(आलंकारिक कला). अलंकरणाची एक शैली. ही साधारणत: १९१० ते १९२० च्या दरम्यान पश्चिम यूरोपात उदयास आली आणि १९३०च्या दशकात अमेरिकेची एक प्रमुख शैली म्हणून विकसित झाली. ती प्रामुख्याने वास्तुकलेतील सजावटीचे तंत्र, गृहशोभन, वस्त्रकलेतील आकृतिबंध, धातू, लाकूड, मृत्पात्रे यांच्या अलंकरणासाठी वापरली जात असे. परंतु पुढे ही कला दृश्यकला आणि वास्तुकलेतील बांधकाम तंत्रातही प्रसृत झाली. ‘आर्ट डेको’ ही संज्ञा १९२५ मध्ये पॅरिस येथे भरलेल्या ‘इंटरनॅशनल एक्झ‍िबिशन ऑफ मॉडर्न डेकोरेटिव्ह अँड इंडस्ट्रिअल आर्ट्स’ या प्रदर्शनाच्या शीर्षकावरून घेण्यात आली आहे.

आर्ट डेको या शैलीत साध्या, सममिती व टोकदार भूमितीय आकार, चमकदार रंग आणि भव्य साधनसामुग्रीचा (उदा., स्टेनलेस स्टील, क्रोम, काच इ.) वापर करण्यात येतो. त्यामुळे या शैलीतून आधुनिकता, वेग, भव्यता आणि यांत्रिकतेची भावना व्यक्त होते. या शैलीच्या नियोजनात भविष्यातील दृष्टी आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर भर दिला जातो. त्रिकोण, वर्तुळ, आडव्या-तिरप्या आकृत्या यांसारख्या आकारांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. इमारतीचा दर्शनी भाग आणि आतील आरेखनात सममिती हे महत्त्वाचे तत्त्व असते. औद्योगिक आरेखन, यंत्रे आणि वाहतुकीची साधने यांपासून प्रेरणा घेऊन वेग आणि गतीची भावना दर्शविली जाते. तसेच प्राचीन ईजिप्शियन, मेसोपोटेमियन, माया, आफ्रिकन कलांचा प्रभावही या शैलीत दिसून येतो.  न्यू यॉर्क शहरातील अनेक इमारतींमध्ये करण्यात आलेले धातूंचे अलंकरण आणि भूमितीय नमुने यांमध्ये ही शैली दिसून येते. क्रायस्लर इमारतीतील उंच मनोऱ्यातील स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्यांनी बनलेल्या कमानी, रेडिओ सिटी म्यूझिक हॉलच्या वक्र पायऱ्या आणि गोल झुंबर यांवर ही शैली दिसून येते.

आर्ट डेको ही आर्ट नूव्होच्या (नव्य कला) आलंकारिक आणि प्रवाही आकारांना विरोध म्हणून उदयास आली. पहिल्या महायुद्धानंतर ‘रोअरिंग ट्वेन्टीज’ (Roaring Twenties) मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यावर, ही शैली आधुनिकता आणि भविष्याकडे पाहण्याच्या उत्साहाचे प्रतीक बनली. अमेरिकेत महामंदी असूनही अनेक भव्य आर्ट डेको इमारती बांधल्या गेल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात साधारणत: १९४०च्या दशकात तिची लोकप्रियता कमी झाली आणि आधुनिकतावादाने तिची जागा घेतली. तथापि १९६०च्यादशकापासून विशेषतः १९८०च्या दशकात आर्ट डेकोला पुन्हा नवी ओळख मिळाली.

आर्ट डेकोतील वास्तुरचनेतील बांधकामातील सूक्ष्म आरेखनात अधिक साधन सामग्रीचा वापर करण्यात येतो. तसेच कार्यात्मकतेपेक्षा अलंकरणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येते. त्यामुळे तिला अनावश्यक अलंकारिक किंवा अति-व्यावसायिक शैली म्हणून टीका करण्यात आली आहे.

संदर्भ :

समीक्षक : श्रृती बर्वे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.