फिट्सजेरल्ड, एफ. स्कॉट : (२४ सप्टेंबर १८९६ ते २१ डिसेंबर १९४०). अमेरिकन कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि निबंधकार. पूर्ण नाव फ्रांसिस स्कॉट की फिट्सजेरल्ड. ‘एफ. स्कॉट फिट्सजेरल्ड’ या नावाने परिचित. सेंट पॉल, मिनेसोटा येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, मात्र न्यूयॉर्क येथे स्थानांतरित. प्रिन्स्टन विद्यापीठात शिकत असताना, ‘प्रिन्स्टन टायगर’ या नियतकालिकातून लिखाणास सुरुवात केली. यादरम्यान प्रतिष्ठित ट्रायँगल क्लबच्या संगीत नाटकांसाठी नाट्यगीते लिहित असताना तो अमेरिकन समीक्षक एडमंड विल्सन (१८९५-१९७२) आणि जॉन पील बिशप (१८९२-१९४४) यांच्या संपर्कात आला. फिट्सजेरल्डने काही काळ शिक्षण अर्धवट सोडून पहिल्या महायुद्धात सेकंड लेफ्टनंट म्हणून अमेरिकन सैन्यदलात काम केले.

फिट्सजेरल्डची पहिली कादंबरी ‘दिस साइड ऑफ पॅराडाइज’ (१९२०). यात जॅझ युगाच्या (१९२०-३० मधील अमेरिकेतील एक संगीत-नृत्य शैली) प्रारंभीच्या काळातील बेफिकीर अमेरिकन तरुणांचे जीवन आणि त्यांच्या नैतिकतेची घडण यावर आधारलेले कथानक आहे. यातील नायक अमोरी ब्लेन, प्रिन्स्टन विद्यापीठात शिकणारा देखणा, मध्यमवर्गीय विद्यार्थी आहे.त्याला साहित्याची आवड आहे, मात्र तो तरुण स्त्रियांसोबतच्या अनेक प्रेमसंबंधांत गुंततो, जे प्रेमसंबंध अपरिपूर्ण आणि असमाधानकारक राहतात. फिट्सजेरल्डच्या या पहिल्याच कादंबरीला अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता मिळाली. शिवाय समीक्षकांनीही या कादंबरीला उत्कृष्ट कादंबरी म्हणून गौरविले. त्याची दुसरी कादंबरी ‘द ब्यूटिफुल अँड डॅम्ड’ (१९२२). यात जॅझ युगाच्या प्रारंभीच्या काळातील तरुण कलाकार अँथनी पॅच आणि त्याची आधुनिक पत्नी ग्लोरिया गिल्बर्ट यांचे विलासी भोगवादाच्या अतिरेकामुळे उद्ध्वस्त झालेले जीवन तो चित्रित करतो. तत्कालीन अमेरिकन लोकांच्या आयुष्यातील झगमगाट आणि बेताल वर्तनावर त्याने या कादंबरीतून प्रकाश टाकला आहे. या कादंबरीमधील अँथनी पॅच आणि ग्लोरिया गिल्बर्ट ही दोन्ही मुख्य पात्रे स्वत: स्कॉट फिट्सजेरल्ड आणि त्याची पत्नी झेल्डा फिट्झजेरल्ड या दोघांच्या जीवनावरून प्रभावित झालेली दिसतात.
‘द डायमंड ॲज बिग ॲज द रित्झ’ (१९२२) ही त्याची लघु कादंबरी आहे. यातील कथानक मुख्यत: मोन्टाना या शहरात घडते, ज्याठिकाणी स्कॉटने काही दिवस वास्तव्य केले होते. जॉन टी. अंजर हा एक सर्वसाधारण पार्श्वभूमी असलेला मुलगा आपला श्रीमंत मित्र पर्सी वॉशिंग्टनच्या आलिशान आणि एकाकी घरास भेट देतो. जॉनला कळते की, वॉशिंग्टनच्या कुटुंबाची अफाट संपत्ती ही एका हिऱ्याच्या पर्वताशी संबंधित आहे. मात्र वॉशिंग्टन कुटुंब ही बाब गोपनीय ठेवण्यासाठी टोकाच्या मार्गांचा सुद्धा अवलंब करतात. बाहेरच्या ज्या लोकांना ही गोष्ट कळेल त्यांना कैदेत ठेवणे किंवा जीवे मारण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. अखेर अमेरिकन सरकार त्यांच्यावर हल्ला चढवते आणि वॉशिंग्टन साम्राज्य कोसळू लागते, असा या कादंबरीचा आशय आहे.
फिट्सजेरल्डने ‘द ग्रेट गॅट्सबी’ (१९२५) या त्याच्या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कादंबरीत अमेरिकन स्वप्न (American Dream), संपत्ती, प्रेम आणि भ्रम या आशयसूत्रांचा ऊहापोह केलेला आहे. ही कादंबरी १९२० च्या दशकातील झगमगत्या अमेरिकन समाजाच्या पार्श्वभूमीवर लपलेल्या नैतिक अध:पतनाचे चित्रण करते. भौतिक यश आणि सामाजिक दर्जाच्या मागे लागल्याने लोकांना खरी मूल्ये आणि प्रामाणिकपणा याचा विसर पडला आहे. जे गॅट्सबीच्या डेझी बुकॅननवरील वेड्या प्रेमातून आणि भूतकाळाच्या त्याच्या आदर्श कल्पनेतून फिट्झजेरल्ड हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की, अशक्यप्राय स्वप्नांच्या मागे लागल्याने केवळ एकटेपणा आणि भ्रष्टाचार निर्माण होतो. अखेरीस, ही कादंबरी आनंदाचे आश्वासन देणाऱ्या पण प्रत्यक्षात निराशा आणि नुकसानीकडे नेणाऱ्या अमेरिकन स्वप्नांचा भ्रम उघड करते.
फिट्सजेरल्डची ‘टेन्डर इज द नाइट’ (१९३४) ही कादंबरी प्रेम, संपत्ती, मानसिक अध:पतन आणि आदर्श या आशयसूत्रांवर आधारित आहे. फ्रेंच रिव्हिएराच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बेतलेली ही कादंबरी डिक आणि निकोल डायव्हर यांच्या वैवाहिक नात्याच्या चढउताराचे चित्रण करते. भावनिक अवलंबित्व, मानसिक आजार आणि सामाजिक दडपण व्यक्तीची ताकद आणि आनंद कसे नष्ट करतात, हे या कादंबरीतून चित्रित केले आहे. बाह्य आकर्षण आणि परिष्कृततेच्या आड दडलेली आंतरिक पोकळी आणि नैतिक अध:पतन याचे अतिशय मार्मिक चित्रण यामध्ये पाहायला मिळते. फिट्सजेरल्डची ‘द लास्ट टायकून’ (१९४१) ही शेवटची कादंबरी त्याच्या निधनामूळे अपूर्ण राहिली.
फिट्सजेराल्डच्या लघुकथांमध्ये कादंबऱ्यांप्रमाणेच भ्रामक कल्पना, भ्रमनिरास, वर्गभेद आणि जॅझ युगातील नैतिक अध:पतन ही आशयसूत्रे दिसून येतात. या कथांचा लेखनकाळ १९२० ते १९३१ असा आहे. ‘द आइस पॅलेस’ आणि ‘बर्निस बॉब्स हर हेअर’ सारख्या कथांमधून तो परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्ष, सामाजिक मान्यता मिळवण्याची धडपड आणि स्त्रियांच्या बदलत्या भूमिका यांचा शोध घेतो. ‘मे डे’, ‘द रिच बॉय’ आणि ‘बॅबिलॉन रिव्हिजिटेड’ या कथांमध्ये संपत्ती आणि ऐशआराम याच्या आड लपलेला पोकळपणा तसेच भौतिक यशामुळे निर्माण होणारा भावनिक एकाकीपणा आणि पश्चात्ताप दाखविला आहे. ‘विंटर ड्रीम्स’ आणि ‘द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन’ या कथांमध्ये तारुण्य, सौंदर्य आणि स्वप्नांच्या क्षणभंगुरतेचे चित्रण दिसून येते. तसेच यामधून काळाच्या शोकांतिकेचा आणि आदर्श कल्पनांचा व्यर्थ पाठलाग यांचा वेध घेतलेला दिसून येतो. ‘अॅबसोल्युशन’ या कथेत आध्यात्मिक अंगाने केले गेलेले अपराधगंड, दडपण आणि निष्पापतेच्या विनाशाचे चित्रण दिसून येते. एकत्रितपणे या सर्व कथा भ्रम आणि अतिरेकाने भ्रष्ट झालेल्या जगात अमेरिकन स्वप्नाचा निरर्थकपणा, प्रेम, ओळख व मुक्तीच्या मानवी आशा इत्यादी संकल्पनांचा वेध घेताना दिसतात.
एफ. स्कॉट फिट्सजेराल्ड विसाव्या शतकातील सर्वांत प्रभावी अमेरिकन लेखकांपैकी एक मानला जातो. आपल्या काव्यात्मक गद्यलेखन आणि सखोल मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून फिट्सजेराल्ड याने केवळ तत्कालीन समाजजीवनाचे चित्रण केले नाही, तर मानवी स्वभावाविषयीच्या शाश्वत सत्यांचाही वेध घेतला, ज्यामुळे तो अमेरिकन साहित्यातील एक अजरामर आणि प्रभावशाली आवाज ठरला.
हृदयविकाराने हॉलिवूड (कॅलिफोर्निया) येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :
- Curnutt, Kirk, Ed. A Historical Guide to F. Scott Fitzgerald. Oxford, UK: Oxford University Press, 2004.
- Hart, James D., Ed. Fitzgerald, F [rancis] Scott [key] in the Oxford Companion to American Literature, Oxford University Press, New York,1995.
- Prigozy, Ruth, Ed. The Cambridge Companion to F. Scott Fitzgerald. Cambridge: Cambridge University Press, 2002.
- http://fscottfitzgeraldsociety.org/
समीक्षक : सुनील सावंत
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.