अणुकेंद्रकीय प्रारणे आणि उच्च ऊर्जेचे कण (high energy particles) यांचे मार्ग आणि परस्परक्रिया नोंदविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र. या तंत्रातील पायस सामान्य छायाचित्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या पायसापेक्षा अधिक जाड, अधिक संवेदनशील आणि सूक्ष्म कण संरचनेची असते. यात प्रामुख्याने सिल्व्हर हॅलाइडचे (silver halide) सु. ०.१ ते ०.३ मायक्रॉन व्यास असलेले सूक्ष्म कण जिलेटीन माध्यमात समसमान पसरलेले असतात.

अणुकेंद्रीय छायाचित्रण पायस तंत्राचा विकास विसाव्या शतकाच्या मध्यकाळात अणुकेंद्रकीय भौतिकीच्या प्रगतीसोबत झाला. विश्वकिरणे (cosmic rays) आणि किरणोत्सारी कणांचा अभ्यास करताना दृश्य स्वरूपात कणांचे मार्ग पाहण्याच्या गरजेतून या पायसाचा वापर सुरू झाला. विद्युतभारित कण पायसमधून जाताना सूक्ष्म रासायनिक बदल घडवून आणतात, असे या तंत्रामध्ये गृहित धरले जाते. जेव्हा एखादा विद्युतभारित कण पायसमधून जातो, तेव्हा तो आपल्या मार्गावर आयनीकरण (ionization) घडवतो. या आयनीकरणामुळे पायसमधील विशिष्ट ठिकाणी अप्रकट प्रतिमा (latent image) तयार होते. रासायनिक प्रक्रियेनंतर ही अप्रकट प्रतिमा दृश्यमान काळ्या रेषेच्या स्वरूपात दिसू लागते, त्याला कणांचा मार्ग असे म्हणतात. भारतीय भौतिकीविज्ञ माम्बिलिकाल्थ‍िल मेनन यांनीही या मूलकणांचा अभ्यास करण्याकरिता या तंत्राचा वापर केला.

किरणोत्सारी स्रोताजवळ अणुकेंद्रीय छायाचित्रण पायस ठेवले असता त्यातून उत्सर्जित होणारे आल्फा कण (alpha particles) किंवा बीटा कण (beta particles) पायसमधून जातात. विकसित केल्यानंतर या कणांचे मार्ग सूक्ष्मदर्शकाखाली सरळ किंवा वक्र रेषांच्या स्वरूपात दिसतात. या मार्गांच्या लांबी आणि जाडीवरून कणांचा प्रकार, ऊर्जा आणि विद्युतभार यांचा अंदाज करता येतो. पाईऑन (pion) आणि इतर अवअणुकणांचा (subatomic particles) शोध या तंत्रामुळे शक्य झाला. तसेच विश्वकिरणांमधील कणांचे वर्तन समजून घेण्यासाठी या पायसाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.

या तंत्रात कणांचे निरीक्षण करण्यासाठी पायस विकसित करावी लागते, त्यामुळे तात्काळ परिणाम मिळत नाहीत. तसेच प्रत्येक कणाचा मार्ग सूक्ष्मदर्शकाखाली हाताने विश्लेषित करावा लागतो, त्यासाठी वेळ आणि कौशल्य आवश्यक असते. आधुनिक इलेक्ट्रॉनिक कण शोधक (particle detectors) उपलब्ध झाल्यानंतर या पायस तंत्राचा वापर तुलनेने कमी झाला आहे.

अणुकेंद्रकीय भौतिकीच्या प्रारंभिक विकासात कणांचे प्रत्यक्ष मार्ग पाहण्याची संधी या तंत्राने दिली. त्यामुळे कणभौतिकीच्या (particle physics) संकल्पनात्मक प्रगतीत या तंत्राने मोलाची भूमिका बजावली आहे.

संदर्भ :

  • Evans, Robley D., The Atomic Nucleus, Tata McGraw-Hill Publishing Company Limited, 1955.
  • Krane, Kenneth S., Introductory Nuclear Physics, John wlley & sons, 1988.
  • Powell, C. F. , Fowler, P. H., Perkins, D. H., The study of elementary particles by the photographic method : an account of the principal techniques and discoveries, London ; New York : Pergamon Press, 1959.

समीक्षक-संपादक : स्नेहा दिलीप खोब्रागडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply