भाषाशास्त्रातील ध्वनिशास्त्रीय संज्ञा. जे भाषिक ध्वनी उच्चारताना नाकावाटे हवा बाहेर सोडली जाते त्यांना ‘अनुनासिक’ असे म्हणतात.  उदाहरणार्थ, मराठीतील ङ्, ञ्, ण्, न्, म् ही व्यंजने अनुनासिके आहेत. मानवी मुखातील पडजीभ (अलिजिव्हा) ढिली लोंबकळत असते व मुखविवर बंद असल्याने हवा नासिकाविवरातून बाहेर पडते तेव्हा हे ध्वनी उच्चारले जातात. (पहा: आकृती क्र. १) उदा. ‘म’, ‘न’.  पडजीभ वर ताठ राहून नासिकाविवर बंद होते व हवा फक्त तोंडावाटे बाहेर पडते तेव्हा उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना ‘मौखिक ध्वनी’ असे म्हणतात. (पहा: आकृती क्र. २) उदा. ‘अ’, ‘ब’. काही वेळा पडजीभ दोन्ही विवरांदरम्यान लोंबकळत असल्याने नाक व तोंड दोन्ही मार्गांतून हवा बाहेर पडते; त्यामुळे ध्वनींना हलका नासिक्य स्पर्श येतो. त्या ध्वनींना ‘नासिक्यरंजित’ किंवा ‘सानुनासिक ध्वनी’ म्हणतात. उदा. ‘हंस’, ‘कंस’ या मराठी शब्दांमधील द्विस्वर उच्चारताना तोंडातून व नाकाद्वारेदेखील हवा बाहेर पडते. हा द्विस्वर नासिक्यरंजित आहे. फ्रेंचसारख्या काही भाषांमध्ये असे सानुनासिक स्वर आढळतात. उदा., /ɔ̃/ (ऑ).

आकृती क्र. १, अनुनासिक ध्वनी उच्चारताना पडजीभेची स्थिती

अनुनासिक ध्वनी सामान्यतः व्यंजनांच्या गटात समाविष्ट केले जातात. काहीवेळेस अनुनासिके स्वराप्रमाणे अक्षराचे केंद्र (syllabic nasal) म्हणून येऊ शकतात. उदा., ब्रिटिश इंग्रजीमधील /ˈbʌt.ən/ (बटन) या शब्दाच्या उच्चारातील ‘न’.

ध्वनिशास्त्रामध्ये व्यंजनांचे वर्गीकरण करताना; मुखात हवा कोठे अडवली जाते (उच्चारणस्थान), हवा अंशतः अडवली जाते की पूर्णतः अडवली जाते (प्रयत्न) आणि स्वरयंत्रातील कंपने (अघोष-सघोष) यांआधारे केले जाते. अनुनासिक व्यंजने सामान्यत: सघोष व्यंजने असतात. उच्चारणस्थानानुसार ती वेगवेगळ्या वर्गांत विभागली जातात. उदा., मराठीतील पाच अनुनासिक व्यंजनांत उच्चारणस्थानांनुसार भेद आहेत. त्यांचा उच्चार केला जातो तेव्हा, हवा नाकातून सोडली जात असतानाच मुखात वेगवेगळ्या स्थानी ती अडवली जाते. ‘ङ्’चा उच्चार करताना जीभेचा मागचा भाग मृदू टाळूला स्पर्श करून हवा अडवली जाते. म्हणून त्याला मृदुतालव्य व्यंजनांच्या गटात ठेवले आहे. ‘ञ्’ च्या उच्चारात जीभ टाळूच्या पुढच्या भागाला स्पर्श करते म्हणून ‘ञ्’ तालव्य गटात आहे. ‘ण्’ मूर्धन्य गटात आहे. याचा उच्चार करताना जीभ मागे वळवून तोंडातील मधल्या कठीण टाळूला म्हणजे मूर्धा स्थानाला स्पर्श करते व त्यामुळे हवा अडवली जाते. ‘न्’ दंत्य गटात आहे जो जीभेने वरच्या दातांना स्पर्श करून उच्चारला जातो. ‘म्’ द्व्योष्ठ्य (bilabial)  गटात आहे. ज्याच्या उच्चारासाठी दोन्ही ओठ बंद करून हवा अडवली जाते. अशाप्रकारे, अनुनासिक व्यंजन इतकीच या व्यंजनांची ओळख नसून त्यांना मृदुतालव्य अनुनासिक, तालव्य अनुनासिक, मूर्धन्य अनुनासिक, दंत्य अनुनासिक व द्व्योष्ठ्य अनुनासिक असेही संबोधले जाते. उच्चारणस्थानांनुसार पाच वर्गांमध्ये विभागलेल्या या अनुनासिक व्यंजनांना मराठी व्याकरणपरंपरेत वर्गीय अनुनासिके असेही संबोधले जाते. या पाच अनुनासिकांखेरीज दन्त्यौष्ठ्य (labiodental) अनुनासिक इंग्रजी एम्फॅटिक, ट्रायम्फ या शब्दांमध्ये फ् या व्यंजनाच्या अलीकडे ऐकू येते. तसेच क्वचित काही भाषांमध्ये अलिजिव्हीय अनुनासिकही आढळते. मलयाळम् भाषेमध्ये मराठीतील पाच अनुनासिकांच्या जोडीने दन्तमूलीय अनुनासिकदेखील वापरले जाते.

आकृती क्र. २, मौखिक ध्वनी उच्चारताना पडजीभेची स्थिती

मराठीतील पाच अनुनासिक व्यंजनांपैकी चारच व्यंजने स्वनिमिक आहेत. ‘ञ’ स्वनिमिक नाही. ‘ञ’ ऐवजी ‘न’ वापरल्याने अर्थभेद होत नाही. उदा., चञ्चल किंवा चन्चल.

अनुनासिकांच्या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचे मराठी प्रमाणलेखनाचे नियम महत्वाचे आहेत. सामान्यतः वर्गीय अनुनासिक व्यंजनाचा संयोग त्याच वर्गातील व्यंजनाशी होतो. मराठीतच नाही तर सर्वच भाषांत उच्चारणस्थान सारखी असलेली मौखिक व अनुनासिक व्यंजने जोडून येतात. उदा., इंग्रजीत फिंगर /fingər / (बोट), हिंदीतील चाँद /t͡ʃãn̪d̪/ (चंद्र) इत्यादी. अनुनासिकांना ‘पर-सवर्ण’ असेही म्हणतात. अनुनासिक ज्या वर्गीय व्यंजनांसोबत लिहिले आहे त्या मौखिक व्यंजनाचे व या अनुनासिकाचे उच्चारणस्थान सारखे आहे, म्हणून सवर्ण ही संज्ञा; तर इतर वर्गीय व्यंजनांप्रमाणे हवा तोंडाने सोडण्याऐवजी नाकावाटे बाहेर सोडली जाते, म्हणून पर ही संज्ञा लागू होते. उदा. क, ख, ग, घ या ध्वनींचा ‘ङ’ या पर-सवर्णाशी संयोग होतो. जसे, रंग (रङ्ग), पंख (पङ्ख) इ. परंतु, सामान्यतः देवनागरी लिपीत मराठी लिहिताना वर्गीय अनुनासिक व्यंजनाच्या ऐवजी त्याच्या आधी येणाऱ्या लगतच्या अक्षरावर शिरोबिंदू ‘◌ं’ दिला जातो. (अंत, कंठ इ.) म्हणजेच, रङ्ग किंवा कण्ठ असे लिहिण्याऐवजी रंग, कंठ असे लेखन केले जाते. वर्गीय व्यंजनाव्यतिरिक्तच्या र्, श्, ष्, स्, ह् या व्यंजनांच्या आधी मराठीत अनुनासिक आल्यास आधीच्या द्विस्वराचा उच्चार सानुनासिक होतो. या सानुनासिक द्विस्वराचा उच्चार दर्शवण्यासाठीसुद्धा शिरोबिंदू दिला जातो. उदा., अंश, सिंह, संयम अशा शब्दांचा उच्चार अंव्श (/ə̃͡w̃ʃə/), सिंव्ह (/sĩ͡w̃hə/), संय्यम (/sə̃͡ɪ̃jəm/) असा होतो. एकल स्वराचा सानुनासिक उच्चार दर्शविण्यासाठीही शिरोबिंदू दिला जातो. उदा., ‘अं! काय म्हणालीस?’ या वाक्यातील ‘अं’चा सानुनासिक उच्चार होतो.

देवनागरी लिपीत मराठी लेखन करताना, बऱ्याचदा अक्षरावर दिल्या जाणाऱ्या टिंबाला अनुस्वार असे म्हटले जाते. पण, काही अभ्यासक स्पष्ट अर्थभेदासाठी ‘अनुस्वार’ आणि ‘शिरोबिंदू’ किंवा ‘शीर्षबिंदू’ या संज्ञांचा वापर काळजीपूर्वक करावा असे सुचवतात. शिरोबिंदू किंवा शीर्षबिंदू हे त्या चिन्हाचे नाव होय, ज्याचा वापर विविध कारणांनी केला जाऊ शकतो. उदा., ‘केलं’ या शब्दलेखनात शेवटच्या अ-काराचा लांबट किंवा दीर्घ उच्चार शिरोबिंदूने दर्शविला जातो. जेव्हा शिरोबिंदूचा वापर अनुनासिकाचा उच्चार दर्शवण्यासाठी केला जातो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. उदा., अंक. ‘मुलं’ या शब्दात अनेकवचन दर्शवण्यासाठी दिलेल्या शिरोबिंदूला अनुनासिक म्हटले जात नाही. मात्र ‘मुलांना’ या शब्दात विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर अनुनासिक उच्चार होत असल्याने तिथे अनुस्वार ही संज्ञा वापरली जाते.

एकोणिसावे शतक आणि त्या पूर्वी मराठी लेखनात अनेक ठिकाणी शिरोबिंदू दिलेले दिसतात. उदा. कोठें, हंसणे इ. त्याचे कारण असे सांगितले जाते की, त्या काळात त्या ध्वनींचा उच्चार अनुनासिक होत असण्याची शक्यता आहे. आता तसा उच्चार होत नसल्याने मराठी प्रमाणलेखनाच्या शासननियमांनुसार जिथे स्पष्ट अनुनासिक उच्चार नाही तिथे शिरोबिंदू देऊ नये. लेखनात अर्थभेद दाखवण्यासाठी काही वेळेस एका अर्थासाठी अनुस्वार व दुसऱ्या अर्थासाठी जोडाक्षर वापरतात. जसे, वेदांत (वेदांमध्ये) व वेदान्त (वेदांच्या शेवटी येणारे तत्त्वज्ञान). परंतु, हा वैकल्पिक संकेत आहे; नियम नव्हे.

पहा : ध्वनिविचार

संदर्भ :

  • अर्जुनवाडकर, कृ. श्री., ‘मराठी व्याकरण : वाद व प्रवाद’,  सुलेखा प्रकाशन, पुणे, १९८७.
  • पुरंदरे, मा., ‘लिहावे नेटके (खंड १, दुसरी आवृत्ती)’, ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई, २०११.
  • मालशे, स. गं., आणि इतर (संपा.), ‘भाषाविज्ञान परिचय’, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००९.

 

                                                                        समीक्षक : रेणुका ओझरकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.