गॅरिसन, विल्यम लॉइड : (१० डिसेंबर १८०५ – २४ मे १८७९). अमेरिकन पत्रकार, लेखक आणि गुलामगिरी विरोधी आंदोलनातील कार्यकर्ता. ‘द लिबरेटर’ या जहाल गुलामगिरी विरोधी वर्तमानपत्राचा संपादक. अमेरिकन अँटी स्लेव्हरी सोसायटीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या गॅरिसनने अमेरिकेत गुलामांच्या ‘तात्काळ मुक्तते’च्या प्रचाराला पाठिंबा दिला. त्याचा जन्म न्यूबरीपोर्ट, मॅसॅचूसेट्समध्ये एका नौसैनिकाच्या कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांनी तो फक्त तीन वर्षांचा असताना कुटुंबाला सोडून दिले. गॅरिसनची आई फ्रान्सिस मारिया हिने दारिद्र्यात मुलांना वाढवले. १८१८ च्या सुमारास वयाच्या तेराव्या वर्षी ‘न्यूबरीपोर्ट हेराल्ड’चे संपादक एफ्राइम डब्ल्यू. एलन यांच्या मार्गदर्शनाखाली गॅरिसनची कारकीर्द सुरू झाली. पुढे बोस्टनमधील ‘नॅशनल फिलांथ्रॉपिस्ट’ आणि ‘जर्नल ऑफ द टाइम्स’ या वर्तमानपत्रात त्याची नेमणूक झाली (१८२८). गॅरिसनने हेलन एलिझा बेन्सन या एका व्यापाऱ्याच्या मुलीशी विवाह केला (१८३४). त्यांना पाच मुलगे आणि दोन मुली झाल्या.

गॅरिसन काही काळ अमेरिकन कॉलनाइझेशन सोसायटी या संघटनेकडे ओढला गेला. कृष्णवर्णीय लोकांनी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर परत जावे अशी या संस्थेची भूमिका होती. या संघटनेच्या भूमिकेमुळे कृष्णवर्णीय लोकांना स्वातंत्र्य मिळेल आणि त्यांचे कल्याण होईल असे गॅरिसनला वाटले. परंतु या संघटनेचे खरे उद्दिष्ट अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांची संख्या कमी करणे आहे, हे त्याच्या लक्षात आले. यामुळे गुलामगिरीचा प्रश्न अधिकच वाढेल ही बाब कळून चुकल्यामुळे गॅरिसनने आपल्या चुकीची जाहीर माफी मागून त्या संघटनेला रामराम ठोकला. त्यानंतर गॅरिसनने बाल्टिमोर मधील ‘जीनियस ऑफ युनिव्हर्सल इमन्सिपेशन’ या वर्तमानपत्रात दास्यमुक्ती आंदोलनातील अग्रणी बेंजामिन लंडी (१७८९-१८३९) यांच्यासोबत काम केले. गुलामांच्या व्यापाराविषयी केलेल्या लिखाणामुळे मेरिलंड राज्याने गॅरिसनविरूद्ध गुन्हेगारी खटला आणला आणि त्याला ५० डॉलर्सचा दंड ठोठावला. गॅरिसनने दंड भरण्यास नकार देत सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगली.
पुढे तुरुंगातून सुटल्यावर (जून १८३०) गॅरिसनने गुलामगिरीचा अंत करणे आवश्यक ठरवून दास्यमुक्ती समर्थक मुद्रक, प्रकाशक आयझॅक नॅप (१८०४-१८४३) यांच्यासोबत ‘द लिबरेटर’ हे वृत्तपत्र सुरू केले (१ जानेवारी १८३१). यातून गुलामगिरी विरोधात कडवा प्रचार सुरू केल्याने या वृत्तपत्राचा खप हळूहळू वाढू लागला. वाचकांच्या विवेकबुद्धीला आवाहन करून गुलामांच्या त्वरित मुक्ततेचा आग्रह यात धरला जाई. त्याचा प्रभाव अनेकांवर पडला. धाडसी व दूरदर्शी म्हणून प्रसिद्धीस आलेला फ्रेडरिक डग्लससारखा नेता यातील विचारांच्या प्रभावामुळेच प्रेरित होऊन गुलामगिरी निर्मूलन चळवळीत सक्रीय झाला. अमेरिकेबरोबरच इंग्लंडमध्येही हे वर्तमानपत्र गुलामगिरी विरोधी प्रचार करू लागले. गॅरिसनने कृष्णवर्णीयांना दास्यजीवनातून मुक्त करणाऱ्या संस्थांच्या कार्याला आघाडीवर राहून प्रोत्साहन दिले. स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकारासाठीही तो आग्रही होता.
गुलामगिरी विरोधी चळवळीचा विस्तार व्यापक व प्रभावी करण्यासाठी १८३२ मध्ये गॅरिसनने ‘न्यू इंग्लंड अँटी स्लेव्हरी सोसायटी’ची स्थापना केली. यानंतर तिचे रूपांतर ‘अमेरिकन अँटी स्लेव्हरी सोसायटी’मध्ये झाले. १८४० पर्यंत या सोसायटीशी सु. २००० संस्था जोडल्या गेल्या. त्यात सु. २ लाखांच्या आसपास सदस्य होते. या सोसायटीमार्फत आपल्या मतांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी सभा घेतल्या जात, अनेक ठराव संमत केले जात आणि अमेरिकन विधिमंडळाकडे लोकांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदने पाठवली जात. तसेच गुलामगिरी विरोधी साहित्य मोठ्या प्रमाणावर छापून उत्तर अमेरिकेत व्यापक पातळीवर प्रसारित केले जात असे.
स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या ‘बोस्टन फिमेल अँटी स्लेव्हरी सोसायटी’ सारख्या संघटनांनीही गॅरिसनच्या या कार्याला मोलाचे सहकार्य केले. मात्र गुलामगिरी समर्थकांचा गॅरिसनच्या या कार्याला अनेक प्रकारे विरोध झाला; त्याला ठार मारण्याचेही प्रयत्न झाले. पुढे अमेरिकन यादवी युद्धानंतर ही संघटना बरखास्त करण्यात आली. १८५४ मध्ये फ्रेमिंगहॅम येथे गॅरिसनने गुलामगिरी विरोधी चळवळीच्या प्रचारफेरी दरम्यान अमेरिकन राज्यघटनेच्या प्रतीचे जाहीरपणे दहन केले. सर्व गुलामांची त्वरित आणि संपूर्ण मुक्तता असा नारा देत त्याने अमेरिकन राज्यघटनेवर कठोर टीका केली. यामुळे फ्रेडरिक डग्लससारखे त्याचे सहकारी दुखावले गेले. यादवीच्या काळात गॅरिसनने अब्राहम लिंकन यांना पाठिंबा दिला. तसेच १८६३ साली प्रसिद्ध झालेल्या गुलामगिरी मुक्तीच्या जाहीरनाम्याचे त्याने मनापासून स्वागत केले. गॅरिसनने डिसेंबर १८६५ मध्ये ‘द लिबरेटर’चा अखेरचा अंक प्रसिद्ध करून आपल्या गुलामगिरी निर्मूलन कार्याची इतिश्री केली. निवृत्तीनंतर त्याने रिपब्लिकन पक्षाला समर्थन दिले.
न्यूयॉर्क येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :
- Garrison, Francis Jackson, William Lloyd Garrison, 1805-1879; the story of his life told by his children, Vol I – Vol IV, The Century Company, New York, 1885-1889.
- Parkes, H. B., The United States of America: A History, Third Edition, Scientific Book Agency, Calcutta, 1972.
- Reynolds, David, America, Empire of Liberty: A New History, Penguin Books, London, 2009.
समीक्षक : श्रद्धा कुंभोजकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.