नायक, स्वाती : (१९ जुलै १९८४). भारतीय कृषीतज्ज्ञ. शाश्वत शेतीच्या अनुषंगाने हवामान-संवदेनक्षम आणि जैवसंपृक्त (बायोफोर्टिफाइड) जातींचा भात लागवडीसाठी यशस्वी प्रसार आणि अवलंब करण्यासाठी अमेरिकेच्या वर्ल्ड फूड प्राइझ फाउंडेशन संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणारा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार त्यांना २०२३ मध्ये देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय आहेत. शेतकऱ्यांमध्ये त्या बिहाना दीदी (बियाणे भगिनी) म्हणून लोकप्रिय आहेत.
नायक यांचा जन्म ओडिशाच्या पुरी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुरी येथेच झाले. लहानपणी त्यांचा शेतीशी थेट संबंध नव्हता, परंतु वनस्पतिविज्ञानाकडे त्यांचा कल असल्याने त्यांनी आंध्र प्रदेशातील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठातून कृषी विषयाची पदवी संपादन केली (२००३—२००७). पुढे त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद (आयआरएमए), गुजरात येथून ग्रामीण व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेत शेतकरी समुदायांसोबत काम करण्यास सुरुवात केली (२००८—२०१०). यामुळे त्यांना विनियोग-आधारित व्यावहारिक संशोधनात रुची निर्माण झाली. पुढे त्यांनी अमिटी युनिव्हर्सिटी, नोएडा येथून कृषी विस्तार व्यवस्थापन धोरणासाठी स्पर्धात्मक बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक व्यवस्थापन व तंत्रज्ञान हस्तांतरण या विषयावर पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली (२०१७ — २०२२).
नायक यांनी गुजरात येथून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विभाजनपूर्व आंध्र प्रदेशच्या दुर्गम वनक्षेत्रातील एकात्मिक आदिवासी विकास संस्थेमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील एकमेव महिला प्रशासक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी ‘सहभागी धान’ या भाताच्या बियाणे प्रसाराचे काम सुरू केले. त्यांनी क्षेत्रीय संशोधन कार्य करण्यासाठी तसेच लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मागणीनुसार उच्च उत्पादनासाठी भाताचे दुष्काळ-सहिष्णू आणि पौष्टिक सहभागी धान या वाणाचे बियाणे स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी समर्पक धोरण विकसित केले. या बियाण्याचा लाभ महिलांनी अग्रक्रमाने घेण्याबाबत त्या प्रयत्नशील होत्या. १०५ दिवसांत भरघोस उत्पादन देणारे ‘सहभागी धानाचे’ वाण प्रसारित करणाऱ्या पथकाच्या प्रमुखपदी आणि ओडीशातील महिला शेतकऱ्यांची संघटना बांधण्यातही त्यांचा पुढाकार होता.
नायक यांची भारत सरकारच्या महिला शेतकऱ्यांसाठीच्या पहिल्या समर्पित उपक्रमाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार त्या कटक येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत दक्षिण आशियाई बियाणे विकास प्रकल्प प्रमुख म्हणून रुजू झाल्या (२०१३). तेथे संशोधन उपक्रमांत पुढाकार घेऊन बहुविद्याशाखीय गटाचे नेतृत्व केले. या कार्यक्रमांतर्गत त्यांनी भारतातील दहा राज्यांशी सहकार्य करून सुरवातीपासून राष्ट्रीय कार्यक्रम स्थापन केला. त्यामुळे आजपर्यंत चाळीस लाख महिला शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठीच्या कार्यक्रमाचा पाया घातला गेला. स्थानिक समुदाय, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि भागीदार संघटना इत्यादीचा त्यात सहयोग घडवून आणला. नायक यांनी ५००हून अधिक भाताच्या जातींसाठी १०,०००हून अधिक व्यापक प्रत्यक्ष शेतात चाचण्या आयोजित केल्या. आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांमधील विविध परिसंस्थांमध्ये हजारो अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबत काम केले. भाताच्या हवामान-संवदेनक्षम आणि जैवसंपृक्त अशा २०पेक्षा जास्त जातींचा भात लागवडीसाठी यशस्वी प्रसार आणि अवलंब करण्याच्या अखंड प्रयत्नात त्या केंद्रस्थानी होत्या. भाताच्या या वाणामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्रात मोठा बदल झाला. हे वाण सर्व कृषी कुटुंबांच्या अन्न आणि पीक चक्राचा अविभाज्य भाग बनले. सध्या सहयोगी धान बियाणे हे ओडिशा आणि उर्वरित भारतातील सर्वाधिक मागणी असलेल्या उत्पादनांपैकी एक आहे. त्यांनी ‘सीड विदाऊट बॉर्डर्स’ या धोरण कराराद्वारे प्रादेशिक सहकार्य वाढवण्यात उत्प्रेरक भूमिका बजावली. त्यामुळे दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये आधुनिक भाताच्या वाणांचा वेगाने प्रसार होण्यास मदत झाली. नायक यांनी संस्थापित केलेले अद्वितीय प्रतिमान आणि मेहनती भागीदारी या रणनीतीमुळे भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये भाताच्या हवामान-प्रतिरोधक अनेक जातींची यशस्वीपणे लागवड केली गेली.
नायक शाश्वत कृषी तंत्रज्ञान आणि एंटरप्राइझ विकासावर भर देणाऱ्या ग्रामीण नाविन्यपूर्ण प्रारूपांना प्रोत्साहन देतात. सहभागी क्षेत्र संशोधन, विस्तार प्रतिरूपाचे प्रमाणीकरण आणि प्रमाणन यांचे नेतृत्व करण्यात त्या निपुण आहेत. राष्ट्रीय संस्थांद्वारे त्यांच्या प्रतिकृतीची मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती केली गेली आहे. त्या विस्तार आणि क्षेत्रीय संशोधनात अग्रेसर असून अनेकांसाठी विशेषत: महिलांसाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे. नायक यांचे महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य बियाणे उत्पादन व्यवसायांच्या स्थापनेत योगदान आहे. भाताच्या नवीन वाणांचे मूल्यमापन आणि अभिप्राय गोळा करण्याच्या कामात त्यांनी महिलांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याकरिता विविध कामांचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या कार्यक्रमांतर्गत सर्व कामांमध्ये ४०%पेक्षा जास्त सहभाग हा महिला शेतकऱ्यांचा आहे. नायक यांच्या संशोधन प्रयत्नामुळे उत्पादकता वाढून महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरणही होत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे महिलांच्या नेतृत्वाखालील बियाणे उद्योगांनी सन २०२१या वर्षी अंदाजे ८.५ मेट्रिक टन दर्जेदार बियाणांचे उत्पादन, वितरण आणि विक्री केली.
सध्या नायक नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेत बियाणे प्रणाली आणि उत्पादन व्यवस्थापनासाठी दक्षिण आशिया विभागाच्या प्रमुख म्हणून काम करतात.
कळीचे शब्द : #बिहाना दीदी #नॉर्मन बोरलाग पुरस्कार
संदर्भ :
- https://www.worldfoodprize.org/en/nominations/norman_borlaug_field_award/2023_recipient/
- https://www.etvbharat.com/english/bharat/agricultural-scientist-dr-swati-nayak-bags-prestigious-norman-borlaug-field
समीक्षक : मोहन मद्वण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.