कस्तुरीरंगन, कृष्णास्वामी : (२० ऑक्टोबर १९४० – २५ एप्रिल २०२५). भारतीय अवकाशशास्त्रज्ञ. जन्म एर्नाकुलम येथे. त्यांचे पूर्वज तमिळनाडूमधून केरळच्या विविध भागांत स्थायिक झालेत. त्यांच्या आजोबांना शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्याने मुलांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घ्यावे असे त्यांचे मत होते. कस्तुरीरंगन वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत आजोबांकडे केरळला राहिलेत, त्यानंतर आपल्या बंधूबरोबर वडिलांकडे ते मुंबईला आले. तेथे त्यांचे शालेय शिक्षण श्रीराम वर्मा हायस्कूलमध्ये झाले. रामनारायण रुईया महाविद्यालयातून त्यांनी मुंबई विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी मिळविली. मुंबई विद्यापीठातून भौतिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथून त्यांनी पीएच.डी. पदवी हाय एनर्जी ॲस्ट्रॉनॉमी या विषयात मिळविली.
कस्तुरीरंजन यांच्या इस्रोमधील कारकीर्दीत भारताला अभिमानास्पद असणाऱ्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे (Polar Satellite Launch Vehicle; PSLV) प्रक्षेपण व कार्यान्वितता आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण वाहनाची (Geosynchronous Satellite Launch Vehicle-GSLV) पहिली उड्डाण चाचणी यांचा समावेश होतो. जगातील सर्वोत्तम असे नागरी उपग्रह IRS-1C व 1D यांचे आराखडे, विकास आणि प्रक्षेपण; दुसऱ्या पिढीचे उपग्रह प्रत्यक्षात आणणे, तिसऱ्या पिढीच्या इंडियन नॅशनल सॅटेलाइट उपग्रहांच्या निर्मितीची सुरुवात तसेच महासागर निरीक्षण उपग्रह इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट-पी ३ / पी ४ उपग्रहांचे प्रक्षेपण हे सर्व त्यांच्याच देखरेखीखाली करण्यात आले. या त्यांच्या प्रयत्नांमुळेच महत्त्वाचे अंतराळ प्रकल्प राबविणाऱ्या मोजक्या सहा देशांमध्ये भारत एक प्रबळ दावेदार म्हणून मान्य पावला. कस्तुरीरंगन यांच्या कार्यामध्ये उच्चऊर्जा क्ष-किरण आणि गॅमा किरण खगोलशास्त्र तसेच प्रकाशकीय खगोल विज्ञानातील संशोधन समाविष्ट आहे. त्यांनी विश्व-किरण क्ष-किरण स्त्रोत, खगोलीय गॅमा-किरण आणि खालच्या वातावरणातील विश्व-किरण क्ष-किरणांच्या प्रभावाच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
कस्तुरीरंगन यांनी इस्रोचे अध्यक्ष (१९९४ — २००३), अंतराळ आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अंतराळ विभागाचे सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या इस्रो येथील नऊ वर्षांच्या कारकीर्दीदरम्यान त्यांनी भारताचा अंतराळ कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविला. त्यापूर्वी ते इस्त्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक होते. तेथे त्यांनी नवीन पिढीच्या उपग्रहांचा विकास, इंडियन नॅशनल सॅटेलाइट (इन्सॅट-२; INSAT-2), इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (IRS-1A व 1B) आणि वैज्ञानिक उपग्रह यांच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. भारताचे पहिले दोन प्रायोगिक भू-निरीक्षण उपग्रह (earth observation satellites) भास्कर एक व दोन यांचे ते प्रकल्प संचालक होते, तसेच भारताच्या इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट -१ ए या पहिल्या दूरस्थ संवेदन उपग्रहाच्या (Indian Remote Sensing Satellites) जडणघडणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कस्तुरीरंगन हे भारतातील आणि परदेशातील अनेक महत्त्वाच्या वैज्ञानिक अकादमींचे सदस्य होते. ते बंगळुरू येथील इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष आणि इंडियन सायन्स काँग्रेसचे सरचिटणीस होते. ते भारतीय विज्ञान अकादमी, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग, ॲस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, नॅशनल टेलिमॅटिक्स फोरम, द इंडियन मिटिओरोलॉजिकल सोसायटी आणि द थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस इ. संस्थांचे फेलो, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एंजिनिअर्सचे प्रतिष्ठित अधिछात्र (फेलो), ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य, इंडियन फिजिक्स अॅसोसिएशन, इंडियन सायन्स काँग्रेस अॅसोसिएशन आणि इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंगचे आजीवन सदस्य आणि एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे आणि केरळ अकादमी ऑफ सायन्सेसचे मानद फेलो होते. ते इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन आणि इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ॲस्ट्रॉनॉटिक्सचे सदस्य होते. त्यांनी काही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय समित्यांचेही अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० समितीचे ते अध्यक्ष होते. सप्टेबर २०२१ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम समितीच्या बारा सदस्य सुकाणू समितीचे ते प्रमुख होते.
कस्तुरीरंगन यांना अभियांत्रिकीतील शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, एरोस्पेसमधील श्रीहरी ओम आश्रम डॉ. विक्रम साराभाई प्रेरित पुरस्कार, खगोलशास्त्रातील एम.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार, उपयोजित विज्ञानातील श्री.एम.एम.चुगानी मेमोरियल पुरस्कार, विज्ञान तंत्रज्ञानातील एच.के.फिरोदिया पुरस्कार, विश्व् भारती-शांतीनिकेतनाचा रविन्द्र पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. अंतराळ क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. एम. एन. साहा जन्मशताब्दी पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तीनही नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांचे खगोलशास्त्र, अंतराळ विज्ञान, अवकाश अनुप्रयोग या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकांमध्ये २०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
कस्तुरीरंगन यांचे बंगळुरू, कर्नाटक येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #इस्रो #पीएसएलव्ही #जीएसएलव्ही #इन्सॅट-२ #आयआरए१ए #आयआरए१बी
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.