जॉन दि बॅप्टिस्ट, संत : (इ. स. पू. सु. ४ थे शतक — इ. स. सु. २८–३६). ज्यू (यहुदी) प्रेषित, ख्रिस्ती संत आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वप्रथिक. जॉन दि बॅप्टिस्ट हे ‘जुन्या करारा’तील शेवटचे संदेष्टे. मात्र त्यांना ‘जुन्या’ व ‘नव्या करारा’चा दुवा मानले जाते. त्यांचा जन्म पॅलेस्टाईनमधील ज्यूडिया या डोंगराळ प्रदेशात झेकरिआ (जखऱ्या) आणि एलिझाबेथ या दांपत्यापोटी झाला. त्यांच्या जन्माविषयी एक वदंता अशी सांगितली जाते की, जॉन दि बॅप्टिस्ट यांचा जन्म ही दैवी योजना होती. त्यांच्या आईवडिलांचे वय झाले होते. मूलबाळ होण्याची शक्यता टळली होती. दोघेही अतिशय नीतिमान होते. वडील झेकरिआ हे आपल्या यहुदी मंदिरात नियुक्त याजक होते. एक दिवस मंदिरात अगदी वेदीजवळ अतिपवित्र स्थानात धूप जाळण्याचे काम करीत असताना त्यांना परमेश्वराचा दृष्टान्त झाला. देवाचा दूत त्यांच्या पुढ्यात प्रकट झाला आणि म्हणाला, “तुला पुत्र होईल त्याचे नाव तू ‘योहान’ ठेव, आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल” (बायबल, लूक १ : १३, १५). मात्र भांबावलेल्या झेकरिआ यांनी आपण वयातीत झाल्याची शंका उपस्थित केली. त्यामुळे ते देवाच्या कोपास पात्र ठरले. त्याचा परिणाम म्हणून पुत्रजन्म होईपर्यंत त्यांची वाचा गेली.

यथावकाश त्या दांपत्याला मुलगा झाला. ते त्याला परमेश्वराच्या मंदिरात घेऊन गेले. बालकाचे नाव काय ठेवावे म्हणून झेकरिआ यांना विचारले असता त्यांनी बोलता येत नसल्यामुळे धूळपाटी मागवून मुलाचे नाव ‘योहान’ असे अक्षर रेखाटले. तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला; कारण त्या काळच्या प्रथेप्रमाणे वाडवडिलांचे नाव ठेवावे, तर त्यांच्या घराण्यात त्या नावाची कुणीही व्यक्ती नव्हती. त्याच क्षणी झेकरिआ यांची जीभ मोकळी झाली व ते देवाचा गौरव करीत बोलू लागले. त्यामुळे सर्व लोक चकित झाले. यहुदिया प्रांतात सगळीकडे ही बातमी पसरली. त्या वेळी ‘हेरॉड दि ग्रेट’ हा सम्राट राज्य करीत होता.

पुढे योहान देवाच्या कृपेत वाढत गेले. ते देवाचे उपासक बनले. जॉर्डन नदीजवळच्या अरण्यात ते संन्यस्तवृत्तीने राहात असत. उंटाच्या केसाचे वस्त्र पांघरीत असत. टोळ व रानमध खाऊन गुजराण करीत असत. ईश्वरी कोपामुळे लवकरच भयानक उत्पात होणार, अशी त्यांची भविष्यवाणी होती. त्यामुळे मानवजातीचा तारणारा लवकर येत असल्याची व त्यासाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घेण्याची घोषणा ते करीत असे. पाप क्षालनासाठी त्यांनी पाण्याने द्यायच्या बाप्तिस्माविधीचा पुरस्कार केला. यावरून त्यांचे नाव ‘जॉन दि बॅप्टिस्ट’ असे झाले.

योहान बॅप्टिस्टांबद्दलचे वर्णन संदेष्ट्यांनी ‘जुन्या करारा’त केलेले आढळते. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली. ती अशी की, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा; त्याच्या वाटा नीट करा’ (बायबल, यशया ४० : ३). ‘येशू ख्रिस्त यांचा भयानक दिवस येण्यापूर्वी मी प्रवक्ता एलिया यांना तुमच्याकडे पाठवणार आहे’ (बायबल, मलाखी ४ : ५). येशू ख्रिस्त यांच्या आगमनासाठी जनमानसाला सिद्ध करणारा म्हणून योहानांना ‘नवा एलिया’ असे मानले जाते.

जॉन दि बॅप्टिस्ट यांच्याकडून बाप्तिस्मा घेताना येशू ख्रिस्त

योहानांचे संन्यस्त जीवन व त्यांची घोषणा ऐकून यहुदियाच्या सर्व भागांतून लोक त्यांच्याकडे येऊन पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घेऊ लागले. पश्चात्तापाविषयी विचारू लागले. इतरांवर अन्याय न करता, दयाळू व परोपकारी वृत्तीने जीवन जगण्याचा योहान त्यांना संदेश देत असे. त्यांचे परखड बोलणे व वागणे पाहून लोकांना योहान हेच तारणारे आहेत, असे वाटू लागले. तेव्हा योहान ते विधान नाकारून म्हणाले, ‘‘माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे. त्याच्या पायतणाचा बंध सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील’’ (बायबल, मार्क १ : ७-८).

येशू ख्रिस्त यांनीही योहान बॅप्टिस्टांचे मोठेपण मोकळेपणाने मान्य केलेले आढळते. “स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानांपेक्षा मोठा कोणी निघाला नाही” (बायबल, मत्तय ११:११). येशू ख्रिस्त हे देवपुत्र असूनही योहानांकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी आले. त्यांना पाहताच योहान उद्गारले, “हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” (बायबल, योहान १ : २९). योहानांनी येशू ख्रिस्त यांना ओळखून त्यांना बाप्तिस्मा घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा येशू ख्रिस्त म्हटले, “अशाच रीतीने देवाला हवे ते करणे उचित आहे” (बायबल, मत्तय ३ : १५). ते जॉर्डन नदीत उतरून योहानांकडून बाप्तिस्मा घेताच आकाश उघडले. परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरला. त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की,”हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. याच्याविषयी मी संतुष्ट आहे” (बायबल, मत्तय ३ : १६-१७).

योहानांना जनमानसात आदराचे स्थान होते. ते सत्याचा आग्रह धरणारे व परखडपणे बोलणारे संदेष्टे होते. राजा ॲन्टीपस हेरॉडलाही त्यांनी जाहीरपणे फटकारले होते; कारण त्याने आपला भाऊ फिलिप याची बायको राणी हेरोदिया हिला ठेवले होते. ते शास्त्राला धरून नाही, असे योहानांनी राजाला ठणकावून सांगितले. त्यावरून राजाने त्यांना तुरुंगात टाकले. हेरोदिया त्याचा सूड घेऊ पाहात होती; परंतु योहान नीतिमान असल्याने राजा त्यांचा घात करायला धजत नव्हता. पुढे राजाच्या वाढदिवसाच्या मेजवानीच्या वेळी हेरोदियाच्या मुलीने – सालोमीने – नृत्य करून राजाला प्रसन्न केले. तेव्हा त्याने आपल्या अर्ध्या राज्यापर्यंत काहीही मागावयास तिला सांगितले. तिने आपल्या आईशी मसलत करून कैदेत असलेल्या योहान बॅप्टिस्टांचे शिर मागितले. राजाने शिपाई पाठवून त्यांचा शिरच्छेद करविला व ते शिर तबकात घालून तिला दिले. नंतर योहानांच्या शिष्यांनी सन्मानाने त्यांचे दफनविधी केले.

नाताळ (ख्रिस्मस) व ईस्टर या सणांप्रमाणेच जगभर कॅथलिक समाजात संत जॉन (योहान) दि बॅप्टिस्ट यांचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

संदर्भ :

  • कोरिया, फादर फ्रान्सिस, सुवार्ता, वसई, २०२१.
  • दहिवाडकर, अनिल, बायबल देवाचा पवित्र शब्द, पुणे, २०१२.
  • दिब्रिटो, फादर फ्रान्सिस, सुबोध बायबल, पुणे, २०१०.
  • परेरा, स्टीफन आय., संपा., कॅथॉलिक, त्रैमासिक, जून २००४.
  • https://www.catholic.org/saints/saint.php?saint_id=152

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया