प्रस्तावना : शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला विशिष्ट जंतू ओळखण्याकरिता आणि त्यांच्याशी लढण्याकरिता प्रशिक्षण देऊन विशिष्ट रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी लस देण्याची प्रक्रिया म्हणजे लसीकरण होय. जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण मिळण्याकरिता लस दिली जाते. लसीकरणामुळे अनेक घातक रोगांचे उच्चाटन झाले असून अनेक रोग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आजाराची किंवा रोगाची तीव्रता लक्षात घेऊन त्यावर औषधोपचार केला जातो. आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. परंतु काही आजार किंवा रोग असे असतात ज्यांचे औषध घेऊन किंवा शस्त्रक्रिया करूनही निराकरण होत नाही आणि त्यांचा प्रसार खूप वेगाने होण्याची शक्यता असते व त्यामुळे मृत्युदर हा झपाट्याने वाढू शकतो. या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी संशोधन करून त्यावर परिणामकारक लस निर्माण करावी लागते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उपचारांपेक्षा प्रतिबंध घालणे अधिक योग्य. लसीकरणामुळे देवीसारख्या रोगांचे उच्चाटन (eradication) झाले आहे. तसेच पोलिओ हा आजारदेखील पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
लसीकरणाचे फायदे :
- रोग प्रतिकारशक्ती वाढवते : जंतुसंसर्गापासून बचाव करण्यासाठी शरीराच्या नैसर्गिक बचावासाठी सक्रिय प्रतिकारशक्ती निर्माण करते.
- रोगाचे ओझे कमी करते : लसीकरणमुळे संसर्गजन्य रोगांच्या घटना; रोगाचा प्रादुर्भाव (incidence), तीव्रता आणि गुंतागुंत लक्षणीय प्रमाणात कमी होण्यास साहाय्य होते.
- जीव वाचवते : लसीकरण गोवर, घटसर्प आणि डांग्या खोकला यांसारख्या आजारांपासून जागतिक स्तरावर लाखो बालकांच्या मृत्यूंना प्रतिबंधित करते. (त्रिगुणी लस; triple vaccine)
- समूहाची प्रतिकारशक्ती वाढवते : व्यापक लसीकरण रोगाचा प्रसार मर्यादित करून संपूर्ण समुदायांचे संरक्षण करते.

अ] बालकांमधील लसीकरण : लहान बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांचे संरक्षण जास्त महत्त्वाचे असते म्हणूनच बालमृत्यूदर कमी करण्याचे प्रमुख उद्दिष्ट साधण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार बालकांचे लसीकरण वेळोवेळी पूर्ण करून घेणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. जन्मानंतर बाळाची काळजी घेण्याबरोबर बाळाला लगेचच स्तनपान सुरू करणे आवश्यक असते. कारण स्तनपान हीच बाळाची पहिली लस असते. स्तनपान करणे हे आईच्या आणि बाळाच्या दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सूचनेनुसार लसीकरण
- बी.सी.जी. लस : जन्मानंतर लगेचच बी.सी.जी. लस दिल्याने बालकांचे क्षयरोगापासून संरक्षण होते.
- पोलिओ लस : जन्मानंतर लगेचच पोलिओची झीरो डोस दिला जातो. त्यानंतर जन्माच्या ६व्या, १०व्या आणि १४व्या आठवाड्यात पोलिओचा अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा डोस दिला जातो. बाळ दीड वर्ष व पाच वर्षाचे झाल्यानंतर दोन पूरक डोस देतात. (एकूण तोंडावाटे ६ + २ पोलिओ लशीचे पुरक डोस दिल्याने बालकांना पोलिओपासून १००% संरक्षण मिळते.
- हिपॅटायटिस ‘बी’ लस : या लशीचा जन्मानंतर २४ तासाच्या आत शून्य मात्रा दिली जाते.
- पंचसंयुजी लस (pentavalent vaccine; ५ लशींचा समूह) : १) ही लस यकृताच्या रोगापासून बचाव करते. पंचसंयुजी लस ही त्रिगुणी लशीला पर्यायी लस म्हणून आलेली आहे. २) ही लस घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, विषाणूजन्य कावीळ आणि इन्फ्ल्यूएंझा ताप या आजारांविरोधात रोग प्रतिकारक शक्ती तयार करण्याचे काम करते. (DPT and Hepatitis B ) ३) या लसीचे बालकाच्या वयाच्या सहाव्या, दहाव्या व सोळाव्या आठवड्यानंतर अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा डोस दिला जातो. ४) त्रिगुणी लसीचे (DPT) १६ महिन्यांनंतर एक आणि ५ वर्षांनंतर एक असे दोन पूरक डोस दिले जातात. ५) पी. सी. व्ही. लस (Pneumococcal Conjugate Vaccine) : बालकास वयाच्या सहाव्या आठवड्यानंतर देतात. तसेच या लशीचा पूरक डोस १२ महिन्यानंतर दिला जातो. या लशीमुळे न्यूमोनिया, मेनिंनजायटिस, कानात पू होणे यांसारख्या आजारांपासून संरक्षण होते.
- कांजिण्या लस (Varicella Vaccine) : ही लस कांजिण्यांच्या प्रतिबंधासाठी दिली जाते. लशीचा पहिला डोस १५ महिन्यानंतर, तर दुसरा डोस त्यानंतर तीन महिन्यांनी दिला जातो.
- रोटाव्हायरस : बालकाच्या जन्मानंतर सहाव्या, दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यांनंतर अनुक्रमे या लशीचा पहिला, दुसरा व तिसरा डोस दिल्याने बालकाचे अतिसारापासून संरक्षण होते.
- मिझल्स व रुबेला लस : बालकाच्या वयाच्या नवव्या आणि सोळाव्या महिन्यानंतर या लशीचा अनुक्रमे पहिला व दुसरा डोस दिल्याने बालकांचे गोवर आणि रुबेला पासून संरक्षण होते.
- जापनिझ इन्केफलायटिस लस (Japanese Encephalitis vaccine) : जन्मानंतर नऊ महिन्यानंतर पहिला डोस आणि सोळा महिन्यानंतर दुसरा डोस दिल्याने मेंदूज्वरपासून बचाव होतो.
- जीवनसत्त्व अ : लसीकरण वेळापत्रकानुसार जन्मानंतर नवव्या महिन्यापासून पाच वर्षापर्यंत जीवनसत्त्व अ चे नऊ डोस दर सहा महिन्यांनी दिल्याने मुलांचे डोळे निरोगी राहतात.
- मुलांच्या योग्य शारीरिक व बौद्धिक वाढीसाठी लोह आणि फोलिक अम्ल आवश्यक असून त्यासाठी वयाच्या सहा महिन्यांपासून पाचव्या वर्षापर्यंत आठवड्यातून एक वेळा फोलिक अम्लाचे औषध दिले गेले पाहिजे.
- याबरोबरच वयाच्या एक वर्षानंतर आठवणीने दर सहा महिन्यांनी वयानुसार योग्य प्रमाणात कृमीनाशक (Deworming) औषध सुद्धा दिले गेले पाहिजे, त्यामुळे त्यांच्या पोटात कृमी होत नाही.
ब] किशोरवयातील लसीकरण : १) मुले व मुली यांना दहा व सोळा वर्षांत धनुर्वात रोधक लस दिल्याने त्यांचे धनुर्वातापासून संरक्षण होते. २) तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध १४-१८ वयोगटातील मुलींना एच. पी. व्ही. लस घेता येते.
क] गरोदरपणातील लसीकरण : गरोदरपणाच्या सुरुवातीला १२ आठवड्याच्याआत धनुर्वात रोधक (टी.टी./टी.डी.) लशीचा पहिला डोस आणि त्यानंतर चार आठवड्यानंतर दुसरा डोस दिल्याने प्रसूतीदरम्यान धनुर्वातापासून संरक्षण मिळते.
लसीकरण कार्यक्रमांतर्गत परिचारिकेची भूमिका :
- परिचारिका पालकांना आणि समुदायाला लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगते.
- परिचारिका योग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण करते, अंत:क्षेपणासाठी (injection) योग्य मार्ग आणि जागा सुनिश्चित करते, जे लशीच्या प्रभावासाठी आणि रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आहे.
- लस तापमानाला अत्यंत संवेदनशील असल्याने, त्यांचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी योग्य तापमानात साठवणूक आणि वाहतूक केली जाते याची खात्री करण्यात परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात.
- एखाद्या व्यक्तीच्या लसीकरण स्थितीचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांना सर्व आवश्यक डोस मिळतील याची खात्री करण्यासाठी अचूक आणि अद्ययावत लसीकरण नोंदी राखण्याची जबाबदारी परिचारिकांवर असते.
- लसीकरणानंतर होणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रतिकूल परिणामासाठी परिचारिका बालकांवर लक्ष ठेवतात आणि उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही तत्काळ समस्यांचे व्यवस्थापन करण्यास तयार असतात.
- परिचारिका संवादातून समुदायाला लसीकरण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि एकूण आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरित करतात.
- लसीकरणाच्या नियोजनापासून ते झाल्यानंतर घ्यावयाची दक्षता या सर्व टप्प्यांवर परिचारिकेने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असते.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार
| वयोगट | लशीचा प्रकार किंवा नाव |
| जन्मतः | पोलिओ – झीरो डोस, हिपॅटायटिस – बी आणि बी.सी.जी. |
| ६ आठवडे | पोलिओ – पहिला डोस,
रोटा – पहिला डोस, पेन्टा – पहिला डोस, पी.सी.व्ही. – पहिला डोस, आय.पी.व्ही. – पहिला डोस |
| १० आठवडे | पोलिओ – दुसरा डोस,
रोटा – दुसरा डोस, पेन्टा – दुसरा डोस |
| १४ आठवडे | पोलिओ – तिसरा डोस,
रोटा – तिसरा डोस, पेन्टा – तिसरा डोस, पी.सी.व्ही. – दुसरा डोस, आय.पी.व्ही. – दुसरा डोस |
| ९ महिने | जीवनसत्त्व अ – पहिला डोस ,
गोवर – रुबेला – पहिला डोस, पी.सी.व्ही. – बुस्टर डोस, आय.पी.व्ही. – तिसरा डोस |
| १६ ते २४ महिने | पोलिओ – बुस्टर डोस,
जीवनसत्त्व अ – दुसरा, गोवर – रुबेला – दुसरा डोस, डी.पी.टी. बुस्टर – पहिला डोस |
| २ ते ५ वर्षे | जीवनसत्त्व अ – दर ६ महिन्याने |
| ५ वर्षे | डी.पी.टी. बुस्टर डोस – दुसरा |
| १० वर्षे | टी.डी. डोस |
| १६ वर्षे | टी. डी. डोस |
| गरोदर माता | टी.डी. – पहिला डोस – गर्भावस्थेतील सुरुवातीच्या काळात (१२ आठवड्यात)
टी.डी. – दुसरा डोस – पहिला टी.टी . डोस घेतल्यानंतर ४ ते ६ आठवड्यांनी टी.डी. बुस्टरडोस – तीन वर्षाहून कमी कालावधीमध्ये पुन्हा गरोदर राहिल्यास टी.डी. लसीचे दोन डोस घेणे ऐवजी १ बुस्टर डोस |
संदर्भ :
समीक्षक : सरोज वा. उपासनी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.