मणी, ॲना : (२३ ऑगस्ट १९१८ — १६ ऑगस्ट २००१). भारतीय हवामानशास्त्राच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ. भारतीय हवामान विभागाच्या उपमहासंचालक या पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या आणि रामन संशोधन संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. हवामानशास्त्रीय उपकरणांच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले, संशोधन केले आणि सौर विकिरण, ओझोन व पवन ऊर्जा मोजमापांवर असंख्य शोधनिबंध प्रकाशित केले.

मणी यांचा जन्म केरळच्या त्रावणकोर संस्थानातील मध (आत्ताचे तिरुअनंतपुरम) पीरुमेडू या गावात झाला. बालपणापासूनच अभ्यासाची आवड त्यांना होती. त्यांनी मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथील पंचाईप्पा महाविद्यालयातून भौतिकशास्त्र या विषयात बी. एस्सी. (ऑनर्स) पदवी मिळविली (१९३९). बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्य येथे संशोधन शिष्यवृत्ती अंतर्गत नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली हिरे व माणिक या रत्नांच्या प्रतिदीप्ती (फ्लुरोसन्स) परिणामांची नोंद करून त्यांचे विश्लेषण केले, तसेच रामन वर्णपट शोषण आणि त्यांचे तापमानावर असणारे अवलंबन यांचा अभ्यास केला. त्यांच्या संशोधनावर आधारलेले पांच शोधनिबंध १९४२ — १९४५ या काळातच प्रसिद्ध झाले. पुढे  १९४५ मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये संशोधन शिष्यवृत्ती स्वीकारून इंपिरियल कॉलेजमध्ये हवामानशास्त्राच्या उपकरणांच्या अभ्यास व निर्मितीचा कालावधी पूर्ण केला. भारतात परतल्यानंतर (१९४८) त्याच वर्षी त्या पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभाग (इंडिया मिटिऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट) येथे रुजू झाल्या. किरणांच्या उत्सर्जनाचे मापन करणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. उपलब्ध सामग्रीतून उपकरणांची निर्मिती करीत असताना त्यांनी गुणवत्तेबाबत कधीही तडजोड केली नाही. कोणतेही काम करण्यासाठी नेहमी उत्तम मार्ग निवडावा हे त्यांचे बोधवाक्य होते

मणी यांच्या कारकीर्दीत पर्जन्य, तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग मोजण्याची यंत्रे तसेच वाऱ्याचा दिशादर्शक यासारखी उपयुक्त उपकरणे भारतातच बनू लागल्यामुळे या क्षेत्रात देश स्वयंपूर्ण झाला. त्यांच्या या कामामुळे हवामानाच्या नोंदी विशेषतः सौर व पवन ऊर्जा यांचा पर्यायी ऊर्जा म्हणून वापर करणाऱ्या देशांमध्ये आपला देश आघाडीवर राहिला. सौर विकिरण, ओझोन आणि पवन ऊर्जा मापन यंत्रांसाठी त्यांनी पुण्यातील विभागात एक उपकरण विभाग सुरू केला. तो आजही अद्ययावत स्थितीत कार्यरत आहे. त्यांनी हवामानशास्त्राच्या विविध प्रकारच्या १०० उपकरणांच्या रचनेचे मानकीकरण (स्टॅन्डर्डायझेशन) करून उपकरण निर्मिती सुरू केली. १९५७-५८ या आंतरराष्ट्रीय भूभौतिक वर्षात त्यांनी सौर किरणांचे उत्सर्जन मोजणाऱ्या उपकरणांच्या स्थानकांचे जाळे (नेटवर्क) भारतात स्थापन केले. ओझोन वायूच्या स्तराचा उपयोग व परिणाम यावर जगात कुठे विचारही झाला नव्हता, तेव्हा त्यांनी वातावरणातील ओझोन वायू मोजण्यासाठी ‘ओझोनसोंड’ नावाचे उपकरण तयार केले. त्यांनी एकटीने या उपकरणाच्या निर्मितीपासून ते भारतातील ओझोनच्या प्रमाणाची विश्वसनीय माहिती जमा करण्यापर्यंतचे काम केले. त्यांच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्यांच्या कामामुळे  आंतरराष्ट्रीय ओझोन आयोगाचे (इंटरनॅशनल ओझोन कमिशन) सदस्यत्व त्यांना बहाल केले. १९५९—६५ या काळात इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्सपिडिशन (आयआयओई) हा हिंदी महासागराचा बहुउद्देशीय अभ्यास करण्यासाठी आणि निरीक्षणे नोंदवण्याच्या बहुराष्ट्रीय प्रकल्पासाठी त्यांनी तयार केलेली उपकरणे हवामानाच्या निरीक्षणांसाठी आणि नोंदींसाठी जहाजांवर उपयुक्त ठरली होती. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ.विक्रम साराभाई यांच्या विनंतीवरून त्यांनी १९६३ मध्ये थुंबा येथील क्षेपणास्त्र प्रक्षेपण (रॉकेट लॉन्चिंग) केंद्रामध्ये हवामानशास्त्राची अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन केली, तसेच हवेच्या विविध घटकांचे मोजमाप करणाऱ्या उपकरणांसह एक मनोरा (इन्स्ट्रूमेंटेमेंटेड टॉवर) तयार केला. त्यांच्या या शिस्तबद्ध व्यवस्थापन व कार्यपद्धतीमुळे आणि गुणवत्तापूर्ण कामामुळे त्यांना हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक (डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ मिटिऑरॉलॉजी) या पदापर्यंत पोहचल्या.

मणी यांनी निवृत्तीनंतर बंगळुरु येथील रामण संशोधन संस्थेत तीन वर्षे अभ्यागत प्राध्यापक पदावर संशोधनाचे काम केले. त्यांनी बंगळुरुमधील नंदी हिल्स इथे मिलीमिटर तरंग लांबी लहरींसाठी दुर्बीण (मिलिमीटर वेव्ह टेलीस्कोप) बसवून ती कार्यरत केली. ‘सौर व पवन ऊर्जेच्या संभाव्य संसाधनांचा आढावा घेणे’ या भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या प्रकल्पासाठी पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेचा क्षेत्रीय संशोधन विभाग बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेत स्थापन केला. या प्रकल्पाअंतर्गत त्या वयाच्या ८० वर्षांपर्यंत सौर विकिरण व पवन ऊर्जा विषयांवरील संशोधन कार्यात मग्न होत्या. तेथील संशोधनावर त्यांनी पुस्तके व शोधनिबंध लिहिले, जे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रांसाठी अतिशय उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरले. भविष्यात देशाच्या विकासासाठी पर्यायी ऊर्जा स्त्रोताची गरज भासणार आहे. यामध्ये सौर आणि पवन उर्जेचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. यासाठी त्यांनी ७०० ठिकाणी  अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने वर्षभर वाऱ्याचा वेग अविरत मोजण्याची व्यवस्था केली.

मणी यांनी वाऱ्याचा वेग आणि सौर ऊर्जा मोजणाऱ्या उपकरणांची निर्मिती करण्यासाठी बंगळुरुमध्ये एक उपकरण बांधणी विभाग सुरू केला. या विभागात बनवली जाणारी  उपकरणे भारतात पवन व सौर उर्जा निर्मितीचा विकास करण्यासाठी उपयुक्त होतील याची मणी यांना पक्की खात्री होती. सध्या भारत या दोन्ही ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर आहे. मणी यांना महिला वैज्ञानिक म्हणून अडथळा आला नसला, तरी पुरुष वैज्ञानिकांच्या टीकेचे कारण होऊ नये  म्हणून उपकरणे तयार करताना आणि वापरताना त्या खूप काळजी घेत असत.

मणी इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, अमेरिकन मिटिऑरॉलॉजिकल सोसायटी, इंटरनॅशनल सोलर एनर्जी सोसायटी इत्यादींसारख्या अनेक ख्यातनाम संस्था, संघटनांच्या सन्माननीय सदस्या ह़ोत्या. हवामानशास्त्रातील सर्वोत्तम कार्य व त्याच्या विकासामध्ये केलेल्या योगदानाची दखल घेऊन इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीने के. आर. रामनाथन मेडल हे प्रतिष्ठित पदक त्यांना बहाल करण्यात आले (१९८७). आंतरराष्ट्रीय स्तरावर मणी यांची जागतिक हवामानशास्त्र संघटना (वर्ल्ड मिटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन) याच्या अंतर्गत अनेक आयोग व सल्लागारांच्या गटांचे नेतृत्व करण्याची व महत्त्वाच्या प्रमुख पदांवर काम करण्यासाठी निवड झाली होती. हवामानाच्या अभ्यासासाठी लागणारी उपकरणे व निरीक्षणांच्या पद्धती यांची सुधारित मार्गदर्शिका तयार करण्याच्या जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या मुख्यालयाच्या कामातही त्यांनी मदत केली. किरणांच्या उत्सर्जनाचा अभ्यास व संशोधन यांचे तज्ञ म्हणून  त्यांनी काही काळ इजिप्तमध्येही काम केले. सौर विकिरण या विषयावर १९८०-८१ मध्ये लिहिलेली दोन पुस्तके सौर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उपयुक्त संदर्भग्रंथ आहेत. आजही अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात काम करणारे या पुस्तकांचा वापर करतात.

मणी यांचे तिरुअनंतपुरम येथे निधन झाले.

कळीचे शब्द : #सौर #विकिरण #ओझोन #सौरऊर्जा  #पवनऊर्जा

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Anna_Mani
  • https://en.m.wikipedia.org
  • https://nobelprizeseries.in
  • Biographical memoirs Indian Academy of Sciences
  • https://www.ias.ac.in
  • Celebrating pioneer Indian Meteorologist Anna Mani, 23 August 2018
  • https://public.wmo.in
  • Interview with Dr. HussanTaba, WMOBulletin, Vol. 40, No. 4, 1991

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.