जोशी, ज्येष्ठराज भालचंद्र : (२८ मे १९४९). भारतीय रासायनिक अभियंता आणि अणुशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मसूर या गावी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आताचे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी; रसायन तंत्रज्ञान संस्था; ICT) संस्थेतून रासायनिक अभियांत्रिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी (१९७२) आणि डॉ. मनमोहन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी (१९७७) संपादन केली. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे ते संचालक पदावरही कार्यरत होते होते (१९९९ — २००९).
प्रा. जोशी यांनी रसायनविज्ञान आणि तंत्रज्ञान यांमध्ये अनेक टप्प्याद्वारे विकसित होत जाणाऱ्या क्रियाधानी (रिॲक्टर्स) या क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी विभिन्न अवस्थेत रासायनिक घटक पदार्थांवर प्रक्रिया करणाऱ्या बहुप्रावस्था क्रियाधानी (मल्टिफेज रिॲक्टर्स), यांत्रिक पद्धतीने घुसळणक्रिया करणाऱ्या अणुभट्टीचा, तसेच उच्च दाबाखाली घटक पदार्थांची योग्य वेळी योग्य प्रमाणात शिंपडणी करणाऱ्या यंत्रणांचाही (मल्टिफेज स्पार्ज अँड मेकॅनिकली ॲजिटेटेड रिॲक्टर्स) आराखडा विकसित करण्यात यश मिळविले. तर्कसंगत विचारपद्धती, अंत:प्रेरणा आणि प्रयोगशीलतेतून त्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीमुळे देशविदेशात विविध आकार आणि प्रकारातील कार्यक्षम यंत्रणांचे उत्पादन सुरू झाले.
प्रा. जोशी तंत्रज्ञान संस्थेत संचालक पदावर कार्यरत असतांना त्यांनी देणग्या, विविध उद्योग, प्रकल्पांना विभागाद्वारे केलेले बहुमोल मार्गदर्शन, संशोधनासाठी केलेले करार या उपक्रमाद्वारे मिळणाऱ्या मानधनातून विभागाची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम केली. ही जमा होणारी रक्कम विभागाला मिळणाऱ्या सरकारी अनुदानाच्या दहापट होती. त्यांच्या कार्यकाळात विभागाचा दर्जा सर्वच दृष्टीने उंचावला. जागतिक पातळीवर विभागाने दहावे मानांकन पटकावले. तसेच प्रा. जोशी यांनी विभागाला प्रथम स्वायत्त संस्था आणि त्यानंतर स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळवून दिला. त्यांनी १०७ पीएच.डी, ६० पदव्युत्तर आणि २० पोस्ट डॉक्टरल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ६२६ शोध निबंध लिहिले असून जगातील इतर संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधांचा सु. २५,००० वेळा संदर्भ घेतला आहे. आजवर त्यांनी नाविन्यपूर्ण संशोधनाच्या बळावर १० एकस्वे (पेटंटस) मिळविली आहेत. याबरोबरच त्यांनी संगणकीय द्रायू गतिशीलता (कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्स), यंत्रशास्त्र (मेकॅनिक्स), द्रवाचा बुडबुडा (बबल) तसेच प्रक्षुब्धता (टरब्युलन्स) या क्षेत्रांतही महत्त्वाचे संशोधन केले आहे. अशा अनेक प्रकारच्या संशोधनामुळे अनेक यंत्रांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत आणि कार्यक्षमतेत वाढ झाली. गुंतागुंतीच्या प्रक्रिया समजल्याने त्यांना मोठमोठ्या यंत्रांचे आराखडे विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली.
प्रा. जोशी यांनी उद्योग जगतात वापरल्या जाणाऱ्या प्रवाही पदार्थांचे पृथक्करण, अपस्करण (dispersion) अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियांच्या संदर्भातील भौमितिक मोजणी या संबंधात अचूक सांकेतिक संज्ञा तयार केल्या. तसेच त्यांनी लेसर डॉप्लर पवनवेगमापी (लेझर डॉप्लर ॲनिमोमीटर), तप्त पटल पवनवेगमापी (हॉट-फिल्म ॲनिमोमीटर), स्वनातीत पवनवेगमापी (अल्ट्रासाउंड ॲनिमोमीटर) या उपकरणांच्या वापर प्रक्रियेतील घटक पदार्थांचे वहन, तापमान, तसेच तीव्रता यांचे मोजमाप करण्यासाठी केला. त्याचप्रमाणे या उपकरणांद्वारे अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा अभ्यास करून सुयोग्य तर्कशास्त्रीय पद्धती विकसित केल्या. या उपकरणांचा वापर आणि गणितीय पद्धती यांच्या समन्वयाने त्यांनी रासायनिक प्रक्रिया सुरू असताना त्यातील पदार्थांची गती, ऊर्जा यासारख्या क्रियांमध्ये होणाऱ्या बदलांचे सखोल पूर्वानुमान करण्याची पद्धत विकसित केली, त्यामुळे योग्य आकार आणि विविध प्रकारच्या उपकरणांची निर्मिती आणि त्यांचा यशस्वी वापर शक्य झाला. त्यांनी पाणी, आम्ल आणि अल्कली यामध्ये नायट्रोजन ऑक्साईडचे शोषण या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. त्यांनी तयार केलेले कूकर आणि स्टोव्हचे आराखडे मोठ्या प्रमाणात समाजात वापरले जाऊ लागले. विज्ञानाबद्दल समाजात जागृती व्हावी म्हणून दर वर्षी २०० कार्यशाळांचे केलेले आयोजन आणि त्यातील सहस्त्रावधी लोकांचा सहभाग हे त्यांचे फार मोठे सामाजिक कार्य आहे. भारतीय रासायनिक कारखान्यांचा विकास करण्यामध्ये त्यांनी नेतृत्त्व दिले आहे. मराठी विज्ञान परिषदेचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत.
प्रा. जोशी यांना प्राप्त झालेल्या अनेक सन्मानापैकी काही मानसन्मान पुढीलप्रमाणे : इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी (इन्सा) तर्फे देण्यात येणारे यंग सायन्टिस्ट ॲवॉर्ड, अमर डायकेम पदक, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स ॲवॉर्ड, हर्डीलिया ॲवॉर्ड, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, युडिसिटी डायमंड म्हणून निवड, वैश्विक ॲवॉर्ड, डॉ.के.जी.नाईक सुवर्णपदक, गोयल फाऊंडेशन ॲवॉर्ड, विश्वकर्मा पदक, डॉ. अंजी रेड्डी इनोव्हेशन ॲवॉर्ड, इन्सातर्फे दिले जाणारे झैद झहीर पदक, रिसर्च.कॉम इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन इंडिया लीडर ॲवॉर्ड इत्यादी. त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल भारत सरकाने २०१४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने समन्मानित केले आहे.
प्रा. जोशी अनेक संस्थांच्या सल्लागार समितीवर असून अनेक संस्थाचे अधिछात्रही (फेलो) आहेत. नुकतीच त्यांची नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरींग या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सभासद म्हणून निवड झाली. सेवानिवृत्तीनंतर होमी भाभा राष्ट्रीय संस्थेच्या होमी भाभा अध्यासनाचे ते मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि आताही ते तेथे कार्यरत आहेत.
कळीचे शब्द : #रिॲक्टर्स, #मल्टिफेज स्पार्ज अँड मेकॅनिकली ॲजिटेटेड रिॲक्टर्स #कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्स
संदर्भ :
- https://asmedigitalcollection.asme.org
- https://www.ictmumbai.edu.in
- https://www.mkcl.org
- https://research.com/u/jyeshtharaj-b-joshi
- https://en.wikipedia.org
समीक्षक : श्रीनिवास केळकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.