बेल, फ्लॉरेन्स : (१ मे १९१३ — २३ नोव्हेंबर २०००). ब्रिटीश महिला जीवशास्त्रज्ञ. डीएनए संरचनेच्या शोधात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

बेल यांचा जन्म लंडनमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी केंब्रिज येथील गर्टन महाविद्यालयात निसर्गशास्त्राचा अभ्यास केला (१९३२-३५). त्यानंतर त्यांनी काही काळ लॉरेन्स ब्रॅग यांच्यासह काम केले (१९३६). लीड्स विद्यापीठात विल्यम ॲस्टबरीया या पदार्थवैज्ञानिकांची संशोधन साहाय्यक म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली (१९३७). ‘जेलीफिश, शार्कचे पाख (फिन्स) आणि मानवी केस यांच्या मूलभूत संरचनेचा क्ष-किरण अभ्यास’ हा विषय संशोधनासाठी निवडून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली (1939) त्यांनी नैसर्गिक तंतूंची मूलभूत संरचना शोधण्यासाठी क्ष-किरणांचा अभ्यास करता येतो, हे विषद केले. तंतूंच्या संरचनेला त्यांनी थायमोन्यूक्ल‍िइक आम्ल (आताचे डीऑक्सिरिबोज न्यूक्ल‍िइक आम्ल)’ नाव दिले.

बेल यांनी लोकर आणि इतर प्राणिजन्य धाग्यांची संरचना शोधून काढण्यावर संशोधन केले. लोकरीच्या धाग्यातील संरचना ही रेणवीय शृंखलेसारखी असते. ॲमिनो आम्लांच्या छोट्या रेणूंनी ही साखळी तयार होते. ही साखळी ताणता येते किंवा दाब देऊन छोटीही करता येते, असे त्यांनी संशोधन केले. या संशोधनामुळे जीवशास्त्राच्या रेणवीय अभ्यासाचा पाया घातला गेला. परंतु त्यांचे हे संशोधन दुर्लक्षित राहिले. त्याकाळात क्ष-किरण छायाचित्रण प्रगत नव्हते. अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी संशोधन केले. ॲस्टबरींनी डीएनएचे प्राथमिक स्वरूप स्पष्ट करणारा शोधनिबंध लिहिला. याचा जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रीक यांना संशोधनासाठी खूप उपयोग झाला.

बेल यांनी वापरलेली पद्धत डीनए रेणूंच्या अभ्यासासाठी सर्रास वापरली जाते. त्यांना पुढे सक्तीने लष्करात भरती करून घेण्यात आले (१९४१). हवाई दलातील त्यांचे सॉयर नावाच्या अमेरिकन सैनिकाशी लग्न झाले. अमेरिकेला गेल्यावर त्यांनी एका रासायनिक कारखान्यात औद्योगिक रसायनशास्त्रज्ञ म्हणून नोकरीही पत्करली. त्यांचा नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात डीएनएच्या संरचनेचे वर्णन पेनीजचा ढीग असे केले होते. त्यांच्या जीवनावर फोटो फिफ्टीवन’ हे नाटक लिहिले गेले.

बेल यांचे हेअरफोर्ड येथे निधन झाले. .

कळीचे शब्द : #क्ष-किरण #डीऑक्सिरिबोज न्यूक्लिइक आम्ल

संदर्भ :

समीक्षक : अ. पां. देशपांडे,


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.