इस्लामिक स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेला एक ऐतिहासिक वाळवंटी किल्ला. हा किल्ला जॉर्डनची राजधानी अम्मामच्या ८० किमी. पूर्वेला वाळवंटातील वाडी बुटम या नैसर्गिक हंगामी जलधारेच्या सान्निध्यात इ. स. ७२३—७४३ या कालावधीत बांधला गेला. कासार या अरबी शब्दाचा अर्थ किल्ला किंवा गढी असा होतो.
उमय्याद खलिफांची (इ. स. ६६१ — ७५०) राजधानी दमास्कस आणि इस्लामचे पवित्र शहर मक्का यांना जोडणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या वाळवंटातील व्यापारी मार्गावर असणाऱ्या अनेक किल्लेसदृश गढ्यांपैकी एक कासार आमरा हा किल्ला आहे. सध्या हा किल्ला भग्नावस्थेत आहे. भग्नावस्थेतील वास्तूच्या बाजूला असलेल्या संरक्षक दगडी भिंतीवरून या किल्ल्याचा आकार सु. २५ हे. असावा असा अंदाज आहे. येथील हम्माम (स्नानगृह) हे ऐतिहासिक इस्लामी जगातील सर्वांत प्राचीन असल्याचे मानले जाते. या किल्ल्यात संरक्षणासाठी चौक्या असून प्रशस्त प्रवेशद्वारासह मौजमजेसाठी बांधलेला महाल आहे. त्यात थंड-गरम पाण्याची व्यवस्था आणि कपडे बदलण्यासाठी खोल्या आहेत. ही वास्तू भित्तिचित्रांनी सुशोभित केलेली आहे. तेथे ग्रीक आणि अरबी भाषांतील शिलालेख आहेत. या किल्ल्याच्या आग्नेय दिशेला ४० मी. खोलीची विहिर असून पाणी वेंधण्यासाठी प्राण्यांनी ओढण्याचा रहाट असल्याची चिन्हे दिसून येतात.
या किल्ल्यात ससानीयन वास्तुकलेप्रमाणे चुनखडीचा वापर करून दगडी बांधकामाचे हम्माम आहेत. हम्माम खान्याची जमीन बेसाल्टमधील बांधकामाच्या लहानलहान भिंतींवर उचललेली होती, त्यामुळे जमिनीखाली सुद्धा गरम हवा खेळती राहत होती. चुना आणि नैसर्गिक बंधक वापरून भित्तिचित्रांसाठी भिंतीवर गुळगुळीत मुलामा केलेला होता. तत्कालीन अरब वैदूंच्या मते, स्नान करण्याने माणसाच्या शरीरातील काही आवश्यक तत्त्वांचा क्षय होतो आणि आध्यात्मिक, भौतिक व नैसर्गिक या तीन प्रमुख तत्त्वांना पुन:स्थापित करण्यासाठी विविध भित्तिचित्रांचे प्रयोजन करणे आवश्यक आहे. याला अनुसरून येथील विविध भित्तिचित्रे काढलेली आहेत. कपडे बदलण्याच्या कक्षात वाद्ये वाजवणाऱ्या प्राण्यांचे चित्रण आढळते. गरम पाण्याची व्यवस्था असणाऱ्या खोलीत विविध झाडे रंगवली आहेत. त्याचबरोबर पाणी घेऊन येणाऱ्या निर्वस्त्र स्त्रियांचेसुद्धा चित्रण आहे.
उमय्याद काळात माणसांची चित्रे रेखाटण्यास मुभा होती, तसेच हे धार्मिक वास्तुसंकुल नसल्याने तेथे मनुष्यकृतींचे चित्रण करण्यास बंधन नव्हते. तत्कालीन धर्मनिरपेक्ष कला येथे पाहायला मिळते. याच खोलीतील अर्धवर्तुळाकार घुमटावर स्वर्गाचे प्रतीक म्हणून राशींचे आणि ३५ नक्षत्रांचे रेखाटन आहे. वर्तुळाकार भागावर अत्यंत अचूकतेने केलेले अवकाशाचे हे पहिले चित्रण मानले जाते. येथील भित्तिचित्रांमध्ये शिकारीचे, स्नान करणाऱ्या व्यक्तींचे, धार्मिक आणि पुराणातील कथांचे तसेच कलात्मक निसर्गाचे चित्रण केलेले असल्यानेच युनेस्कोने जागतिक वारसास्थळांत या किल्ल्याचा अंतर्भाव केलेला आहे.
संदर्भ :
- https://www.nationalgeographic.com/travel/world-heritage/article/quseir-amra-jordan
- https://en.wikipedia.org/wiki/Qusayr_%27Amra
- https://military-history.fandom.com/wiki/Qusayr_%27Amra
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.