अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावशाली व्हावी, यासाठी अध्यापकाने अध्यापनाच्या वेळी वापरलेली कृती व अध्यापकाचे वर्तन म्हणजे अध्यापन कौशल्ये. मानव त्याच्या जन्मापासून ते
मृत्यूपर्यंत सतत शिकत असतो. अध्यापनाचा सामान्यपणे शिकविणे असा अर्थ काढला जातो; पण फक्त एकमार्गी शिकविणे नाही, तर अध्यापन ही आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे. अध्यापनामध्ये अध्यापनासंबंधी गतिविधी, अध्यापक वर्तणूक, वर्गाची स्थिती व शिकविणाऱ्याची अनुकूल परिस्थिती यांचे एकात्मिक स्वरूप आहे.
अध्यापन कौशल्यांबाबत अनेक विचारवंतांनी आपली मते मांडली आहेत :
- एस. सी. सिंग आणि ए. एन. जोशी यांचा मते, ‘अध्यापन कार्य किंवा परस्पर निगडित अध्यापन कार्य गट साध्य करणारा आणि विद्यार्थ्यांबरोबरच्या आंतरक्रियात्मक परिस्थितीमध्ये अवबोधात्मक व बोधात्मक क्रियांचा परिपाक म्हणून अध्यापकाने प्रदर्शित केलेल्या शाब्दिक व अशाब्दिक कृतींचा संयुक्त संच म्हणजे अध्यापन कौशल्य होय’.
- बी. के. पासी यांच्या मते, ‘अध्यापन कौशल्ये म्हणजे शिक्षक कृती व वर्तनाशी संबंधित कौशल्यांचा पुंज होय’.
अध्यापन प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष कृती, सूचना सांगणे, अध्ययनबाबींचे आकलन सुलभ करणे, विषयानुसार आवश्यक ज्ञान व कौशल्ये विकसित करणे, अभिरूपता निर्माण करणे अशा अनेक कृतींची योजना असते. या सर्व बाबी घडवून आणण्यासाठी विविध अध्यापन कौशल्ये असणे गरजेचे आहे. या अध्यापन कौशल्यांचा फक्त संग्रह म्हणजे प्रभावी अध्यापन नव्हे, तर विशिष्ट कौशल्ये कधी आणि कशी वापरायची याचे योग्य नियोजन अध्यापकांकडे असले पाहिजे. यासाठी शिक्षक प्रशिक्षण वर्ग उपयुक्त ठरतात.
भारतामध्ये अध्यापनाला अगदी प्राचीन काळापासून एक मान्यताप्राप्त व आदरणीय स्थान होते. त्या वेळी शिक्षक प्रशिक्षणाचा निश्चित कार्यक्रम नव्हता; परंतु गुरू नेहमी ज्ञानप्राप्तीसाठी सजग असत. त्यामुळेच दूरदूर देशांतूनही शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची नोंद तक्षशीला व नालंदा यांसारख्या विद्यापीठांमध्ये आढळते. बौद्धकाळात (इ. स. पूर्व ५६७ ते इ. स. पूर्व ४८७) आणि मध्ययुगीन कालखंडात मुस्लीम समाजातही ‘मॉनेटोरीयल’ पद्धत जास्त प्रचलित झाली. इंग्रजांचा भारतातील प्रवेशामुळे आधुनिक कालखंडात अध्यापनशास्त्रात बरेच बदल झाले. इंग्रजी मिशनरींनी पुढाकार घेऊन भारतात पहिले ‘नॉर्मल स्कूल’ म्हणजेच शिक्षक-प्रशिक्षण शाळा इ. स. १७९३ मध्ये बंगाल येथे सुरू केली. ब्रिटिश कालखंडात वूडचा खलिता व हंटर कमिशनचा अहवाल यांमुळे भारतीय शिक्षक-प्रशिक्षणाला चालना मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळातही यांचा प्रभाव दिसून आला.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील ॲलन व त्यांचे सहकारी यांनी १९६० ते ७० च्या दशकात अध्यापन कौशल्ये विकासाच्या दृष्टीने ‘सूक्ष्म कौशल्य विकास’ ही संकल्पना मांडली. नवीन अध्यापन कौशल्ये विकसित करण्यासाठी व जुनी कौशल्ये अधिक परिणामकारक होण्यासाठी आयोजित केलेल्या छोट्या प्रमाणावरील अध्यापन प्रसंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय, असे त्यांचे मत होते. ॲलन यांनी १९६३ मध्ये सूक्ष्म पाठाचे आयोजन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठी केले. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी ५ ते १० मिनिटांचा पाठ घेतला. स्टॅनफोर्ड विद्यापीठात या पाठांचे चित्रिकरण केले जाई आणि पाठ पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना ते चित्रिकरण दाखवून आवश्यक तेथे प्रत्याभरण दिले जात. या वेळी शिक्षकवर्तनाचे पृथक्करण करण्याचे प्रयत्न केले गेले आणि शिक्षकवर्तनाच्या गटांच्या साहाय्याने अध्यापन कौशल्ये निश्चित केली गेली.
स्टॅनफोर्ड प्रतिमानानुसार कौशल्यांची यादी : स्टॅनफोर्ड विद्यापीठात अध्यापन कौशल्ये विकसित करण्यासाठी ॲलन व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टॅनफोर्ड प्रतिमानानुसार पुढील कौशल्ये विकसित केली : चेतक विविधता, पाठाचा प्रारंभ, पाठ समापन, शांतता व अशाब्दिक क्लृप्त्यांचा वापर, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाचे दृढीकरण, प्रश्न विचारण्याचे कौशल्य, विचारप्रवर्तक प्रश्नांचे कौशल्य, उच्च श्रेणी प्रश्नांचे कौशल्य, मुक्त प्रश्न कौशल्य, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्याचे व ओळखण्याची कौशल्ये, उदाहरणांचा वापर, कथन, नियोजित पुनरावृत्ती, संप्रेषणाचे पूर्णत्व इत्यादी.
बी. के. पासी प्रतिमानानुसार कौशल्यांची यादी : बी. के. पासी यांनीही अध्यापन कौशल्यांच्या विकासासाठी पुढील कौशल्ये विकसित केली : उद्दिष्टे लिहिण्याचे कौशल्य, प्रस्तावना करण्याचे कौशल्य, ओघवतेपणा व प्रश्न कौशल्य, विचार प्रवर्तक प्रश्न विचारण्याचे कौशल्य, स्पष्टीकरण, उदाहरणांचा व दाखल्यांचा वापर, चेतक विविधता, शांतता व अशाब्दिक क्लृप्त्यांचा वापर, दृढीकरण, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे कौशल्य, फलकाच्या वापराचे कौशल्य, पाठ समापनाचे कौशल्य, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्याचे व ओळखण्याचे कौशल्य इत्यादी.
अध्यापन कौशल्ये विकासाचे महत्त्व :
- अध्यापन कौशल्यांमुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा शास्त्रशुद्ध अभ्यास होतो.
- पूर्वज्ञानशी सांगड घालून पूर्वज्ञानाला उजाळा देण्यासाठी कौशल्य विकास महत्त्वाचा आहे.
- अध्यापन कौशल्यांमुळे प्राप्त ज्ञानाचे सामान्यीकरण करता येते.
- नवीन परिस्थिती सहजपणे हाताळण्याकरिता अध्यापन कौशल्ये उपयुक्त ठरतात.
- अध्यापन कौशल्यांमुळे अचूकता व काटेकोरपणा वाढीस लागतो.
- अध्यापन कौशल्यांमुळे अध्यापन प्रक्रिया गतिमान करता येऊन अधिक प्रभावी करता येते.
अध्यापन कौशल्यांची वैशिष्टे :
- अभिरूपता : काल्पनिक परंतु खरी वाटणारी कृत्रिम परिस्थिती किंवा घटना म्हणजे अभिरूपता. प्रशिक्षण काळात प्रथम अभिरूप कौशल्य शिकविले जाते. नंतर खर्या परिस्थितीत तिचा आविष्कार करण्याची संधी देण्यात येते. अध्यापनाप्रमाणे इतर क्षेत्रांतही अभिरूपता दिसून येते. उदा., अभिरूप न्यायालय.
- आदर्शीकरण : प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकाकडून अध्यापन कौशल्यांचे आदर्शवत नमुने सादर केले जातात. या नमुन्यांशी जुळणारे वर्तनाविष्कार अनुकरणाने प्रशिक्षणार्थ्यांनी आत्मसात करावे, असा हेतू असतो.
- पृथक्करणात्मक दृष्टीकोन : प्रत्येक कौशल्यांची उपांगे शोधून, पृथक्करण करून शिकविले जाते.
- उपयुक्तता : दैनंदिन अध्यापनामध्ये उपयुक्त अशी कौशल्ये निवडून त्यांच्या दृढतेसाठी प्रयत्न केले जातात.
- सूक्ष्म निरीक्षणास वाव : अध्यापना वेळी विविध कौशल्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना सूक्ष्म निरीक्षण करण्यास वाव मिळतो.
- चिकित्सक व सृजनशील विचारांना वाव : अध्यापनात अध्यापन कौशल्यांचा वापर केल्याने चिकित्सक व सृजनशील विचारांना वाव मिळतो.
अध्यापन कौशलल्यांची उदिष्टे :
- विशिष्ट अध्यापन कौशल्ये विकसित करणे.
- अध्यापनात अचूकता आणणे.
- आत्मसात केलेल्या कौशल्यांचे एकत्रीकरण करणे.
- प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लावणे.
- प्रशिक्षणार्थ्यांचे अध्ययन सहज व आनंददायी करणे.
- अपेक्षित सुधारणांसाठी प्रत्याभारण देणे इत्यादी.
अध्यापन कौशल्ये विकासाच्या दृष्टीने १९६०-७० च्या दशकात सूक्ष्म अध्यापन संकल्पनेमुळे खूपच मोलाची भर घातली गेली; परंतु सूक्ष्म कौशल्ये विकासासाठी सूक्ष्म अध्यापन संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वीही पारंपरिक सरावपाठ घेतला जातो. त्यादृष्टीने दास; बी. के. पासी; एस. सी. सिंग; ए. एन. जोशी; योगेंद्रकुमार रतनलाल, व्ही. व्ही. नाईक; एम. के. पंड्या यांच्या तुलनात्मक अभ्यासातून अध्यापन कौशल्ये विकासाच्या दृष्टीने पारंपरिक पद्धतीपेक्षा सूक्ष्म कौशल्य विकासासाठी उपयुक्त सूक्ष्म अध्यापन अधिक प्रभावी असल्याचे निष्कर्ष मिळाले.
अध्यापन कौशल्यांचे फायदे :
- टप्प्या-टप्प्याने प्रशिक्षण देता येते.
- अध्यापन कौशल्यांमुळे आत्मविश्वास वाढतो.
- कौशल्यपूर्ण अध्यापनामुळे अचूक व नेमके मार्गदर्शन मिळते.
- चुकांच्या दुरुस्तीस वाव मिळतो.
- सूक्ष्म निरीक्षणास वाव मिळतो.
- अध्यापन कौशल्यांवर प्रभुत्व मिळविता येते.
- अध्यापकांच्या प्रगत व अप्रगत कौशल्यांचा शोध घेऊन ते विकसित करता येते.
- अध्यापन ही संकीर्ण स्वरूपाचे कौशल्य आहे. याचे विश्लेषण करून त्याचे रूपांतर अनेकविध उपकौशल्यांमध्ये करता येते.
- अध्यापन कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन नंतर त्याचे एकात्मीकरण करता येते आणि त्याचा दैनंदिन अध्यापनात उपयोग होतो.
- क्रियाशील अध्ययन-अध्यापन घडते.
एकविसाव्या शतकात अध्ययन-अध्यापन क्षेत्रात अनेक बदल झालेत. प्रामुख्याने तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिलेला दिसून येतो. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून यंत्रमानवाच्या (रोबोट) साहाय्याने कृत्रिम शिक्षकाची पर्यायी व्यवस्था उभी केली जात आहे; पण कितीही तंत्रज्ञान आले, तरी शिक्षकांचे अध्यापन व अध्यापन कौशल्ये याला कधीच पर्याय निघू शकत नाही.
संदर्भ :
- जगताप, ह. ना., प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती तंत्रविज्ञान, प्रशांत पब्लिकेशन, जळगाव.
- नेमाडे, जयश्री; धांडे, पिंगला; भंगाळे, शैलजा; महाजन, शशिकला, बाल्यावस्था व वाढते वय, प्रशांत पब्लिकेशन, २०१९.
- पाटील, उर्मिला, अध्यापन, कोल्हापूर.
- भंगाळे, शैलजा, बाल्यावस्था व वाढते वय, जळगाव, २०१९.
- येळेकर, शेखराम, शैक्षणिक तंत्रविज्ञान व मूल्यमापनाची मूलतत्त्वे, नागपूर.
- सोहनी, चित्रा, सूक्ष्म अध्यापन, नित्य नूतन प्रकाशन, २००६.
समीक्षक ꞉ एच. एन. जगताप
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.