(बिशप चर्च). ख्रिश्चन पंथांच्या बिशपाचे चर्च. ते बिशपाच्या नेतृत्वाखालील असणारे प्रशासकीय मुख्यालय असून बिशपांना तेथे अधिकृतपणे बसण्याचे आसन असते. ग्रीक शब्द काथेड्रा पासून कॅथीड्रल हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ आसन असा होतो. बिशपांचे आसन चर्चमध्ये वेदीच्या (अल्टार) मागच्या बाजूला उंचावर आणि भाविकाभिमुख असते, अशा चर्चला कॅथीड्रल म्हटले जाते. विशेषतः फ्रान्समध्ये मध्ययुगीन काळातील कॅथीड्रल सहसा शहराच्या मध्यभागी होते आणि सार्वजनिक जीवनाचे केंद्र म्हणून काम करत होते. बाजारपेठा व बैठका तसेच दैनंदिन सेवा तेथे आयोजित केल्या जात होत्या. कॅथीड्रल हे बिशपच्या धार्मिक अधिपत्याखाली असणाऱ्या प्रदेशातील सर्व चर्चमधील मुख्य चर्च असून, त्याची वास्तू सहसा सर्वात प्रशस्त असते. चर्च कायद्यात कॅथीड्रलची विशिष्ट रचना निर्दिष्ट केलेली नाही. वास्तूला कॅथीड्रलचा दर्जा देण्याचा अधिकार पोपला असतो.
बहुतेक कॅथीड्रल्स क्रॉसच्या आकारात बांधलेले असतात. मुख्य प्रवेशद्वार क्रॉसच्या तळाशी बहुतेकदा पश्चिम दिशेला असतो. स्तंभान्वित दालन हे साधारणत: प्रवेशद्वारापासूनच सुरू होते आणि त्याच्या मध्यवर्ती प्रशस्त भागाला नेव्ह म्हणतात . नेव्हला काटकोनात छेदणाऱ्या भुजांना ट्रान्सेप्ट म्हटले जाते. भाविक नेव्ह आणि ट्रान्ससेप्ट्समध्ये एकत्र येतात. वेदी आणि गायनस्थळ (क्वायर) यांची जागा नेव्हच्या पूर्व टोकाला एप्सच्या अर्धवर्तुळाकार क्षेत्रासमोर असते. प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा एप्सच्या मागे असते, त्याला ॲम्ब्युलेटरी म्हणतात. ॲम्ब्युलेटरीमध्ये अनेक चॅपल्स असू शकतात. बिशपाचे आसन सहसा वेदीच्या एका बाजूला असते.
वास्तुविशारदांनी गेल्या काही वर्षांत कॅथीड्रलच्या मूलभूत आराखड्यात बदल केले आहेत. उदा., १६०० च्या दशकातील वास्तुविशारदांनी चर्चमधील सर्व भाविक वेदी पाहू शकतील अशा प्रकारे अत्यंत लहान ट्रान्ससेप्ट असलेले कॅथीड्रल आरेखित केले होते. तथापि, बहुतेक आधुनिक कॅथीड्रलमध्ये मध्ययुगीन आरेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत.
कॅथीड्रल इमारतीच्या बांधकामाच्या मोठ्या पर्वाची सुरुवात यूरोपमध्ये मध्ययुगात साधारणत: सु. १००० ते १५०० दरम्यान झाली. मध्ययुगीन कॅथीड्रल साधारणत: भाविकांना प्रेरीत करण्यासाठी आणि ख्रिस्ती धर्माच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी बांधल्या गेल्या, त्यामुळे त्या भव्य होत्या. कॅथीड्रल विविध शिल्पांनी सजवलेले असत. त्यांच्या भिंती चित्रांनी किंवा अभिरंजित काचांच्या खिडक्यांनी तयार करण्यात आल्या होत्या. त्यांवर बायबलमधील दृश्ये आणि संतांच्या जीवनाचे चित्रण होते. अक्षरओळख नसलेल्या अनेक भाविकांसाठी या दृश्यांनी मध्ययुगीन ज्ञानाचा एक दृश्य विश्वकोश बनविला होता.
बायझंटीन काळात कॅथीड्रलवर, स्वर्गाचे रूप मानल्या गेलेल्या घुमटाची योजना करण्यात येऊ लागली. रोमन साम्राज्यातली कॅथीड्रल सहसा शहरात असत आणि त्यावरून ते शहर ‘कॅथीड्रल सिटी’ म्हणून ओळखले जात असे. रोमनेस्क काळातील कॅथीड्रल हे सहसा रुंद दगडी भिंतींचे आणि कमी उंचीचे होते. त्यानंतर गॉथिक काळात कॅथीड्रल उंच, भरपूर प्रकाश असणारी, पट्ट्याच्या कमानी (Ribbed vaults) आणि चर्चच्या उंचीला बाहेरून आधार देणाऱ्या उडत्या कमानी ( Flying Buttresses) यांनी सुशोभित केलेली होती. त्यात विविध रंगीत काचा वापरून ख्रिस्ताच्या कथा दर्शवणाऱ्या तावदानांची विशेष योजना केली होती. बाराव्या शतकानंतर कॅथीड्रल जगभरात बांधली जाऊ लागली. कॅथीड्रल हे त्या भागातील सर्वात महत्त्वाचे चर्च असल्याने प्रार्थना आणि सण तिथे मोठ्या प्रमाणावर आणि समारंभपूर्वक साजरे केले जातात.
सोळाव्या शतकात कॅथॉलिक पंथ नाकारून काही प्रदेशात प्रोटेस्टंट पंथाची सुरुवात झाल्यावर एकूणच ख्रिस्ती धर्मगुरूंच्या मुख्य बिशप, बिशप इत्यादी पदव्यांना नाकारले गेले. प्रोटेस्टंट चर्चमध्ये बिशपाचे आसन जरी नसले तरी तिथल्या पूर्वापार अस्तित्वात असलेल्या कॅथीड्रलना अजूनही ‘कॅथीड्रल’ असेच संबोधले जाते.
समाजातील श्रेष्ठी आणि धनिक यांच्या समाधी कॅथीड्रलमध्ये असतात. तसेच प्रत्येक कॅथीड्रलशी अनेक धार्मिक यात्रा निगडित असतात. त्यांच्या विशाल आकारामुळे आणि एकूणच त्याच्या महत्त्वामुळे कॅथीड्रलमध्ये त्या त्या भागातील महत्त्वाची व्याख्याने, संगीत सभा, पदवीदान समारंभ यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. कॅथीड्रल त्या भागातील बहुदा सर्वांत जुनी आणि सलग वापरात असलेली वास्तू असते. त्या भागातील वारसा, संस्कृती आणि सार्वजनिक जीवन याच्याशी त्याची नाळ जोडलेली असते. विविध काळात बांधलेली कॅथीड्रल त्या त्या काळातील वास्तुकलेची, कलाकुसरीची, दर्शक असतात.
प्रसिद्ध कॅथीड्रल्स : पश्चिम यूरोपातील अनेक कॅथीड्रल्स त्यांच्या भव्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. फ्रान्स मध्ये काही सर्वांत भव्य कॅथीड्रल्स आहेत, ज्यामध्ये अमियन्स, चार्टर्स, पॅरिस, रीम्स आणि स्ट्रासबर्गमधील कॅथीड्रल्सचा समावेश आहे. लंडनमधील सेंट पॉल कॅथीड्रल आणि कॅन्टरबरी, सॅलिसबरी, लिंकन आणि यॉर्क येथील कॅथीड्रल ही सर्वात मोठी कॅथीड्रल आहेत. इतर प्रसिद्ध यूरोपियन कॅथीड्रल्समध्ये जर्मनीतील कोलोन कॅथीड्रल आणि इटलीतील मिलान कॅथीड्रल यांचा समावेश आहे. स्पेनमधील सेव्हिल कॅथीड्रल हे यूरोपमधील सर्वांत मोठे कॅथीड्रल आहे. अमेरिकेतील उत्कृष्ट कॅथीड्रल्समध्ये न्यू यॉर्क शहरातील सेंट जॉन द डिव्हाईन आणि सेंट पॅट्रिक कॅथीड्रल यांचा समावेश आहे. ‘मेरी, क्वीन ऑफ द वर्ल्ड बॅसिलिका’ हे मॉन्ट्रियलमधील एक प्रसिद्ध कॅनेडियन कॅथीड्रल आहे. मेक्सिको सिटीमधील मेट्रोपॉलिटन कॅथेड्रल १५०० च्या दशकातील आहे आणि उत्तर अमेरिकेतील सर्वांत जुने आहे.
संदर्भ :
- https://www.britannica.com/topic/cathedral-Christian-church
- https://en.wikipedia.org/wiki/Architecture_of_cathedrals_and_great_churches
- https://www.englishcathedrals.co.uk/cathedrals/about-cathedrals/what-is-a-cathedral/
समीक्षक : श्रुती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.