पांडुरंग वनमाळी : ( २७ ऑगस्ट १९३१- २५ जुलै २००८). महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर, गायक, आणि लोककलावंत. पूर्ण नाव पांडुरंग विठोबा वनमाळी. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्य़ातील वसई तालुक्यातील माणिकपूर येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण बी.ए.एल.एल.बी होते. पेशाने ते वकील होते. कलेची साधना मनोभावे पूर्ण करीत त्यांनी शालेय शिक्षण त्याच तन्मयतेने पूर्ण केले. शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन सातत्याने ते आघाडीवर राहिले. विविध प्रकारची गाणी स्वतः गात शाळेत ते प्रथम क्रमांकावर राहत असायचे. म्हणूनच शालेय जीवनात कलेप्रती लाभलेली आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यातूनच त्यांनी पुढे अनेक पोवाडे, लोकगीते, समरगीते, कोळीगीते गाऊन ती अजरामर केली.

पांडुरंग वनमाळी यांनी १९५१ ते १९८२ पर्यंत मुंबई येथील न्यायालयात विविध पदावर नोकरी केली. शिवाय १९८५ ते १९९० या काळात ते मुंबई शहराचे उपनगरपाल देखील राहिले. परंतु त्यांच्यातील कलासाधना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दिवसा वकिली करून ते संध्याकाळी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत रमून जायचे. ते कलासाधनेत रमून जाताना कोणतेही गाणे गायचे तेव्हा त्यातील सुस्पष्टपणा, गाण्यातील उठाव, आणि नाविन्यता या सदोदित पैलूचे दर्शन घडत जायचे. शाहीर अमरशेख, शाहीर शेख जैनू चाँद, शाहिरा केशरताई चाँद, शाहीर गजानन बेणी या प्रतिभावंत शाहिरांचे सान्निध्य त्यांना लाभले. त्यांनी एकमेव उच्चशिक्षित शाहीर म्हणून नाव कमावले. त्यांनी अनेक शाहिरांना मार्गदर्शन केले. कलेच्या ध्यासापोटी त्यांनी ‘शाहीर पांडुरंग वनमाळी आणि पार्टी’ या नावाने कलापथक स्थापन करुन अनेक ठिकाणी दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याचे कार्य केले. विविध ठिकाणी कार्यक्रमास गेल्यावर त्यांची प्रसिद्ध झालेली गाणी गाण्यासाठी त्यांना रसिकांचा आग्रह राहायचा.

पांडुरंग वनमाळी यांनी अनेक हुंडा प्रतिबंध गीते गाऊन एकप्रकारे समाज प्रबोधनाचे कार्य केले. कावळा पिपेरी वाजवतोय मामा मामीला नाचवतोय…, गोमू तुझ्या नादानं गो बांधला बंगला…., दिंड्या मोड गं पोरी.., टिमकयाची चोळी…, वसईची मी फूलवाली…, सण हाय नारळी पुनवेचा…, चल बेगीन चल गं बंदरा…, यासह अनेक शेकडो लोकप्रिय गीते त्यांनी वैविध्यपूर्ण थाटात गायली. ते ताल-लय-सूर यात रममान झालेले गायक होते. शिवाय कित्येक गीते लिहून ती अजरामर करण्याचा मान देखील त्यांना मिळाला. त्यांची लोकप्रिय झालेली गाणी सणसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यात वाजली की रसिकांना ताल धरणे भाग पडायचे. उपजत लाभलेला गळा, आवाजातील माधुर्य आणि गाण्यातून रसिकांना अभिप्रेत असणारे संगीत यांची सांगड घालण्यात घालण्यात ते वाकबगार होते.

अस्सल कोकणी आवाजाचा बाज लाभलेल्या पांडुरंग वनमाळी यांची गाणी ऐकताना निश्चितपणे लोकसंगीताचा खजिना उलगडत जातो. ते नियमित रियाजाला प्रथम प्राधान्य द्यायचे. त्यांचे गाणे मुक्त आणि चौकट नसलेले होते. गाण्यात सहजता आणि अतिशय भावपूर्ण आविष्कार लाभलेला होता. त्यांचे गाणे ऐकताना चेहऱ्यावर भाव असे की जणू मनात कायम नृत्य चाललेल्याचा भास होत असे. अनेक शाहिरांना मार्गदर्शन करताना लोककला आणि लोकसंगीताला बेताल होऊ देऊ नका असा सल्ला ते द्यायचे.

तत्कालीन गाण्यातील धांगडधिंगा त्यांना आवडत नसायचा. हे ऐकून आणि बघून ते खेद व्यक्त करायचे. त्यांचा स्वभाव विनम्र असल्यामुळे आपल्या सहकाऱ्यांचे गुणगान ते आवर्जून करायचे. लोकसंगीताचे वैभव टिकून राहावे म्हणून त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. कोणतेही गाणे खुलवत ठेवण्याचे तंत्र त्यांना लाभलेले होते. ते अनेक प्रकारच्या गाण्यांच्या अस्सल चिजा बाहेर काढत राहायचे. त्यांच्या गाण्याच्या अनेक ध्वनिफिती गावागावात गाजल्या. त्यांनी मोठा शिष्यवर्ग निर्माण केला. लोकसंगीतात मिळालेला आदर त्यांना कुठल्याही बक्षिसापेक्षा अधिक मोठा वाटला. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. लोकसंगीतातील कार्यासाठी त्यांना १९६६ साली रौप्यपदक व प्रशस्तिपत्र मिळाले. या सोबतच ते सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर राहिले.
अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे कोषाध्यक्षपद त्यांनी सांभाळले. त्यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

संदर्भ : https://vinylworld.in/product/shahir-pandurang-vanmali-chorus-marathi/

समीक्षक : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.