अरनादन भाषा ही द्राविडी भाषासमूहातील एक बोलीभाषा आहे. भारताच्या केरळ राज्यामधील मलप्पुरम जिल्ह्यातील अरनादन जमातीची ही बोली आहे. अरनादन जमात एरनाड तालुक्यातील मूळ रहिवासी असल्यामुळे त्यांना एरनादन असेही म्हणतात. या प्रदेशवाचक नावावरून भाषेला एरनाडन भाषा हे नाव पडले आहे. एरनाडन समाज प्रामुख्याने तिथल्या निलांबूर आणि कारुलाई वनक्षेत्रात विशेषतः वळ्ळिक्कडावू आणि एडक्कारा सारख्या भागात केंद्रित आहे. या भाषेची नोंद अतिशय धोक्यात असलेल्या (Critically endangered) भाषांमध्ये होते.
अरनादन भाषा मलयाळम्, तमिळ आणि तुळु या भाषांचे मिश्रण असल्याचे अभ्यासक सांगतात. अरनादन भाषेला मलयाळमची बोली म्हणता येईल, असे अभ्यासकांमध्ये एक मत आढळते. त्यामुळे ‘मल्याळमॉइड’ (Malayalamoid) या – म्हणजे मलयाळमच्या बोलीभाषांच्या – गटात ती समाविष्ट केली गेली आहे. कन्नडचाही प्रभाव तिच्यावर दिसून येतो. इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या अंदाजे २८३ होती. ‘कीर्तड्स’ (KIRTADS) या संस्थांच्या अलीकडील अंदाज आणि सर्वेक्षणांनुसार ही संख्या ३०० पेक्षा कमी आहे. जिथे ती प्रचारात आहे, तिथे केवळ २०० अस्खलित भाषक आहेत.
एरनाडन जमात मूळची शिकारी, गुहांमध्ये वास्तव्य करणारी व वनोपजीवी असल्याने तिचा मूळ शब्दसंग्रह मुख्यत: निसर्ग, शिकार व वनसंपत्ती यांच्याविषयीचा आहे. परंपरेने या समुदायाला ‘कीज्जाती’ (कनिष्ठ जात) असे संबोधले गेले होते. अलिकडे शिक्षणप्रसार आणि बदलत्या जीवनशैलीमुळे त्यामध्ये फरक पडला आहे. मात्र या ऐतिहासिक परिस्थितीमुळे अरनादन बोलीविषयी तरुणांच्या मनात न्यूनगंड आढळतो. अस्थिर, वन्य जीवनामुळे त्यांच्यात सामाजिक संस्था फारशा दृढमूल झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळेही त्यांच्यात बोली वा संस्कृतीविषयी तितकीशी जागरूकता नाही, असे अभ्यासक सांगतात. नागरी जीवनाच्या स्वीकारासोबत, संबंधित अनेक घटकांसाठीचे रूढ मलयाळम् शब्द त्यांच्या बोलीत मिसळले आहेत. अनेकांनी तर मलयाळमचाच स्वीकार केला आहे. त्यामुळे आधुनिक काळात या भाषेच्या वापरात घट झाली आहे. तसेच तिचे स्वतंत्र अस्तित्वही धोक्यात आले आहे.
अरनादन भाषा आपल्या शेजारील भाषांच्या ध्वनिव्यवस्थेशी (Phonology) जुळवून घेतानाच ‘आदि’ (Proto) द्राविड वैशिष्ट्ये जपून ठेवताना दिसते. भाषेची वाक्यरचना ही ‘कर्ता-कर्म-क्रियापद’ (SOV) अशा स्वरूपाची आहे. लिंग, वचन आणि विभक्तीचे नियम द्राविड व्याकरण पद्धतीला अनुसरून आहेत.
ध्वनिव्यवस्थेतील फरक :
अरनादन भाषा मलयाळमशी अनेक पातळ्यांवर साम्य दाखवणारी आहे. स्वरांचे अनुनासिकीकरण हे या भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. स्वरांच्या उच्चारणामधील अनुनासिकता आणि शब्दांचा शेवट मलयाळमप्रमाणे ‘आ’ (a) या स्वराऐवजी, कन्नडप्रमाणे ‘ए’ (e) या स्वराने करण्याची प्रवृत्ती ही या भाषेची ओळख पटवून देणारी खूण आहे.
ध्वनिव्यवस्थेतील फरक दर्शविणारा तक्ता
| वैशिष्ट्य | मलयाळम् | कन्नड | अरनादन | अर्थ |
| अनुनासिकता | ñān | nānu | ñã | मी |
| शब्दांतीचा स्वर | tala | tale | talē | डोके |
| āma | āme | āme | कासव | |
| ‘व‘ चा ‘ब‘ होणे (v > b) | cevi | kivi | cebi | कान |
| ‘ळ’ चा ‘य / ज’ होणे (ḻ > y/j) | kōḻi | kōḷi | kōyi | कोंबडी |
| puḻa | hole | puye / puje | नदी |
वचन बदलण्याचे नियम :
अरनादनमधील एक व्याकरणिक नियम म्हणजे ‘-कळ’ (-kaḷ) या अनेकवचनी प्रत्ययाचा मर्यादित वापर. मलयाळममध्ये, ‘-कळ’ सर्व गोष्टींसाठी वापरला जातो. उदा., ‘मरम’ (झाड) – ‘मरंङळ’ (झाडे). अरनादनमध्ये, ‘-कळ’ फक्त सजीव प्राण्यांसाठी (मानव/प्राणी) वापरला जातो. निर्जीव वस्तूंसाठी, त्या प्रत्ययाऐवजी ‘कुरे’ (kuṟe – अनेक) हे विशेषण वापरतात. उदा. ‘कुरे मरम’ (अनेक झाडे).
सर्वनाम : सर्वनाम व्यवस्था तीन प्रमुख दाक्षिणात्य भाषांमधील एक दुवा स्पष्टपणे दर्शवते :
- मी : ñã (मलयाळम् ‘ñān’ च्या सर्वात जवळ, पण अनुनासिक).
- तो : avaanu (मलयाळम् ‘avan’ पेक्षा कन्नड ‘avanu’ च्या अधिक जवळ).
- ते : ayinu (मलयाळम् ‘atu’ च्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण रूप).
नातेसंबंधविषयक शब्द :
अरनादन मधील नातेसंबंधवाचक संज्ञांचा अलीकडे प्रमाण मलयाळम्कडे झुकणारा कल दिसून आला आहे. दस्तऐवजीकरण केलेली जुनी ‘आदि’ रूपे आता वापरात दिसत नाहीत. काही रूपांमधील वैशिष्ट्यपूर्ण ‘या’ हा ध्वनी आता आढळत नाही.
- वडील: याप्पेन (yaappen – पारंपारिक) > अप्पन (appan – आधुनिक/ मलयाळम् प्रभाव)
- आई: याम्मे (yaamme – पारंपारिक) > अम्मा (amma – आधुनिक/ मलयाळम् प्रभाव)
- मोठी बहीण: आक्की (aakki – विशिष्ट आदिवासी संज्ञा)
- मुसळ: उलाक्के (ulaakke – मध्यवर्ती दीर्घ स्वर आणि ‘e’ अंत)
अरनादन भाषेला स्वतःची अशी लिपी वा प्राचीन लिखित साहित्यिक परंपराही नाही. ती मलयाळम् किंवा पोन्नानी लिपी (अरबी- मलयाळम्) वापरून लिहिली जाते. पण तिची मौखिक परंपरा समृद्ध असून त्यात लोककथा, गाणी आणि जमातीची पारंपरिक माहिती जपली गेली आहे. ही एका खूप छोट्या समूहाची बोली असल्याने तिच्यात उप-बोलींचा अभाव आहे. काळाच्या ओघात अस्तंगत होण्याचा धोका असलेल्या अरनादन भाषेचे दस्तऐवजीकरण करून ठेवण्याचे प्रयत्न अभ्यासक करीत आहेत. कीर्तड्स (KIRTADS)‘ केरळ इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट स्टडीज ऑफ शेड्युल्ड कास्ट्स अँड शेड्युल्ड ट्राईब्स’ व ‘केंद्रीय भारतीय भाषा संस्थान’ (CIIL) या संस्था अरनादन भाषेच्या संदर्भात काम करीत आहेत.
संदर्भ :
- कीर्तड्स (KIRTADS), https://kirtads.kerala.gov.in/?page_id=417&lang=en, Retrieved 21Jan. 2026.
- केंद्रीय भारतीय भाषा संस्थान (CIIL), https://sanchika.ciil.org/communities/8658e0d2-d0ee-441d-8392-5940c7e00440, Retrieved 21Jan. 2026.
- Kakkoth, Seetha, Demographic Profile of an Autochthonus Tribe: The Aranadan of Kerala, Anthropology, Vol.6, Issue 3, 2004.,(Online, Retrieved 21Jan. 2026.)
- Robert Sam, Linguistic and Cultural Shifts of the Aranadan Tribe. https://www.researchgate.net/publication/348747413_Linguistic_and_Cultural_Shifts_of_the_Aranadan_Tribe_in_Kerala, 2021, Retrieved 21 2026.
- Ravi Sankar S. Nair, Tribal languages of Kerala, https://www.languageinindia.com/july2013/ravisankarkeralatriballanguages.pdf, Retrieved 21 2026.
समीक्षक : विद्यागौरी टिळक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.