३६, मुंबई, २०१०.

समीक्षक : अनिल गांधी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.