भारतामध्ये इतर प्रदेशांच्या तुलनेत महाराष्ट्र हा ऐतिहासिक साधनसामग्रीच्या बाबतीत कमालीचा समृद्ध वारसा लाभलेला प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक महाराष्ट्राचा
मानदंड असून त्यांचा इतिहास बहुतेकांना माहीत आहे. सतराव्या शतकात त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आपले स्वराज्य कसे सुजलाम सुफलाम होईल, तसेच त्याचा आर्थिक पाया बळकट होऊन हे राज्य कसे टिकून राहील, याबाबत त्यांनी गांभीर्याने विचार केल्याचे आढळून येते. यासाठी त्यांनी आपल्या स्वराज्याचे आर्थिक धोरण ठरविताना अनेक महत्त्वपूर्ण बाबींची काळजी घेतली होती.
सतराव्या शतकातील सामाजिक व आर्थिक व्यवहारांचा केंद्रबिंदू असलेल्या खेड्यांतील शेती हाच जीवनाचा प्रमुख मार्ग असल्याने महाराजांची कृषिनीती ही शेतकरी सुखी, तर राजा सुखी आणि शेतकरी गरीब, तर राजा गरीब अर्थातच संपूर्ण राज्य गरीब या तत्त्वावर आधारित होती. या कृषिनीतीला अनुसरून महाराजांनी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देणे, पडीक जमीन लागवडीखाली आणणे, फक्त लागवड झालेल्या जमिनीवरच सारा आकारणी करणे, पिकांच्या प्रकारानुसार सारा आकारणी करणे, शेतकऱ्यांना शेत साऱ्याच्या थकबाकीत सूट देणे, सारामुक्त जमीन देणे, तसेच कालव्यांद्वारे, पाटबंधाऱ्यांद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे यांसारख्या शेतीविषयक विकास धोरणांचा अवलंब केल्याचे आढळून येते. महाराजांच्या काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता; तर शेतीशी संबंधित सोनार, लोहार, चांभार, सुतार, कोष्टी, तेली, धनगर इत्यादींचे उपव्यवसायही होते.
महाराजांच्या काळात दाभोळ, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला, पेण इत्यादी ठिकाणी औद्योगिक व व्यापारी केंद्रे असून ती त्या वेळी भरभराटीस आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मीठ तयार करणे हा कोकणातील प्रमुख उद्योग होता. मिठाच्या वाहतुकीसाठी महाराजांनी खास गलबतांचा तांडा निर्माण केला होता; परंतु काही काळ परकीय मिठाच्या उच्च प्रतीमुळे व कमी किमतीमुळे राज्यातील मिठाची मोठी बाजारपेठ परकीयांनी काबीज केली होती. त्यातच स्वराज्यातील मीठ उत्पादकांना परकीयांशी स्पर्धा करणे कठीण झाल्याने बरीचशी मिठागरे बंद पडली होती. या वेळी महाराजांनी स्वराज्यातील मिठाच्या धंद्यास संरक्षण देण्यासाठी परकीय मिठावर मोठ्या प्रमाणात जकात आकारून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याचे आढळून येते. स्वराज्यातील कल्याण-भिवंडी या भागांत उत्तम प्रकारचे लाकूड भरपूर प्रमाणात मिळत असल्याने, तसेच ते लाकूड बोटी बांधण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने महाराजांनी बोटी बांधण्याचे कारखाने कल्याण-भिवंडी याच भागांत सुरू केले होते. महाराजांना व्यापारवृद्धीशिवाय आपल्या राज्याला भरभराट येणार नाही, हे ओळखून त्यांनी आपल्या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापारवृद्धीला प्राधान्य दिल्याचे आढळते. यासाठी त्यांनी व्यापाऱ्यांना सवलती देणे, जकातीत सूट देणे, याच बरोबर कायदा व सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करून व्यापारवृद्धीला हातभार लावले होते. त्यांनी परकीय व्यापार धोरणाबाबत अखंड सावधानतेचे धोरण स्वीकारल्याचेही आढळून येते.
महाराजांनी आपल्या साम्राज्याच्या उत्पन्नासाठी काही नियमित करांच्या रचनेबरोबर काही प्रासंगिक करांचाही आधार घेतल्याचे दिसून येते. त्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांचा समावेश होतो. महाराजांच्या काळातील सर्व कर हे पुरोगामी स्वरूपाचे होते; ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या व व्यावसायिकांच्या उत्पन्न क्षमतेनुसार ते आकारले जात होते. महाराजांच्या मध्यवर्ती, प्रांतिक, स्थानिक व लष्करी प्रशासनाच्या खर्चाबरोबरच त्यांच्या स्वराज्यावर होणारा खर्च विचारात घेता लष्करी प्रशासनावर होणारा खर्च सर्वाधिक असल्याचे आढळते. याशिवाय महाराजांनी उत्पादक कार्यावर केलेला खर्च म्हणजेच शेती व शेतीविषयक विकासासाठी केलेला खर्च; तसेच उपव्यवसायांच्या विकासासाठी केलेला खर्चसुद्धा अधिक होता, असेही आढळते. शेतीविषयक खर्चामध्ये शेतकऱ्यांना उत्पादक कारणांसाठी केलेला बिनव्याजी कर्जपुरवठा याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. महाराजांनी आपल्या साम्राज्यामध्ये शिलकी अंदाजपत्रकाचे धोरण स्वीकारल्याचे आढळून येते.
महाराजांची चलन व वित्तीयव्यवस्था : महाराजांनी होन व शिवराई नावांची नाणी निर्माण केली होती. चवल, जित्तल, दुवल, पाल, ब्याल इत्यादी तांब्याची नाणीसुद्धा त्यांच्या वेळी होती. याच काळात एतद्देशीय बँकासुद्धा कार्यरत होत्या. त्यापैकी मराठी मुलखात शेटे, महाजन, देशपांडे यांसारखी काही मंडळी हा बँक व्यवहार करत होती. त्यामध्ये आर्थिक व्यवहारांसाठी ठेवी व बचत स्वीकारणे, वित्तपुरवठा करणे, वरात (कागदावर नमूद केलेली रक्कम देण्याचा आदेश) अथवा हुंडी काढणे इत्यांदींचा समावेश होता. महाराजांच्या अधिकाऱ्यांना वरातद्वारे वेतन देत असल्याचे आढळून येते.
संदर्भ :
- कुलकर्णी, अविनाश, संस्कृतीचे अर्थशास्त्र, पुणे, २०२५.
- केळुसकर, कृष्णराव अर्जुन, छत्रपती महाराज महाराज, कोल्हापूर, २०२२.
- ढेरे, रा. चि., रामचंद्रपंत अमात्य प्रणित स्वराज्य नीती आज्ञापत्र, पुणे.
- पानसरे, गोविंद, शिवाजी कोण होता, मुंबई, २०१०.
- Kulkarni, Avinash, Economics of Culture, Pune, 2025.
- Kulkarni, A. R., Maharashtra in the Age of Chh. Shivaji, Pune, 2007.
- Sarkar, Jadhunath, Shivaji and His Time, New Delhi, 2024.
समीक्षक : अविनाश कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.