भारतातील सर्वांत प्राचीन ग्रंथालयांपैकी एक इतिहासप्रसिद्ध ग्रंथालय. ते तमिळनाडू राज्यात तंजावर (तंजावूर) जिल्ह्याच्या मुख्यालयी आहे. शहाजी महाराजांचे पुत्र आणि छ. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी (कार. १६७५-१६८४) यांनी येथील नायक राजांच्या गृहकलहात यशस्वी हस्तक्षेप करून १६७५ मध्ये तंजावर मिळवले. तेव्हापासून तंजावर संस्थान भोसले घराण्याच्या ताब्यात आले. १८५५ पर्यंत तेथे मराठेशाहीचा अंमल होता. व्यंकोजींनंतर पुढे त्यांच्या वंशजांनी, ज्यात शहाजी दुसरे (शाहराजे), सरफोजी, तुकोजी, एकोजी उर्फ बाबासाहेब, प्रतापसिंह, तुळाजी (तुळजाजी), अमरसिंह, दुसरे सरफोजी, शिवाजी यांनी, तंजावर मराठा साम्राज्याचा वारसा चालवला. तंजावरचे सर्वच राजे विद्या-कलांना आश्रय देणारे होते. यांमध्ये सरफोजी राजे दुसरे (१७७७-१८३२) हे तंजावरच्या भोसले घराण्यातील एक कलाभिज्ञ राजा म्हणून प्रसिद्ध पावले. त्यांच्याच कारकिर्दीत (१७९८-१८३२) सरस्वती महाल ग्रंथालय समृद्ध झाले.

सरफोजी यांना सी. एफ. श्वार्टस या मिशनरी गृहस्थांकडून इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन इत्यादी पाश्चात्त्य तसेच मराठी, तेलुगू, हिंदी, उर्दू या भारतीय भाषांचे शिक्षण मिळाले. सरफोजी सत्तेवर आले तेव्हा भारतातील बहुतांश एतद्देशीय राज्ये इंग्रजाच्या ताब्यात गेली होती. तशीच तंजावरची राजवटही नामधारी राहिली होती. तथापि सरफोजी यांनी तंजावरच्या सांस्कृतिक विकासाकडे आपले लक्ष अधिक केंद्रित केले. यामध्ये सरस्वती महाल ग्रंथालय उल्लेखनीय होय. मूळच्या चोल राजांच्या ग्रंथ संग्रहात नायक राजांनी भर घातली. सरफोजी यांनी ‘सरस्वती महाल’ ही नायक राजांच्या काळात बांधलेली आणि राजवाड्याचा भाग असलेली भव्य इमारत ‘ग्रंथालय’ म्हणून नावारूपास आणली. या ग्रंथालयाची संकल्पना व्यापक होती. जगभरातील ग्रंथ मिळवून ते भाषांतरित करणे, वेगवेळ्या विषयावरील ग्रंथ नकलून घेणे असे काम या ग्रंथालयाच्या निमित्ताने झाले. सरफोजी यांनी दरबारातील विद्वानांच्या मदतीने संस्कृत ग्रंथ, काव्ये, नाटके, टीका वगैरे लिहून घेतल्या. तसेच प्राचीन ताम्रपट, ताडपत्रे, भूर्जपत्रे यांचा मोठा संग्रह केला.
सरस्वती महाल ग्रंथालयातच सरफोजी यांनी देवनागरी खिळ्यांचा छापखाना उभारला (१८००). या छापखान्याचे नाव ‘नवविद्या कलानिध्यभिरव्या छापखाना’ असे ठेवण्यात आले. मराठीतील पहिले पुस्तक छापण्याचे श्रेय याच छापखान्याकडे येते; तथापि याची नोंद नसल्यामुळे याबद्दल नेमके संदर्भ मिळत नाहीत. तथापि या छापखान्यात १८०९ साली छापलेली एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’ आणि ‘युद्धकांड’ ही पुस्तके तारखेनुसार उपलब्ध आहेत. सरफोजी यांनी सरस्वती महालमध्ये शिल्प, चित्र आणि साहित्य यांचा मोठा संग्रह केला. त्यांनी दोन हजारहून अधिक सैनिकांना सोबत घेऊन केलेली ‘काशीयात्रा’ प्रसिद्ध आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो हस्तलिखित ग्रंथ मिळवले. ती हस्तलिखिते या ग्रंथालयात संगृहीत आहेत.

ग्रंथालयात संस्कृतमधून मराठीत अनुवादित केलेले ‘गजशास्त्र’, ‘अश्वशास्त्र’ हे ग्रंथ आहेत. सरफोजींना वैद्यकीय क्षेत्राविषयी प्रचंड कुतूहल होते. त्या विषयी त्यांनी धन्वंतरी महाल या संस्थेतर्फे १८ खंडात्मक एक वैद्यकीय संशोधनावर ग्रंथ लिहून घेतला. यासाठी त्यांनी या विषयाची जगभरातून मोठी ग्रंथसंपदा संकलित केली. सरस्वती महालमध्ये सरफोजी राजांनी जमवलेली छापील इंग्रजी पुस्तके, नियतकालिकेही पाहायला मिळतात. शिवाय विविध हस्तलिखिते आणि छायाचित्रांचा मोठा संग्रहही येथे जतन करण्यात आला आहे. येथील संग्रही असेलेली चित्रे तत्कालीन समाजजीवनाबरोबरच नैसर्गिक रंगांच्या अभ्यासाचे मोठे साधन आहेत.
सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये ४९ हजाराहून अधिक हस्तलिखित ग्रंथ आहेत. यामध्ये संस्कृत, तमिळ आणि मराठी ग्रंथांचा समावेश आहे. मराठी हस्तलिखित ग्रंथांचा प्रचंड संग्रह हे या ग्रंथालयाचे एक वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी प्रसिद्ध असलेल्या करुप्पूर कापडात (सुती वस्त्रात) हे ग्रंथ सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. ग्रंथाच्या आकारानुसार लाकडी कपाटे बनवून हे सर्व ग्रंथ सांभाळण्यात आले आहेत. यामध्ये तत्त्वज्ञान, वाङ्मय, संगीत, वैद्यक आणि विविध शास्त्रांचे ग्रंथ आहेत. याबरोबरच तंजावरच्या भोसले राजांनी लिहिलेली अनेक नाटके या ग्रंथालयात आहेत. या नाटकांपैकी अनेक नाटके सरस्वती महाल ग्रंथालयाने प्रसिद्ध केली आहेत. येथील हस्तलिखित ग्रंथ हा संस्कृत भाषेचा मोठा ठेवा आहे. मंत्रशास्त्र, भविष्य, वेदविद्यांपासून ‘रामायण’, ‘महाभारत’ अशा महाकाव्यांच्या शेकडो रचना येथे आहेत. ‘महाभारत’ आणि ‘रामायणां’च्या अनेक प्रती आहेत आणि या प्रत्येकांतील कथा मात्र वेगवेगळ्या आहेत. माधवस्वामींच्या ‘महाभारता’च्या १०१ आणि ‘योगवासिष्ठा’च्या ५ प्रती आहेत. तसेच या संग्रहालयात ‘ज्ञानेश्वरी’च्या २२, तर ‘विवेकसिंधू’च्या २० प्रती मिळतात. ‘एकनाथी भागवता’च्या १५ प्रती मिळतात. ‘दासबोधा’च्या १४ प्रती असून त्यांतील ३ तमिळ भाषांतरित आहेत.

सरस्वती महाल ग्रंथालयातील हस्तलिखिते त्यांतील ग्रंथाचा कागद, लेखनपद्धती, हस्ताक्षर, शाई, ग्रंथावर केलेली चित्रकला, शीर्षकपृष्ठावरील चित्रे, त्यांची रंगसंगती आणि ग्रंथाचा आकार यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. यामध्ये ‘भागवत’ आणि ‘महाभारता’वरील मराठी रचनांच्या पुस्तकासाठी केलेली चित्रकला विशेष अभ्यसनीय आहे. सोनेरी रंगाचा वापर हे या चित्रांचे खास वैशिष्ट्य असून सु. अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वीच्या हस्तलिखित ग्रंथातील ही चित्रकला आणि त्यावरील रंग अद्यापि सुस्थितीत आहेत. येथील हस्तलिखित ग्रंथांमध्ये ग्रंथाच्या शेवटी ग्रंथ लिहून घेणारा, लिहिणारा, ग्रंथलेखनाचा काल आणि स्थळ यासंबंधीचा मजकूर दिसतो. सरस्वती महाल ग्रंथालयाने मराठी हस्तलिखित ग्रंथांची सविस्तर यादी सहा भागांत प्रसिद्ध केली आहे. ही यादी वेदान्त, ‘महाभारत’, ‘रामायण’, ‘भागवत’, इतिहास, काव्य, नाट्य, कहाण्या, कथा, स्तोत्रे, कोश, निघंटू, वैद्यक, कामशास्त्र, संगीत, धार्मिक आणि संकीर्ण अशा विषयांनुसार बनवण्यात आलेली आहे. या ग्रंथालयातील काही ग्रंथ सरस्वती महाल ग्रंथालयाने, तर काही ग्रंथ महाराष्ट्रातील अभ्यासकांनी संपादित करून प्रसिद्ध केले आहेत.
हस्तलिखित ग्रंथांबरोबर मराठी भाषेतील मोडी दप्तर या ग्रंथालयात आहे. येथील राजांनी मोडी लिपी राज्यकारभाराची लिपी म्हणून वापरली. मोडीमध्येही काही ग्रंथ शब्दबद्ध केले गेले आहेत. यांपैकी सरफोजी राजांच्या प्रवासाच्या हकिकतींचे दप्तर वाचनीय आहे. सु. दोन लाख पंच्चावन हजार मोडी कागदपत्रे येथे उपलब्ध असून तंजावर राज्यकर्त्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कार्यावर प्रकाश टाकणारी ही कागदपत्रे महत्त्वाची आहेत. या ग्रंथालयात पंडित विभाग, सुरक्षा विभाग, सूक्ष्मचित्रण विभाग, प्रकाशन विभाग, मुद्रण विभाग, बांधणी विभाग, संदर्भ विभाग असे विविध विभाग आहेत. शिवाय स्वतंत्र वस्तूसंग्रहालयही आहे.
सरस्वती महाल ग्रंथालयाचे ‘The Journal of the Tanjore Maharaja Serfoji’s Saraswati Mahal Library’ हे त्रैमासिक मुखपत्र आहे. यात येथे संग्रही केलेल्या विविध भाषांतील हस्तलिखित ग्रंथांसाठी काही पाने देण्यात येतात. त्यानुसार मराठी विभागाच्या पृष्ठांवर येथील निवडक ग्रंथांची काही पृष्ठे क्रमाने प्रसिद्ध करण्यात येतात. पुढे तो ग्रंथ त्रैमासिकात पूर्ण प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे ग्रंथरूप ग्रंथालयाच्यावतीनेच प्रसिद्ध करण्यात येते. हे ग्रंथालय सरफोजी महाराजांनी स्थापन केले असल्याने त्याचे सांप्रत नामकरण ‘तंजोर महाराजा सरफोजी दुसरा सरस्वती महाल’ असे करण्यात आले आहे. सध्या तमिळनाडू सरकारकडे हस्तांतरित झालेले हे ग्रंथालय पर्यटक आणि अभ्यासकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. भारत सरकारने या ग्रंथालयाला ‘राष्ट्रीय महत्त्वाचे संस्थान’ (Institution of National Importance) म्हणून दर्जा दिला आहे.
संदर्भ :
- Gode, P. K., Journal of Saraswati Mahal Library, Vol., 1, Tanjore, 1940-41.
- जोशी, वसंत, संपा., ‘दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा इतिहास : तंजावर खंड, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, १९९७.
समीक्षक : अवनीश पाटील
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.