मेनन, मंबिल्लिकालाती गोविंद कुमार : (२८ ऑगस्ट १९२८ — २२ नोव्हेंबर २०१६). भारतीय भौतिकीविज्ञ. दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरण निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री (१९६१), पद्मभूषण (१९६८), पद्मविभूषण (१९८५) पुरस्काराने सन्मानित केले, तसेच त्यांना अब्दुस कलाम पदक (१९९६) आणि शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (१९६०) यांनीही सन्मानित करण्यात आले.
मेनन.यांचा जन्म कर्नाटकातील मेंगलोर येथे झाला. मद्रासमधील गुड शेफर्ड कॉन्व्हेंटमधून त्यांनी मॅट्रिक्युलेटची परीक्षा पास केली (१९४२). पंजाब युनिव्हर्सिटीमधून ते विज्ञान शाखेचे पदवीधर झाले (१९४६). वैद्यकीय शिक्षण घेण्याचा विचार असतांना सर सी. व्ही. रामन यांनी त्यांना भौतिकशास्त्रात संशोधन करण्याचा सल्ला दिला. मेनन यांनी मुंबईतील रॉयल इन्स्टिटयूट ऑफ सायन्समध्ये वर्णपटविज्ञानतज्ज्ञ प्रो. एन. आर. तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनकार्याला सुरुवात केली. त्यांचा पदव्युत्तर अभ्यासासाठी ‘कार्बनच्या उच्च-दाब वर्णपटाचा अभ्यास’ हा असतांना ‘कार्बनच्या उच्च-दाब वर्णपटातील प्रारंभिक पातळी विषयीची टिपणी’ असा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. ते ब्रिस्टल येथील प्रो. सेसिल फ्रँक पॉवेल यांच्या गटात सामील होऊन ‘टाऊ, काप्पा आणि चाई कण’ या विषयावर पीच.डी पदवी संपादन केली (१९५३).
मेनन यांनी मूलभूत कणांच्या गटाची गुंतागुंत उलगडण्याच्या कठीण वर्षांमध्ये कणभौतिकविज्ञानात मोठे योगदान दिले. प्राथमिक कणांचे मानकचित्र बनविण्यासाठी ते केंद्रस्थानी होते. भारीत केऑन {केऑन (kaon) अर्थात केमेसॉन (K-meson) हा पुंजाकांने ओळखल्या जाणाऱ्या चार मेसॉन्सचा कोणताही गट असू शकतो} दोन आणि तीन क्षयपद्धतीच्या अभ्यासासाठी ते विशेषत्वाने ओळखले जातात. त्यामुळे समानतेचे जतन न होण्याचे संकेत देणारा τ-Φ हा कूटप्रश्न निर्माण झाला. त्यांनी उच्च ऊर्जाधारित अन्योन्य क्रियेतून एकत्र उत्पन्न होणाऱ्या केऑन्स आणि हायपरॉन्सच्या निर्मितीचे वर्णन करण्यासाठी ‘संयुक्त उत्पादन’ हा चपखल शब्द वापरला. भूगर्भांतर्गत प्रयोगांसाठी त्यांनी एक गट तयार केला. १९६५ मध्ये खूप खोलवर प्रयोग करत असतांना वैश्विक किरण न्यूट्रिनो आणि एक खडक यांच्यातील अन्योन्य क्रियेने एक ऊर्जावान म्यूऑन (muon) निर्माण झाला. १९८० मध्ये त्यांनी भूगर्भात अधिक खोलवर एक शोध यंत्रणा बसविली. त्याद्वारे त्यांनी प्रोटॉनच्या क्षयासाठीची आयुर्मर्यादाही ठरविली.
मेनन यांनी इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियनचे अध्यक्ष या नात्याने संयुक्त राष्ट्रांच्या धोरणात्मक संस्थेमध्ये सहभाग आणि नेतृत्व केले.ते जागतिक विज्ञान अकादमीचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष होते. होमी भाभा यांच्या आग्रहास्तव ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले (१९५५).ते टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी (१९६६—७५), तसेच रामन रिसर्च या संस्थेवरही कार्यरत होते.
मेनन यांनी पुढीलप्रमाणे भारतील विविध संस्थांवर महत्त्वांच्या पदांवर काम केले : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष (१९७२), संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार (१९७४), संरक्षण संशोधन व विकास (DRDO) संस्थेचे महासंचालक (१९७४ — १९७८), केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव (१९७८), पर्यावरण विभागाचे सचिव (१९८०), नियोजन आयोगाचे सदस्य (१९८२ —१९८९), पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार (१९८० — १९८९ ), वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष (१९८९ — १९९०). विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्री (१९८९), राज्यसभेचे खासदार (१९९० — १९९६).
मेनन यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #TIFR #DRDO #ISRO
संदर्भ :
- https://www.drdo.gov.in
- https:// www.isro.gov.in
- royalsocietypublishing. Org
- https://en.m.wikipedia.org
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.