‘हरिपाठ’ ही संत ज्ञानेश्वर विरचित सत्तावीस अभंगांची मालिका आहे. यामध्ये नऊ-नऊ अभंगांचे तीन गट आहेत. ‘हरिपाठा’ला ‘वारकऱ्यांची संध्या’ असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरांप्रमाणे नामदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यांचेही हरिपाठ प्रचलित आहेत. नामदेव, निवृत्ती, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांचा ‘पंचरत्नी हरिपाठ’देखील प्रसिद्ध आहे. मात्र वारकऱ्यांच्या नित्यपठणात ज्ञानेश्वरांचाच ‘हरिपाठ’ आहे. मूळ सत्तावीस अभंगांच्या मालिकेनंतर अठ्ठाविसावा अभंग तुकारामांचा येतो. ‘नामसंकीर्तन साधन पैं सोपें’ या तुकारामांच्या अभंगाने ‘हरिपाठा’ची समाप्ती होते. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’ यांप्रमाणे ‘हरिपाठा’तही अद्वैत भक्ती अधोरेखित केली आहे.
हरिनामसंकीर्तन हा सर्वजनसुलभ भक्तिमार्ग असून त्याद्वारे मुक्ती प्राप्त करता येते, हे ‘हरिपाठा’चे मुख्य प्रतिपाद्य आहे. योगसाधना, यज्ञविधी, व्रतवैकल्ये, जपजाप्य, तीर्थयात्रा, तप आदी दुर्गम साधनांच्या मागे न लागता केवळ नामस्मरण करावे, असे ‘हरिपाठा’त म्हटले आहे. ‘योगयाग विधी येणें नव्हे सिद्धी’ (५.१) असे स्पष्ट केले आहे. हरी, राम, कृष्ण, विष्णू, रामकृष्ण, शिव ही सर्व नावे एकच परमोच्च अस्तित्वाची निदर्शक आहेत. ते परमोच्च तत्त्व निर्गुण, निराकार, अव्यक्त आहे. सांख्यांनी सांगितलेल्या पंचवीस तत्त्वांचा मेळ घालणारे आहे. ‘सात पांच तीन दशकांचा मेळा। एकतत्त्वी कळा दावी हरी’ (२३.१) असे ‘हरिपाठा’त म्हटले आहे. हरिकृपेने अज्ञानाचा निरास होतो व अद्वैताचे ज्ञान होते. ‘एक हरी आत्मा जीवशिवसमा’ (२.३), ‘सर्वांघटी राम भाव शुद्ध’ (१५.३), ‘सर्वांघटी पूर्ण एक नांदे’ (७.४), ‘हरी दिसे जनीं आत्मतत्त्वी’ (६.४) असे अद्वैत ज्ञानेश्वर सूचित करतात. ‘व्यवहार लटिका’ (२७.२) असल्याने ‘निवृत्ती काढी, सर्व माया तोडी’ असा उपदेश केला आहे. निर्गुणाची उपासना सगुणाद्वारा केली जाते. नाम हे गगनाहून वाड, व्यापक असल्याने नामानेच सालोक्यता, सामीप्यता, सारूप्यता व सायुज्यता अशा चारही मुक्ती साधल्या जातात, हे ‘हरिपाठा’चे सूत्र आहे. हे निर्गुणतत्त्व मला निवृत्तीनाथांनी दिले, असा उल्लेख ‘हरिपाठा’त आहे (१७.४). गुरुकृपेबरोबरच (५.२) सत्संगतीची (६.४) गरज ‘साधूचे संगती तरणोपाय’ (५.४) अशा शब्दांत व्यक्त केली आहे. ‘संताचे संगती मनोमार्गें गती। आकळावा श्रीपती येणें पंथें॥’ (८.१) असे स्पष्टपणे म्हटले आहे. अशा मार्गक्रमणाने देह पवित्र होतो; तो स्वतःच नव्हे, तर त्याचे मातापिता व सगोत्रही परमात्मस्वरूप होतात. ‘प्रपंचाचे धरणें तुटतें’ (४.४), यमाचा पाहुणा असलेल्या मनुष्याचे कुळगोत्र यम वर्जतो आणि त्यासाठी शस्त्र, साधन आहे–हरिनाम. त्यावाचून जपतप-कर्मधर्म व्यर्थ होय. येथे सर्वाधिक महत्त्व आहे, ते भावभक्तीला. ‘भावेंवीण देव न कळे निःसंदेह। गुरुवीण अनुभव कैसा कळे॥’ (५.२), ‘भावबळे आकळे येऱ्हवीं नाकळे’ (१२.२), असे म्हटले गेले आहे. जात, वित्त, गोत्र, कुलशील (२४.३) इत्यादी बाबी आड न येता नामाची गोडी सर्वांस सहज शक्य आहे, सोपी आहे. षट्दर्शनांनी सांगितलेली ‘सर्वसुखगोडी’ कळते ती ‘मौन जपमाळ अंतरी’ असल्यानेच. त्यामुळे संजीवनसमाधी शक्य होते, असे ‘हरिपाठा’च्या अखेरीस म्हटले आहे. ‘मनोमार्गे गेला तो येथे मुकला। हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य॥’ (१८.३) हे सार आहे आणि त्यास अद्वैतकुसरीचे–कलेचे–(१५.१) अधिष्ठान आहे. ‘नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा। वायां आणिका पंथा जासी झणी॥’ (२६.३) असा परखड उपदेश येथे आला आहे. ‘हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं।’ (६.४) या वचनातून ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादाचे दर्शनदेखील घडते.
संदर्भ :
- देगलूरकर, धुंडामहाराज, ‘हरिपाठविवरण अर्थात भक्तिशास्त्र’, नांदेड, १९७१.
- देशमुख, न. बा. (संपा.), ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’, भाग दुसरा, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २०२२.
समीक्षक : श्यामसुंदर मिरजकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.