समाजाच्या पुनर्निर्मितीचे व सामाजिक न्यायाचे तत्त्व आचरणात आणण्यासाठी महात्मा गांधींनी जो कार्यक्रम पुरस्कृत केला तो म्हणजे ‘सर्वोदय’ होय. या कार्यक्रमाचा विस्तार म. गांधींचे
अनुयायी आचार्य विनोबा भावे यांनी केला. मानवी प्रगतीचा लाभ केवळ शेवटच्या व्यक्तिपर्यंत नव्हे, तर सर्वांनाच एक समयावच्छेदे करून मिळाला पाहिजे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. म्हणजेच, कोणत्याही व्यक्तीला मानवी प्रगतीच्या लाभतून कधीही वगळता कामा नये. सर्वोदयाच्या नियमांचे पालन केले, तर सर्व समस्यांचे निर्मूलन होऊन सर्वांचे कल्याण होईल, असा म. गांधींना विश्वास होता.
सर्वोदयाचा सामान्य अर्थ ‘सर्वांचा उदय’ असा होतो. सर्वोदय ही एक विचारधारा असून ती ‘सर्वोदयी तत्त्वज्ञान’ किंवा ‘सर्वोदयी चळवळ’ अशा स्वरूपातदेखील व्यक्त केली जाते. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उद्धार, सर्वांचा विकास, समाजामधील सर्व वर्गांचे कल्याण होय. सर्वोदय ही विचारधारा केवळ काही व्यक्तींच्या किंवा व्यक्ती समूहांच्या उन्नतीशी संबंधीत नसून ती समाजामधील प्रत्येक एका व्यक्तीच्या आणि एकूणच संपूर्ण समाजाच्या उन्नतीशी संबंधीत असणारी विचारधारा आहे. तसेच ती एका विशिष्ट देशापुरती संबंधित नसून ती सार्वभौमिक आणि सर्वकालीन विचारधारा म्हणून संपूर्ण विश्वाचे कल्याण इच्छिते. सर्वोदय ही एक अशा वर्गरहित, जातीरहित आणि शोषणरहित ‘सर्वोदयी समाजाची’ निर्मिती करू ईच्छिते की, त्यामधील प्रत्येक व्यक्ती आणि समुदायाला आपल्या सर्वांगीण विकासाचेची साधने आणि संधी समान प्रमाणात प्राप्त होऊ शकतील. या सर्वोदयी विचारधारेमध्ये समाजासंदर्भात केलेले आर्थिक बाजूंचे विवेचन म्हणजे ‘सर्वोदयाचे अर्थशास्त्र’ होय.
सर्वोदय या विचारधारेचा मूळ उगम हा पूर्वेकडील व पश्चिमेकडील देशांमधील धार्मिक आणि सामजिक परंपरांमध्ये सापडतो. याशिवाय जॉन रस्किन, टॉल्स्टॉय, इमर्सन, थोरेऑ, कॅरलीले, मॅझिनी, म. गांधी, विनोबा भावे यांसारख्या विख्यात व्यक्तींच्या लिखाणात सर्वोदयविषयी माहिती प्राप्त होते. सर्वोदय विचारधारेचा अवलंब अनेक देशांमध्ये करण्यात आला होता. गांधींच्या मनातही सर्वोदय विचार होते. त्यातच ते जॉन रस्किन यांच्या अनटू धिस लास्ट हे पुस्तक वाचून प्रभावित झाले आणि या पुस्तकाचे गुजरातीमध्ये सर्वोदय या शीर्षकाने भाषांतर करून भारतामध्ये सर्वप्रथम इ. स. १९०८ मध्ये त्याची ओळख त्या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिली; मात्र विनोबांनी सर्वोदयाचे तत्त्वज्ञान हे समाज जीवनात प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले. त्यामध्ये भूसंपत्तीच्या न्याय्य वितरणासाठी भूदान, मालकी विसर्जनासाठी ‘ग्रामदान’, शांतता स्थापनेसाठी ‘शांतीसेना’, देशाच्या एकतेसाठी ‘देवनागरी लिपी’चा आग्रह, समाजाच्या मार्गदर्शनासाठी ‘आचार्यकुल’, गीता, बायबल, कुराण इत्यादी धार्मिक ग्रंथाना ‘अध्यात्मिक ग्रंथ’ मानण्याची दृष्टी, ‘राजनीती’ला पर्याय म्हणून ‘लोकनीती’, एक आणा आहार प्रयोग, कांचनमुक्तीच्या प्रयोगाद्वारे ‘अर्थनीती’, बैलांशिवाय शेतीची मशागत करणारी ‘कृषी शेती’ इत्यादी प्रमुख उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांद्वारे ‘शासनरहीत’ आणि ‘वर्गरहीत’ समाजाची निर्मिती करणे हा सर्वोदय विचारधारेचा मुख्य जाहीरनामा होता.
संपत्ती व मालकी हक्क विषयक सर्वोदयी विचार : सर्वोदयामध्ये खाजगी मालकी हक्काच्या जमिनी आणि इतर उत्पादनाचे साधने हे पिळवणूक किंवा शोषणाचे स्रोत मानले असून त्या शोषणाने ग्रासलेल्या व्यवस्थेचे अहिंसात्मक मार्गाने उच्चाटन करणे हे सर्वोदयाचे उद्दिष्ट आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती ही कोणत्याही व्यक्तीची खाजगी संपत्ती नसून ती सर्वांसाठी आहे, असा विचार सर्वोदयाचा आहे. श्रीमंत वर्गाच्या नैतिक आणि अध्यात्मिक दृष्टीकोनास विस्तृत करून समाजामधील गरीब, पीडित वर्गांची उन्नती करणे हा सर्वोदयाचा हेतू आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्तीचा परित्याग करण्याची संकल्पना सर्वोदयामध्ये मांडली गेली. सर्वोदयाच्या भूदान चळवळीमध्ये स्वेच्छेने आणि हृदय परिवर्तनाद्वारे श्रीमंत व्यक्तींच्या जमिनींचे गरीबांमध्ये वाटपसुद्धा करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीने स्वतःकडील अतिरिक्त वस्तू किंवा संपत्तीला स्वतः मालक न समजता त्या अतिरिक्त वस्तूंचे किंवा संपत्तीचे संरक्षक म्हणून समजावे आणि त्याचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी करावा. सर्वोदयामध्ये बुद्धी, शक्ती आणि पुरुषार्थ ही धनार्जनाची साधने मानली गेली. व्यक्तीजवळ असणारी संपत्ती ही केवळ त्याच्याच उपभोगासाठी नसून तिचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठी करणे आवश्यक आहे. सर्वोदयी समाजामध्ये संपूर्ण संपत्ती ही सार्वजनिक मालकीची मानली आहे आणि या संपूर्ण सार्वजनिक संपत्तीचा वापर समाजातील प्रत्येक एका व्यक्तीसाठी आणि एकूणच समाजाच्या कल्याणासाठी करण्याचा विचार सर्वोदयामध्ये मांडण्यात आला आहे. हा सर्वोदयी विचार स्वीकारल्यास मालकी तत्त्वाने निर्माण झालेल्या आर्थिक विषमता आणि सामाजिक समस्यांमधून आपली मुक्तता होईल. भूदान, ग्रामदान, संपत्तीदान, समयदान, जीवनदान, विश्वस्त भावना इत्यादींद्वारे मालकी विसर्जनाची कल्पना मूर्त स्वरूपात येऊ शकते, अशी मांडणी सर्वोदयाच्या आर्थिक विचारामध्ये करण्यात आली आहे. दानाचा उद्देश ‘स्वामित्व विसर्जनाची दीक्षा’ घेणे हा आहे. तसेच त्याद्वारे अर्थशुद्धी आणि व्यवहारशुद्धी होते अशीही मांडणी सर्वोदयाच्या आर्थिक विचारांमध्ये केली आहे. प्रत्येक व्यक्तीने इतर व्यक्तींची गरज लक्षात घेत स्वतःला पुरेल इतकेच संचय ग्रहण करणे आवश्यक मानले आहे. याला सर्वोदयामध्ये ‘असंग्रह’ तत्त्व संबोधण्यात आले आहे. ‘असंग्रह’ म्हणजे गरजेपेक्षा अधिक संग्रह न करणे. संग्रह वृत्तीतून सामाजिक आणि आर्थिक विषमता निर्माण होते. विषमतेतून दारिद्र्य, दारिद्र्यातून वर्गसंघर्ष, वर्गसंघर्षातून हिंसा असा हा क्रम आहे. परिणामी देश दुर्बल होतो आणि त्याचा फायदा परकीय शक्तींना होतो. म्हणूनच सर्वोदयामध्ये प्रत्येकाने ‘असंग्रह’ व्रताचे धारण करणे आवश्यक मानले गेले आहे.
श्रम विषयक विचार : सर्वोदयी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार समाजाच्या उन्नतीकरिता श्रम रूपात सहभाग द्यावा. सर्वोदयानुसार शारीरिक श्रमाला आणि बौद्धिक श्रमाला समान प्रतिष्ठा व समान मूल्य दिल्याने भविष्यकालीन समाजामध्ये त्या श्रमांमधील भेद नष्ट होईल, असे सांगण्यात आले. समाजातील प्रत्येक सेवा भिन्न प्रकारची असली, तरी तिचे आर्थिक मूल्य मात्र समानाच असले पाहिजे. त्यामुळेच सर्वोदयाच्या अर्थशास्त्रामध्ये श्रम आणि भांडवल या दोघांमध्ये भेद करण्यात आलेला नाही. एक किलो धान्याची पोषणक्षमता पूर्वी होती तेवढीच आजही आहे. पैशाचे मूल्य कमी-अधिक होत राहते. श्रमाशिवाय संपत्ती म्हणजे चोरीच असून ‘अस्तेय’ आणि ‘शरीरश्रम’ हे सर्वोदयामधील महत्त्वाची व्रते आहेत. शरीरश्रमाला दिलेले महत्त्व, भूमीची सार्वजनिक मालकी आणि वैयक्तिक संपत्तीचा असंग्रह या कारणांने सर्वोदयी अर्थशास्त्रामध्ये उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये खंड, मजुरी, व्याज, नफा, असाही भेद करण्यात आलेला नाही. व्याजाने पैसे देणे, भाडेपट्टी, दलाली यांचे निराकरण करण्याचाही विचार सर्वोदयी अर्थशास्त्रामध्ये मांडण्यात आला आहे.
उद्योग विषयक विचार : कोणत्याही सत्तेचे केंद्रीकरण झाले की, शोषण होते. मोठ्या उत्पादनपेढ्या फार मोठ्या प्रमाणात सक्तीने उत्पादन घेऊ लागले की, संपत्ती आणि बलाचे ध्रुवीकरण होते आणि त्यामधून शोषण व पिळवणूक होऊ शकते. सर्वोदयामध्ये आर्थिक आणि राजनैतिक सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक मानले आहे. सर्वोदय समाज अशा हा विकेंद्रीकृत असून यात वर्गभेद नाही, प्रत्येक व्यक्तीला आर्थिक, सामाजिक, राजनैतिक उन्नती करण्याची स्वातंत्र्य व सामान संधी असेल. सर्वोदयी अर्थशास्त्रामध्ये ग्रामीण आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे विचार मांडले आहेत. विनोबांच्या मते, कटाई, बुनाई, शिलाई, सेवा इत्यादी क्षेत्रे स्त्रियांसाठी आरक्षित असली पाहिजे. स्त्रियांना आणि दुर्बल घटकांना आरक्षणाद्वारे वाव देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर केल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकणार नाही, असाही विचार सर्वोदयामध्ये मांडण्यात आला. नोकरशाही किंवा सत्तेचे ध्रुवीकरण होऊ नये म्हणून सर्वच प्रकारच्या उद्योगांतील आणि उत्पादन पेढीतील व्यवस्थापनामध्ये सर्वच व्यक्तींचा सहभाग आवश्यक मानला गेला आहे. समाजाच्या संतुलित विकासाकरिता केवळ समुदायाच्या उपयोगी पडणाऱ्या आरोग्यवर्धक, सर्जनशील, सुखप्रद अशीच कार्य आणि उत्पादने करावेत असे सांगितले गेले. तसेच उत्पादन हे व्यापारासाठी किंवा नफ्यासाठी केले जाऊ नये, तर ते उपभोगासाठी किंवा परस्परांमध्ये सामान वाटप करण्यासाठी घेतले जावे असा सर्वोदयाचा विचार आहे. यामध्ये शस्त्रसामग्री उद्योगाला स्थान दिले गेले नाही. सर्वांनी ‘अहिंसा’ तत्त्वाचा अवलंब केला, तर शस्त्रांची गरजच भासणार नाही, असाही विचार मांडण्यात आला. तसेच ‘आत्मनिर्भर गावांची निर्मिती’ हेसुद्धा सर्वोदयाचे एक उद्दिष्ट आहे.
अंगभूत पैलू : स्व-परिवर्तनाकडून समाज परिवर्तनाकडे ही सर्वोदयाची दिशा असून सर्वांचा उद्धार हा सर्वोदयाचा सार मानला जातो. शासनाचा कार्यभाग आणि व्यक्तींचे व्यक्तींकडून होणारे शोषण नाहीसे करणे हे सर्वोदयाचा हेतू आहे. सत्तेच्या ठिकाणी हिंसा व असत्याला प्रवेश मिळतो. त्यासाठी सर्वोदयामध्ये ‘स्वयंशासनाला’ महत्त्व देण्यात आले आहे. ज्या समाजामध्ये व्यक्ती हा स्व-नियमनाद्वारे कार्य करीत असतील, जेथे शासकीय नियमन नसेल किंवा ते न्यूनतम असेल, ती एक आदर्श समाज रचना मानली गेली. शासन हे जबरदस्ती किंवा जुलूम करणारे एक साधन म्हणून उरणार नाही असे विचार सर्वोदयामध्ये मांडण्यात आले. सर्वोदयामध्ये स्पर्धा, शोषण, पिळवणूक, वर्गद्वेष यांना कसलेही स्थान नाही. सर्वोदय हा शासनाकडून स्वयंशासनाकडे, नियंत्रणाकडून संयमाकडे आणि हक्क व अधिकारांकडून कर्तव्यांकडे घेऊन जाणारा एक मार्ग म्हणून सांगण्यात आला आहे.
सर्वोदयामध्ये आर्थिक विषमता हीच समाजामधील अनेक दोषांचे कारण मानली गेली आहे. देशाचे खरे शत्रू संग्रहवृत्ती, मोह, दारिद्र्य, अज्ञान आणि जातीभेद हे आहेत. यांचा बिमोड करायचा असेल, तर जमिनीचे न्याय्य वितरण, स्वच्छेने मालकी विसर्जनाचा वापर, ग्रामोद्योगाद्वारे प्रत्येकाच्या हाताला काम इत्यादी घटक आवश्यक मानले गेले आहे. न्यूनतम विनिमय, गरजेइतकेच उत्पादन, नफ्याऐवजी उपभोगासाठी उत्पादन, मोठ्या उत्पादन पेढीचा न्यूनतम वापर, ग्रामउद्योगांना प्रोत्साहन, संपत्तीचे असंग्रह, संपत्तीचा स्वच्छेने परित्याग, शरीरश्रम, प्रादेशिक आत्मनिर्भरता इत्यादी वैशिष्ट्ये सर्वोदयी अर्थशास्त्राचे आहे. सर्वोदयामधील आर्थिक बाजूची मांडणी ‘प्रत्येकाकडून क्षमतेनुसार, आणि प्रत्येकासाठी गरजेनुसार’ अशा स्वरूपात केली आहे. या सर्वोदयी विचारांना समांतर असणारा अंत्योदय हा विचारदेखील समकालीन विचारवंत पं. दीनदयाळ उपाध्याय, लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी मांडला आहे.
संदर्भ :
- Asian Survey, Vol., 27, September, 1987.
- Gandhi, M. K., Village Swaraj, Ahmedabad, 2021.
- https://www.mkgandhi.org/
- Kumrappa, J. C., Economy of Performance, Raighat, 1997.
- The Indian Journal of Political Science, Vol., 19, 59, 69, 1958.
समीक्षक : अविनाश कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.