ब्रझील, सिंथिया : (१५ नोव्हेंबर १९६७). अमेरिकन कृत्रिम बुद्ध‍िमत्ता व रोबोटिक्स शास्त्रज्ञ आणि उद्योजिका. त्या सामाजिक रोबोटिक्स आणि मानव-रोबोट परस्परसंवादाच्या प्रणेत्या आहेत.

ब्रझील यांचा जन्म न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्क येथे झाला. त्यांनी सँता बार्बरा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली (१९८९). त्यानंतर त्यांनी एमआयटीमध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञानाचा अभ्यास केला आणि पदव्युत्तर पदवी मिळवली (१९९३). पी.एचडी. पदवीसाठी काम करत असताना त्यांनी कॉग नावाचा लहान मुलासारखाच शारीरिक क्षमता असलेला रोबोट विकसित करण्यास सुद्धा मदत केली (२०००). पीएच.डी. मिळवल्यानंतर त्या एमआयटीमध्ये मीडिया आर्ट्स अँड सायन्सेस मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या आणि सध्या त्या तेथेच कार्यरत आहेत. त्या मीडिया लॅबच्या सहसंचालक आणि पर्सनल रोबोट्स ग्रुपच्या संस्थापिका आणि संचालिक होत्या. त्यांनी ‘लिओनार्डो’ नावाचा एक केसाळ रोबोट सह-निर्मित केला (२००२). लिओनार्डो चेहरे ओळखतो, भाव बदलतो आणि स्पर्शाला प्रतिक्रिया देतो. ब्रझील या विशिष्ट उद्देशांसाठी बनविलेल्या रोबोट्सच्या विकासाचे देखील पर्यवेक्षण करतात. उदा.,  ऑटोम लोकांना त्यांच्या आहार आणि व्यायामात ट्रॅकवर राहण्यास मदत करण्यासाठी सज्ज आहे. तर टेडी बेअरसारखे दिसणारे हग्गेबल डॉक्टर आणि परिचारिकांना मुलांशी संवाद साधण्यास मदत करतात. यांत्रव हालचाली करणारी यंत्रे तर यंत्रमानव म्हणजे मानवसादृश यांत्रव उर्फ रोबॉट्स. रोबॉट्स हा झेक शब्द असून त्याचा अर्थ वेठबिगार मजूर किंवा गुलाम असा आहे.

ब्रझील यांची वैयक्तिक आणि दैनंदिन कामकाजासाठी रोबोट उपलब्ध करून देण्याची संकल्पना होती. त्यांनी ग्राहकांना विशेषतः कुटुंबांना रोबोटची ओळख करून देण्यासाठी जिबो ही रोबोटिक्स कंपनीची सह-स्थापना केली (२०१२). त्या तेथे मुख्य शास्त्रज्ञ म्हणूनही होत्या. कंपनीने जिबोची उंची सु. १२-इंच (३०-सेंटीमीटर) ठेवून टेबल किंवा दुकानात माल देण्याचे व पैसे घेण्याचे व्यवहार करण्याचे लांब मेजवर ठेवण्यासाठी आरेखित केले. त्यात दंडगोलाकार शरीरावर एक गोल स्पर्शपटल चेहरा होता. संभाषण सुरू करणे, प्रश्नांची उत्तरे देणे, झोपण्याच्या वेळेच्या कथा वाचणे, रात्रीच्या जेवणाच्या सूचना देणे आणि भेटीचा मागोवा ठेवणे यांसारखी कामे पूर्ण करण्यासाठी जिबो मानवीकृत आवाजाचा वापर करतो.

ब्रझील यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी पहिल्या वर्षानंतर झेरॉक्स कंपनीच्या एका शाखेत नोकरीसुद्धा केली. त्या काळात या क्षेत्रात फक्त झेरॉक्स कंपनीच काम करीत होती. त्या कंपनीत पडेल ते काम त्या करायच्याच. कामाची वेळ होऊनही थांबून जास्तीचे कामही त्या करीत असत. या काळात त्यांना सूक्ष्मचकती आरेखन करण्याची संधी मिळाली. एका सूक्ष्मसंग्राहक चकतीचे (मायक्रोचिप) परीक्षण करताना ही चकती नीट बनवलेली गेली नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यावर चकतीतील दोष शोधून काढला. नॅनो तंत्रज्ञान, अतिसूक्ष्म रचना यांचा वापर सुरू झाला आणि मोबॉट्स निर्माण झाले. मोबाईल रोबॉट्स अर्थात स्वयंप्रेरणेने हालचाली करणारी यंत्रे. यांच्या निर्मिती आणि विकासात ब्रझील यांचा खूप मोठा हातभार लागला.

ब्रझील यांच्या संशोधनाला दिशा देण्याचे काम ‘ए.आय.’ या चित्रपटाने केले. त्यांच्या संशोधनाची पुढीलप्रमाणे दोन वैशिष्ट्ये आहेत : पहिले म्हणजे त्यांनी आघाडीच्या मासा हिरोमोरी या जपानी यंत्रमानव तज्ञाचा सल्ला घेतला. त्यांच्या मते माणसासारख्या दिसणाऱ्या यंत्रमानवापेक्षा मोठ्या डोळ्यांचे, निष्पाप चेहऱ्याचे टेडी बेअर यासारखे यांत्रव लोकांना जास्त भावतात आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हॉलीवुडमधील ‘स्टॅन विन्स्टन स्टुडीओजच्या स्टॅन विन्स्टन यांच्याशी केलेली हातमिळवणी हे होय. आता त्या त्यांच्या यंत्रमानवांना बुद्धिमत्ता पुरवण्याच्या प्रयत्नात आहेत.

ब्रझील यांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी लिहलेली काही पुस्तके पुढीलप्रमाणे : डिझाइनिंग सोशिएबल रोबोट्स (२००२), सहलेखक – बायोलॉजिकलली इंस्पायर्ड इंटेलिजेंट रोबोट्स (२००३) इत्यादी.

कळीचे शब्द : #यंत्रमानव #चेंगीझ #ऑटोम #हग्गेबल

संदर्भ :

समीक्षक : अ. पां. देशपांडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.