विआझोव्स्का, मारीना : (२ डिसेंबर १९८४). युक्रेनियन गणितज्ञ. आठ मितींमध्ये गोल-आवेष्टण समस्येचे निराकरण केल्याबद्दल आणि फूर्ये विश्लेषणातील संबंधित चरम समस्या व अंतर्वेशन समस्यांमधील योगदानासाठी त्यांना  २०२२ मध्ये फील्ड पदकाने सन्मानित करण्यात आले.

विआझोव्स्का यांचा जन्म युक्रेनमधील कीव्ह शहरात झाला. त्यांना बालवयापासून गणिताची आवड होती. गणितातील गती बघून त्यांच्या वडिलांनी त्यांना कीव्ह नॅचरल सायन्स लायासिअम नंबर १४५ या संस्थेत दाखल केले. तेथील गणिताचे शिक्षक आंद्रिल कन्याझुइक त्यांच्या प्रोत्साहनामुळेच त्यांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या गणित-ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला. त्यांनी कीव्ह राष्ट्रीय विद्यापीठातून गणितातील पदवी (२००५) आणि काइझर्स्लाउर्ट्न विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (२००७) संपादन केल्यात. पुढे त्या डॉन झागिअर यांच्या मार्गदर्शनाखाली एकमापांकी रूप या विषयावर माक्स प्लांक इन्स्ट‍िट्यूट फॉर मॅथेमॅटिक्स ग्रॅज्युएट स्कूल येथे पुढील संशोधन करीत होत्या (२००८—१२). त्यांनी बॉन विद्यापीठातून एकमापांकी फल आणि विशेषीकृत चक्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली (२०१३) आणि हंबोल्ट विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल पदावर रुजू झाल्यात. नंतर त्या लोझॅन येथील फेडरल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी येथे रुजू झाल्यात आणि तेथेच काही दिवसांनी पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून अध्यापन करू लागल्यात (२०१८).

विआझोव्स्का यांना आठ मितींच्या उपायांप्रमाणेच गोल-आवेष्टण समस्येचे चोवीस मितींमध्येही एक उपाय सापडला. यापूर्वी ही समस्या फक्त तीन किंवा त्यापेक्षा कमी मितींसाठी सोडविली होती आणि तीन-मितीय आवृत्तीच्या (केप्लर अनुमान) निराकरणामध्ये दीर्घ संगणकीय गणनांचा समावेश होता. याउलट विआझोव्स्काचा आठ आणि चोवीस मितींसाठीचे निष्कर्ष अधिक सोपे आहेत. त्यांनी आपल्या सहकार्यांसह संभाव्य ऊर्जा कमी करण्यासाठी आठ आणि चोवीस मितींमधील गोल-आवेष्टणाचे निष्कर्ष लक्षणीय रीत्या विस्तारित केले (२०१८). तसेच त्यांनी एकमेकांना दूर ढकलणारे अनंत बिंदू आठ आणि चोवीस मितीय अवकाशात ठेवण्याबाबत गणितीय समीकरणही सोडविले (२०१९).

वियाझोव्स्का यांना पुढील मानसन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे : सेलम पुरस्कार (२०१६), क्ले रिसर्च पुरस्कार, शास्त्र रामानुजन पुरस्कार, कॉम्बिनाटोरिक्स प्राईझ (२०१७), न्यूहोरायझन्स इन मॅथेमॅटिक्स पुरस्कार (२०१८), रुथलिटल सँटर प्राईझ इन मॅथेमॅटिक्स (२०१९), इएमएस प्राईझ (२०२०) इत्यादी.

कळीचे शब्द : #फील्ड पदक

संदर्भ :

  • https://simple Wikipedia.org>wiki>Maryna_Viazovska
  • https://ast.wikipedia.org>wiki>Maryna_Viazovska
  • https://mathematicshistory.st.andrews.ac.uk>biographies>VI…

समीक्षक : अ. पां. देशपांडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.