भारतातील सांख्यिकीय संशोधनातील एक प्रमुख संस्था. या संस्थेची सुरुवात प्रेसिडेंसी महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व प्रसिद्ध सांख्यिकीतज्ज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस व त्यांचे काही सहकारी यांनी एका छोट्या सांख्यिकी प्रयोगशाळेत केली. संस्थेची स्थापना १७ डिसेंबर १९३७ रोजी झाली; मात्र १८६० च्या संस्था नोंदणी अधिनियम क्र. XXI अंतर्गत, भारतीय सांख्यिकीय संस्थेची नोंदणी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर आधारित २८ एप्रिल १९३२ रोजी एका गैर सरकारी सामाजिक संस्थेमध्ये औपचारिकपद्धतीने झाली. सर एन. मुखर्जी हे या संस्थेचे प्रमुख अध्यक्ष, तर महालनोबिस हे मानद सचिव होते. पुढे १९६१ च्या पश्चिम बंगाल सोसायटी अधिनियम XXVI अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली.

संस्थेचे मुख्यालय सुरुवातीपासूनच कोलकाता येथे असून दिल्ली, बेंगळूरू, चेन्नई आणि तेजपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये संस्थेची केंद्रे आहेत. बहुतेक संशोधन आणि प्रशिक्षणविषयक कार्य हे मुख्यालय आणि या चार केंद्रांच्या ठिकाणीच केले जाते. या ठिकाणी मूलभूत आणि सामाजिक शास्त्रातील नवीन संशोधन क्षेत्रामध्ये सांख्यिकी सिद्धांताच्या उपयोजनांबरोबरच ईशान्येकडील राज्यांच्या सांख्यिकीय गरजांची पूर्तता करण्यासाठी सांख्यिकीय कर्मचारी प्रशिक्षण केंद्र स्थापित केले गेले. यांव्यतिरिक्त संस्थेची गिरिडीह येथे कृषी व सामाजिक संशोधनाला समर्पित शाखा असून कोईमतूर, हैदराबाद, मुंबई व पुणे येथे सांख्यिकी गुणवत्ता नियंत्रण आणि संक्रिया संशोधन यांसंबंधित कार्य केले जाते.

संस्थेला अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आणि समर्पित विद्वानांकडून सहकार्य लाभले. महालनोबिस यांच्या प्रभावामुळे भौतिकशास्त्राचे विद्यार्थीही सांख्यिकीमध्ये रस घेऊ लागले. स्थापनेच्या पहिल्या दोन दशकातच आयएसआयने अग्रगण्य कार्यक्रमांचे एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये देशातील काही महत्त्वाच्या आणि थेट समस्यांवरील उपाय सांख्यिकीच्या उपयोजनांद्वारे शोधून काढण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमांमध्ये अनेक नाविण्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश होता. उदा., पिकांच्या उपजांचे नमुना सर्वेक्षण आणि जमिनीचा वापर, बंगालच्या दुष्काळाचे सामाजिक-आर्थिक परिणाम (इ. स. १९३४-४४), पुराच्या समस्येवरील संशोधन इत्यादी. महालनोबिस यांनी सुरू केलेल्या सैद्धांतिक संशोधनाची परंपरा नंतर जे. एम. सेनगुप्त, एच. सी. सिन्हा, रामचंद्र बोस, समरेंद्र एस. बोस, एस. एन. रॉय, के. आर. नायर, के. किशन, चिंतामणी नागेश रामचंद्र राव या तरुण सांख्यिकीतज्ज्ञांनी पुढे चालविली. यामध्ये समरेंद्र एस. बोस यांचे कार्य सर्वांत उल्लेखनीय होते. महालनोबिस यांचे नवप्रर्वतक व पद्धतशीर संशोधन पुढे सांख्यिकीमध्ये शास्त्रीय बनून विदेशातही वेगवेगळे किर्तीमान प्रस्थापित झाले.

संस्थेने संशोधन क्षेत्रात यश संपादन केले असून त्यात पुढील घटकांचा समावेश दिसून येतो.

  • मूलभूत आणि सामाजिक शास्त्रांमध्ये सांख्यिकी आणि संभाव्यतेच्या अनुप्रयोगासह सर्व सुविधायुक्त संशोधन आणि प्रशिक्षण शाळेची स्थापना केली.
  • पहिल्या आंतराष्ट्रीय सांख्यिकीचे नियतकालिक संख्याचे प्रकाशन सुरू केले.
  • देशासाठी व्यापक प्रमाणावर सामाजिक-आर्थिक आकडेवारी गोळा करण्यात गुंतलेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या विभागाची उभारणी केली.
  • देशाच्या विविध औद्योगिक केंद्रांवर गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याकरिता सांख्यिकी गुणवत्ता नियंत्रण कक्ष (स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल युनिट) उभारले.
  • आशिया आणि आफ्रिकेतील सरकारी सांख्यिकीतज्ज्ञांना प्रशिक्षित करण्यासाठी आंतराष्ट्रीय सांख्यिकी संस्थेसह सहकार्य स्थापित केले.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महालनोबिस आणि आयएसआय यांना देशाच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली. त्या वेळी संस्थेने द्वितीय पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी पूर्णपणे समर्पित अशा नियोजन विभागाची स्थापना केली. महालनोबिस आणि त्यांच्या सहकार्यांनी तयार केलेल्या नियोजन प्रारूपाला भारताच्या आर्थिक नियोजनात एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणून ओळखले जाते. याबरोबरच संस्थेने १९५६ मध्ये विद्युतीय संगणक स्थापित करून १९६६ मध्ये पूर्णपणे ट्रांजिस्टरिज्ड विद्युतीय संगणकाची निर्मिती करून उल्लेखनीय कामगिरी केली.

उद्दिष्टे ꞉ संस्थेने १९६४ मध्ये संस्थेच्या ज्ञापन पत्रात (मेमोरँडम) सांख्यिकीय क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासंदर्भात पुढील महत्त्वाची उद्दिष्टे ठरविली होती ꞉

  • राष्ट्रीय विकास आणि सामाजिक कल्याणाकरिता, विशेषत꞉ नियोजन समस्येच्या विशेष संदर्भात, सांख्यिकीचे ज्ञान व अभ्यासाला पुरस्कृत करणे, सांख्यिकीय सिद्धांत व अभ्यासपद्धती विकसित करणे, सांख्यिकीचा संशोधन आणि व्यावहारिक उपयोग करणे.
  • मूलभूत व सामाजिक शास्त्रांच्या संशोधन विषयांत सांख्यिकी आणि संबंधित विज्ञानाचा उपयोग करणे.
  • नियोजन व व्यवस्थापनाच्या उत्पादन क्षमतेत सुधारणा करण्याकरिता माहितीचे संकलन, तपासणी, प्रकल्प आणि सक्रिय संशोधन (ऑपरेशन रिसर्च) करणे.

नेहरू यांनी संसदेत भारतीय संवैधानिक अधिनियम १९५९ पारित करून आयएसआय या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय संस्थेची नियुक्ती केली. यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र व जबाबदारी वाढून सांख्यिकी, मूलभूत विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांच्या परस्परसंबंधाच्या हितासाठी अनेक विज्ञान एकके तयार करण्यात आली. संस्थेने १९६० मध्ये सांख्यिकीमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी, १९९६-९७ मध्ये परिमाणात्मक अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी, २०००-०१ मध्ये गणितामध्ये पदवी (ऑनर्स), २००३-०४ मध्ये गणितामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले. तसेच एक व दोन वर्षांचे नवनवीन पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. १९९५ मध्ये आयएसआय कायद्यामध्ये दुरुस्ती करून संस्थेला पदवी प्रदान करण्याचा अधिकारही प्राप्त झाला.

भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली १९५० पासून आंतरराष्ट्रीय सांख्यिकी शिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदर केंद्रांद्वारे प्रामुख्याने मध्य पूर्व, दक्षिण व दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिकेचे राष्ट्रकुल देश इत्यादी विकसनशील देशांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. सांख्यिकी आणि संबंधित विषयांमध्ये विविध अल्पकालीन अभ्यासक्रमदेखील केंद्राद्वारे चालविले जातात.

संस्थेला प्रारंभिक काळापासून आतापर्यंत सर रॉनल्ड एल्मर फिशर, जोन व्हायोलेट रॉबिन्सन, डेव्हिड ग्रास, जोसेफ स्टिग्लिट्झ, जेम्स ए. गिरलीज, एरिक एस. मास्किन, ई-इची नेगीशी इत्यादी जगविख्यात शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते यांनी अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. संभाव्यतेच्या सिद्धांतासाठी २००७ मध्ये गणितातील प्रतिष्ठित एबल पुरस्कारप्राप्त आणि संस्थेचे माजी विद्यार्थी श्रीनिवास एस. आर. वर्धन यांचे योगदानही संस्थेसाठी फार मोठे आहे.

संस्थेच्या परिसरात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकरिता वसतीगृह, मनोरंजन, वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. कोलकत्ता येथील केंद्रीय ग्रंथालयात सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, संगणक विज्ञान, भूगर्भविज्ञान, जैवविज्ञान, भौतिकशास्त्र, व्यावहारिक गणित व गुणवत्ता नियंत्रण इत्यादी विषयांसंबंधित ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. प्रमुख तांत्रिक प्रकाशनासंबंधित माहिती व महाजालकांवरील नियतकालिके यांची सुविधाही ग्रंथालयात उपलब्ध आहे. तसेच ग्रंथालयाच्या ‘संग्रहालय’ विभागात प्रतिष्ठित व्यक्तींची पत्रे, अभ्यागतांची छायाचित्रे व विविध अहवाल काळजीपूर्वक संग्रहित केलेली आहेत. महालनोबिस यांनी संस्थेच्या इतिहास आणि क्रियाकलापांवर तसेच भारतातील सांख्यिकीय विज्ञानाच्या वाढीसाठी कायमस्वरूपी संग्रहालय स्थापन करण्याची योजना आखली होती.

संस्थेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण, संशोधन, सांख्यिकी, गणित, संगणक विज्ञान, अर्थशास्त्र, उद्योग इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे व करीत आहेत.

संदर्भ ꞉ Indian Statistical Institute, ‘Prospects 2019-20’, Kolkata, 2019.

समीक्षक ꞉ ज. फा. पाटील


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.