(पडवी; क्लॉइस्टर). चर्च, मठ किंवा महाविद्यालयाच्या चौकोनी अंगणाभोवती असणारा कमानधारी बंदिस्त पथ. बंदिस्त अर्थाच्या क्लाउस्ट्रम (claustrum) या लॅटिन शब्दावरून क्लॉइस्टर ही संज्ञा तयार करण्यात आली आहे. विविध संप्रदायांच्या वास्तुशैलीत विशेषत: मठांमध्ये या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
ख्रिस्ती धर्मात कॅथीड्रल, मठ आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या विद्यालत बंदिस्त अंगण असते. अंगणाच्या चारही बाजूंना छत असलेल्या ओवऱ्या असतात. ओवऱ्यांच्या छताला आधार देणाऱ्या स्तंभांवर कमानी असतात. साधारणत: हा भाग संकुलातील इतर इमारतींना जोडण्याचे काम करतो. स्तंभाच्या रांगा आणि नक्षीदार कमानी यांमुळे निर्माण होणाऱ्या छायाप्रकाशामुळे ओवरीची रचना केवळ वास्तूचा मर्यादित भाग न राहता एक सौंदर्यपूर्ण रचना ठरते.
यूरोपमध्ये ओवऱ्या सहासा चर्चच्या दक्षिण बाजूला असतात. चर्चमध्ये भोजनगृह, धर्मगुरूंचे निवासस्थान, खाजगी प्रार्थनास्थळे यांना जोडण्याचे काम ही जागा करते. मठामधील धर्मगुरू आणि इतर यांच्यासाठी ही जागा भौतिक जगापासून वेगळे करणारी आणि ईश चिंतनासाठी मन एकाग्र करण्यास योग्य अशी असते. बायबलमध्ये वर्णन केलेले स्वर्गातील उद्यान म्हणजे असे चहुबाजूंनी बंदिस्त अंगण आहे असे मानले जाते आणि तोच भौतिक जग आणि स्वर्गाला सांधणारा दुवा असेही समजतात.
ओवऱ्यांच्या रचनेत प्रमाणबद्धता महत्त्वाची असते. सहसा हा भाग चौरसाकृती अथवा आयताकृती असतो आणि त्यातील ओवऱ्यांच्या समोरासमोरील बाजू एकसारख्या असतात. रोमन काळातील ओवऱ्यांची रचना पुढे गॉथिक इमारत शैलीतील प्रार्थनागृहे आणि इतर सामाजिक आणि खासगी वास्तूंमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येते. बंदिस्त अंगणाची ही संकल्पना त्या काळी विशेष स्वीकारली गेली. गॉथिक शैलीतील ओवऱ्यांमध्ये द्विकेंद्रित टोकदार कमानी आणि विशेष नक्षीकाम केलेले आढळून येते. शांत, चिंतनासाठी योग्य वातावरण असणारी आणि मठातील व्यक्तींसाठी इतर अनेक दैनंदिन कामकाज करण्यास उपयुक्त अशी ही जागा बहुतांश चर्च मधील मध्यवर्ती ठिकाण असते. ओवरीच्या मध्यभागी असलेल्या अंगणात पाण्यासाठी विहीर अथवा कारंजे असू शकतात. इथल्या बागेमध्ये औषधी वनस्पती आणि फुलांची लागवड आढळते. धर्मगुरू, मठाधिपती, चर्चमधील गायकवृंद किंवा अगदी चर्चमधील कर्मचारी यांची थडगी इथल्या ओवऱ्यांमध्ये किंवा मधील अंगणात असणे प्रचलित होते. अनेक स्मृती लेख, स्मृती शिळा इथल्या भिंतीवर आढळतात.
चर्चमधील ओवऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते आणि ज्येष्ठ धर्मगुरू धर्माचा अभ्यास करतात. ओवऱ्यातील खिडक्यांत विशेष जागा असते, त्याला ‘कॅरोल्स’ म्हणतात. वातारणयोग्य नसल्यास आवारात फिरणे कठीण असल्यास ओवरीतील जागा व्यायाम करण्यासाठी, मोकळेपणे फिरण्यासाठी उपयुक्त ठरते. छपाईयंत्राचा शोध लागण्यापूर्वी चर्चमधील ओवरीच्या जागेत धर्मग्रंथांचे वाचन आणि ते नकलून त्याच्या हस्तलिखित प्रति तयार करण्याचे काम चालत असे. येथे धार्मिक मिरवणूक आणि इतर धार्मिक समारंभ सुद्धा पार पडत. या भागात मुंडन, स्नान इ. आन्हिके सुद्धा उरकत असे. लिखाणासाठी तयार केलेली चर्मपत्रे देखील इथे वाळवली जात.
यूरोपातील मठांप्रमाणे भारतातील बौद्ध मठांमध्येही ओवरीसारखी रचना दिसून येते. बौद्ध भिक्षूंच्या वस्तीची सर्वसाधारण रचना बेनेडिक्टीन मठाप्रमाणे दगडी स्तंभावर बांधलेले साधे झुकते छप्पर असलेले होते. बौद्ध विहारात मठाच्या प्रांगणाशी जुळणारे उघडे अंगण होते, जे लाकडी स्तंभांनी बांधलेल्या झुकत्या छतांनी वेढलेले होते. ही सर्वधारण रचना चर्चमधील ओवरीसारखीच होती. पुढे ओवरीसारख्या या जागेत लहान अभ्यास-खोल्या विकसित केल्या गेल्या. तर मध्यवर्ती अंगणातून बाहेर पडणाऱ्या ओवऱ्यांना कोठड्यांचे स्वरूप देण्यात आले. प्रत्येक प्रकारच्या मठांमध्ये मग ते यूरोपियन असो वा बौद्ध प्रांगणात ओवरी सारखी रचना असल्याचे आढळून येते.
संदर्भ :
- Brown, Percy, Indian Architectur, Bombay, 1959.
- https://www.designingbuildings.co.uk, Accessed on July 25, 2025.
- https://www.numberanalytics.com/blog/ultimate-guide-cloisters, Accessed on July 27, 2025.
- https://www.britannica.com, Accessed on July 27, 2025.
- https://www.kaarwan.com, Accessed on August 5, 2025.
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.