अद्वैतवेदान्त तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना. आदिशंकराचार्यांनी ‘बादरायणा’च्या ‘ब्रह्मसूत्रां’वरील भाष्याच्या सुरुवातीस ‘अध्यास’ या संकल्पनेचे विस्तृत विवरण केले आहे. ‘ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे’ असा अद्वैताचा सिद्धांत आहे. परंतु व्यवहारात इतर अनेक गोष्टी खऱ्याप्रमाणे भासत असतात. ‘आत्मा अकर्ता, अभोक्ता आहे’ असे श्रुती सांगतात; तर व्यवहार करताना प्रत्येक मनुष्य ‘मी जाणणारा, मी कर्म करणारा, मी फळ भोगणारा’ असे समजत असतो. श्रुतिप्रामाण्य आणि प्रत्यक्ष अनुभव यात भासणारा हा विरोध नाहीसा करण्यासाठी आणि व्यवहाराची सिद्धी करण्यासाठी अद्वैतवेदान्तात अध्यासाचा स्वीकार केला आहे. एक ब्रह्मच सत्य आहे; परंतु ते तसे न भासता वेगळ्याच रूपाने भासते हा सिद्धान्त पटवून देण्यासाठी रज्जुसर्प, शुक्तिरजत ही लौकिक व्यवहारातील उदाहरणे वेदान्तशास्त्रात दिली जातात. थोड्याशा अंधारातील ठिकाणी पडलेली रज्जू म्हणजे दोरी ही सापासारखी वाटते. अंधारामुळे काही तरी पडले आहे असे वाटते; पण काय पडले आहे ते नीट कळत नाही. दोरी ही दोरी म्हणून समजत नाही, ती साप आहे असे वाटते. दोरीवर सर्पाचा हा आरोप म्हणजेच अध्यास होय. थोडक्यात, एका वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा आणि तिच्या धर्मांचा केलेला आरोप म्हणजे अध्यास होय. ‘स्मृतिरूप: परत्र पूर्वदृष्टावभास:’ (पूर्वी पाहिलेल्या वस्तूचे दुसऱ्या ठिकाणी होणारे स्मरणात्मक भान) अशी त्याची व्याख्या शंकराचार्यांनी केली आहे. अध्यासामध्ये दोन पदार्थ असतात. एक अधिष्ठान ज्यावर आरोप केला जातो उदा., रज्जू आणि दुसरा आरोपित पदार्थ. उदा., साप. यापैकी आरोपित पदार्थ हा मिथ्या असतो आणि अधिष्ठान हे सत्यच असते. ‘भ्रमाचे अधिष्ठान नेहमी सत्य असते’ हा अद्वैतवेदान्ताचा महत्त्वाचा सिद्धान्त आहे. हे सत्य असणारे अधिष्ठान जसे आहे तसे भासत नाही याला कारण म्हणजे अज्ञान. ते नाहीसे झाले की, अध्यास, आरोपित पदार्थ नाहीसा होतो. दोरीचे दोरी म्हणून ज्ञान झाले की, तेथे भासणारा साप नाहीसा होतो. परंतु जोपर्यंत दोरीवर सर्पाचा अध्यास कायम असतो, तोपर्यंत भीती, कंप इत्यादी विकार पुरुषाच्या अंत:करणात निर्माण होतात. त्याचप्रमाणे सच्चिदानंद, अद्वितीय ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी जोवर प्रपंचरूपी अध्यास आहे, तोवर सर्व विकारांचे अस्तित्व आहे. अज्ञान दूर झाले की, प्रपंच नाहीसा होतो. मात्र सर्प-रज्जू दृष्टान्तामध्ये साप जसा भ्रम आहे, तसा प्रपंच हा भ्रमात्मक नाही. जग हे प्रतीत होत असल्याने ते असत् म्हणजे खोटे नाही, तसेच ते कायमस्वरूपी टिकणारे नसल्याने (ब्रह्मज्ञान झाल्यावर) सत्-ही नाही. म्हणून अद्वैतवेदान्तात त्याला मिथ्या असे संबोधले आहे. मिथ्या म्हणजे ज्याला सत्-ही म्हणता येत नाही, असत्-ही म्हणता येत नाही. अर्थात, अनिवर्चनीय. अध्यासालाच अविद्या व मायाही म्हटले जाते. ही अविद्या किंवा माया अनिवर्चनीय अशा अर्थाने असते की, ती ब्रह्माशी एकरूप मानता येत नाही किंवा ब्रह्मापेक्षा अलगही मानता येत नाही. ब्रह्माविना जग असणार नाही; पण जगाच्या अस्तित्वाने ब्रह्माच्या स्वरूपात फरक पडणार नाही. हा तर्कही अध्यास संकल्पनेने स्पष्ट होतो.
अध्यास हा अनेक प्रकारचा आहे. ब्रह्मावर जगाचा जसा अध्यास होतो, तसा आत्म्यावर इतर वस्तूंच्या धर्माचा भास होतो. स्फटिकाच्या जवळ तांबडा पदार्थ ठेवला असता, स्फटिकाचे ज्ञान होत असूनही जवळच्या पदार्थाचा धर्म, जो तांबडा रंग याचा त्याच्यावर भास होऊन स्फटिक तांबडा आहे असा भास निर्माण होतो, त्याप्रमाणेच आपल्या जवळ असणारे स्त्री-पुरुष सुखी किंवा दुःखी असताना, त्यांच्या सुख-दुःखांचा ‘मी सुखी आहे’, ‘मी दुःखी आहे’ अशा रीतीने आपल्यावर भास होतो. तसेच ‘मी लठ्ठ आहे’, ‘मी बारीक आहे’; ‘मी काळा आहे’, ‘मी गोरा आहे’, अशा रीतीने शरीराच्या धर्मांचा आपल्यावर भास होतो. ‘मी आंधळा आहे’, ‘मी मुका आहे’ असा इंद्रियांच्या धर्मांचा भास होतो. तसेच ‘मी इच्छा करतो’, ‘मला संशय वाटतो’ असा मनाच्या धर्मांचाही भास होतो. अशा रीतीने मनुष्य देहाच्या धर्मांचा, इंद्रियांच्या धर्मांचा आणि अंत:करणाच्या धर्मांचा आत्म्यावर अध्यास करतो. त्यामुळे मनुष्याला कर्तृत्व, भोक्तृत्व प्राप्त होते. शंकराचार्यांच्या मते लौकिक व्यवहारच नव्हे, तर शास्त्रीय (म्हणजे वेदप्रामाण्यावर आधारित) व्यवहारही अध्यास किंवा अविद्येवर आधारित असतात. लौकिक व्यवहार प्रत्यक्ष वगैरे प्रमाणांच्या साहाय्याने चालतो. त्यात ज्ञानेंद्रियांचा अध्यास आत्म्यावर होतो. शास्त्रीय व्यवहारात आत्म्याचे पारलौकिक स्वरूप मान्य केलेले असते. त्याचबरोबर ब्राह्मण, क्षत्रिय अशी वर्णीय ओळख हा शास्त्रीय व्यवहाराचा महत्त्वाचा भाग असतो. आत्म्याचे खरे स्वरूप ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे भेदांच्या पलीकडे असते. ते खरे स्वरूप शास्त्रीय व्यवहारात झाकले जाते. अविद्येचे कार्य दुहेरी असते. असलेले स्वरूप झाकणे (अपवाद) आणि नसलेले स्वरूप पुढे आणणे (अध्यारोप). ही अविद्येची दोन्ही कार्ये लौकिक आणि शास्त्रीय अशा दोन्ही व्यवहारांत घडत असतात. अशा रीतीने अनादिकालासून चालणारा हा अज्ञानमूलक अध्यास लोकप्रसिद्ध आहे. सर्व अनर्थांचे बीज असणाऱ्या या अध्यासाचे निरसन होऊन आत्मैक्याचे ज्ञान प्राप्त करून देणे हाच वेदान्तशास्त्राचा हेतू आहे, असे शंकराचार्यांनी ‘अध्यासभाष्या’त म्हटले आहे.
ब्रह्म हे वास्तवाचे खरे स्वरूप असून त्यावर जीवाचा अध्यास होतो. तो नेमका कसा समजून घ्यायचा याचा शोध नंतरच्या वेदान्ती आचार्यांनाही चालू ठेवलेला दिसतो. यातून वेदान्ताचे मुख्यत: तीन संप्रदाय पुढे येतात. ‘वार्तिक’कार सुरेश्वर यांनी आभासवादाचा पुरस्कार केला. त्यानुसार जीव हा खरा नसून ब्रह्माच्या ठिकाणी होणारा आभास आहे. ‘पंचपादिका’कार पद्मपाद व ‘विवरण’कार प्रकाशात्मा या आचार्यांनी प्रतिबिम्बवादाचा पुरस्कार केला, तर ‘भामती’कार वाचस्पतिमिश्र हे अवच्छेदवादाचे पुरस्कर्ते मानले जातात. जसे घटातील आकाश अर्थात घटाकाश हे घटाने मर्यादित झालेले आकाश आहे असे आपल्याला वाटते; पण ते खरे नसते. मुळात आकाश हे कशानेही मर्यादित होत नाही. त्याप्रमाणे जीव हे अविद्येने ‘मर्यादित’ झालेले ब्रह्म असते.
संदर्भ :
- अभ्यंकर, वासुदेवशास्त्री, ‘शांकरब्रह्मसूत्रभाष्य’, संस्कृत विद्या परिसंस्थान, पुणे, २०१०.
 - चाफेकर, नलिनी, ‘वेदान्तसार’, ठाणे, १९९४.
 - दीक्षित, श्रीनिवास, ‘भारतीय तत्त्वज्ञान’, कोल्हापूर, २००२.
 
समीक्षक : प्रदीप गोखले
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.