1. वाल्मिकी,ओमप्रकाश : (३० जून १९५० – १७ नोव्हेंबर २०१३). एक प्रसिद्ध भारतीय हिंदी दलित साहित्यिक. त्यांचे हिन्दी साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बरला गावात वाल्मिकी समुदायात झाला. हा पूर्वाश्रमीचा एक अस्पृश्य समुदाय.  वाल्मिकी यांना लहान वयातच जातीय भेदभावाची झळ सोसावी लागली. शाळेत त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जात असे. शिक्षक आणि उच्चवर्णीय विद्यार्थी त्यांना हीन वागणूक देत असत. अनेकदा शाळेत प्रवेश नाकारला जात असे किंवा शाळेची साफसफाई त्यांच्याकडून करून घेतली जात असे. त्यांचे कुटुंब अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगत होते. अशा परिस्थितीत शिक्षण घेणे हे मोठे आव्हान होते. त्यांच्या वडिलांना याची जाणीव होती. त्यांनी आपल्या मुलाला शिकवण्याचा निर्धार केला होता. पण त्यांना सतत समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना वारंवार सांगितले जात असे की “या मुलाला शिकवून काही उपयोग नाही. तो शेवटी झाडूच मारणार!

ओमप्रकाश वाल्मिकी यांनी  शिकण्याची जिद्द कायम बाळगली. देहरादूनमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. उच्चशिक्षण घेत असताना त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. कधी पैशांची चणचण, कधी जातीय भेदभाव, तर कधी समाजातील उच्चवर्णीय मानसिकतेने उभी केलेली बंधने. पुढे, त्यांनी हिंदी साहित्यात एम.ए. केले. याच काळात त्यांना ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी लागली. नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात अंबरनाथ आणि चंद्रपूर येथे बराच काळ त्यांचे वास्तव्य होते. त्यांनी १९८० च्या दशकात साहित्य प्रवासाची सुरुवात केली. त्या काळात दलित साहित्य हा एक नव्याने आकार घेत असलेला प्रवाह होता, ज्यामध्ये दलितांचे वास्तववादी अनुभव, त्यांच्या वेदना, शोषण आणि सामाजिक लढ्यांचे प्रामाणिक चित्रण केले जात होते. वाल्मिकी त्या चळवळीतील अग्रगण्य लेखकांपैकी एक बनले आणि त्यांनी आपल्या लेखनातून हा साहित्यप्रवाह अधिक सशक्त केला.

ओमप्रकाश वाल्मिकी यांचे आत्मकथन जूठन १९९७ साली प्रकाशित झाले.दलित साहित्यातील तो एक महत्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. झूठनमध्ये त्यांनी जीवनातील संघर्षांचा आणि सामाजिक अन्यायाचा अनुभव विषद केला आहे. झूठनद्वारे वाल्मिकी यांनी दलित साहित्यात नवे दालन उघडले. आत्मकथन झूठन मराठी, गुजराती, इंग्रजी, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. तसेच त्यांच्या कविता आणि गद्य लेखनाचेही विविध भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाले आहेत.

वाल्मिकी यांचे योगदान केवळ आत्मकथनापुरते मर्यादित नाही. तर त्यांनी दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचा विचार मांडून दलित साहित्य केवळ भावना किंवा सहानुभूतीवर आधारलेले नाही, तर ते संघर्ष, विद्रोह आणि सामाजिक परिवर्तनाचा दस्तऐवज आहे असा  निष्कर्ष मांडला. त्यांच्या मते, दलित साहित्य हे सौंदर्यशास्त्राच्या पारंपरिक निकषांपेक्षा वेगळे आहे, कारण ते वास्तविक अनुभवांवर आधारित आहे. दलित साहित्याने समाजाच्या दुर्लक्षित, पीडित आणि शोषित घटकांचे वास्तव मांडले.हे साहित्य सौंदर्य, रस, कल्पनारंजन यापेक्षा वेदना, विद्रोह, तिरस्कार आणि अस्तित्वाच्या संघर्षावर केंद्रित आहे.’

वाल्मिकी यांनी दलित साहित्याची मूलभूत बैठक मांडण्यासाठी पूढील ग्रंथ लिहिले. दलित साहित्य का सौंदर्यशास्त्र, मुख्यधारा और दलित साहित्य, दलित साहित्य : अनुभव, संघर्ष और यथार्थ.याशिवाय ते प्रभावी कवी आणि कथालेखकही होते. त्यांच्या कवितांचा रोख केवळ वेदनेच्या मांडणीवर नाही, तर त्या वेदनेला बंडखोरीची धार देण्यावर आहे. सदियों का संताप, बस्स! बहुत हो चुका, अब और नहीं, शब्द झूठ नहीं बोलते हे त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह. वाल्मिकी यांच्या कवितांची वैशिष्ट्ये म्हणजे, त्यात आक्रमक आणि परखड मांडणी आहे.  सौंदर्यशास्त्राच्या पारंपरिक चौकटींपेक्षा वास्तवाचे निखळ दर्शन आहे. त्यांची भाषा साहित्यिक चमत्कृतीपेक्षा, जीवनाच्या वास्तवाच्या जवळ जाणारी आणि संघर्षाची जाणीव करून देणारीआहे.

वाल्मिकी यांचे कथालेखनही त्यांच्या आत्मकथनाइतकेच प्रभावी आहे. त्यांचा पहिला कथासंग्रह सलाम (२०००) दलित जीवनाच्या वेदना आणि सामाजिक अन्यायावर प्रकाश टाकतो, ज्यातील मुख्य कथा एका दलित मुलाच्या माध्यमातून जातीय अपमानाची हृदयस्पर्शी अभिव्यक्ती करते. घुसपैठिए (२००४) हा संग्रह शिक्षणव्यवस्थेतील जातीय भेदभावाचे चित्रण करतो, तर अम्मा एंड अदर स्टोरीज मध्ये दलित स्त्रियांच्या संघर्षांना केंद्रस्थानी आणले आहे. वाल्मीकि यांच्या छतरी या कथासंग्रहात दलित समुदायाचे आर्थिक शोषण आणि सामाजिक अत्याचार प्रामुख्याने दाखवले आहेत. त्यांच्या कथा दलित जीवनाच्या विविध पैलूंना म्हणजे दारिद्र्य, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता या प्रश्नांना स्वानुभूतीने मांडतात. या कथांमध्ये दलित चेतना, प्रतिकाराची भावना आणि सामाजिक न्यायाची मागणी स्पष्टपणे दिसून येते, ज्यामुळे त्यांच्या लेखनाला एक विशिष्ट ओळख मिळाली. त्यांच्या कथांची भाषा साधी पण प्रभावी आहे, जी वाचकांना हादरवून सोडते. त्यांच्या लेखनात दलित समाजाची प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि संघर्ष प्रखरपणे व्यक्त झाला. यामुळे हिंदी साहित्यातील दलित विमर्शाला नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्यांचे साहित्य केवळ साहित्यिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरले नाही, तर सामाजिक जाणिवांच्या विकासात मौलिक भर घालणारे ठरले.

वाल्मिकी यांनी नाट्यलेखन, अभिनय आणि भाषांतर देखील केले. त्यांचे दो चेहरे हे नाटक प्रसिद्ध आहे. याशिवाय ते स्वतः एक कुशल अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी६० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला आणि अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. तसेच इतर भाषांमधील महत्त्वाच्या साहित्यकृतींचे त्यांनी हिंदीत भाषांतर केले. अरुण काळे यांचा मराठी कविता संग्रह सायरनचे शहर आणि कांचा इलैया यांच्या Why I Am Not a Hindu या इंग्रजी ग्रंथाचे त्यांनी हिंदीत भाषांतर करून मोठे योगदान दिले आहे. याशिवाय लोकनाथ यशवंत यांच्या मराठी कवितांचे त्यांनी हिंदीत अनुवाद केले आहेत.

त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना १९९३ साली त्यांना डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  तर १९९५ साली परिवेश सन्मान व २००१ साली कथाक्रम सन्मान प्रदान करण्यात आला. २००४ साली लाभलेल्या ‘न्यू इंडिया बुक’ पुरस्कारानंतर त्यांची ख्याती भारतभर पोहोचली. पुढे २००६ साली त्यांना उत्तर प्रदेश हिन्दी संस्थानकडून साहित्य भूषण सन्मान प्रदान करण्यात आला. तर २००७ साली न्यूयॉर्क येथील आठव्या विश्व हिन्दी संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

दलित साहित्याला हिंदी साहित्याच्या जागतिक व्यासपीठावर स्थान मिळावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ओळख निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. ते दीर्घकाळ कर्करोगाने पीडित होते. १७ नोव्हेंबर २०१३ रोजी उत्तराखंडच्या डेहराडून येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ:

  • कर्दम, जयप्रकाश, ओमप्रकाश वाल्मिकी व्यक्ति, विचारक और सृजक, वाणी प्रकाशन, २०१६.
  • वाल्मिकी, ओमप्रकाश, दलित साहित्य का सौन्दर्यशास्त्र, राधाकृष्ण प्रकाशन, २००१.
  • वाल्मिकी, ओमप्रकाश,मुख्यधारा और दलित साहित्य, स्पेस पब्लिशिंग हाऊस, २०१९.
  • वाल्मिकी, ओमप्रकाश, झूठन, राधाकृष्ण प्रकाशन, २०१५.

समीक्षण : संतोष गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.