गणिताच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हटला की, फील्ड्स पदकाचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. अनेक विद्यार्थी आणि संशोधक या पुरस्काराबद्दल उत्सुक असतात, कारण हा पुरस्कार गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. मात्र याची परंपरा, इतिहास आणि निवड प्रक्रिया इतर सर्व जागतिक पुरस्कारांपेक्षा वेगळी आहे.
पुरस्काराची थोडक्यात पार्श्वभूमी व इतिहास : फील्ड्स पदकाचा उगम कॅनडातील गणितज्ज्ञ जॉन चार्ल्स फील्ड्स (John Charles Fields) यांच्या प्रेरणेतून झाला. फील्ड्स यांनी त्यांच्या निधीतून गणित क्षेत्रात एक जागतिक पुरस्कार देण्याची व्यवस्था केली मात्र पुरस्कार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुमारे १९३२ मध्ये या पुरस्काराची रूपरेषा निश्चित करण्यात आली आणि पहिले फील्ड्स पदक १९३६ मध्ये प्रदान करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धामुळे काही काळ हा पुरस्कार स्थगित करण्यात आला आणि १९५० नंतर ही परंपरा नियमित झाली. कालांतराने या पुरस्काराचे महत्त्व वाढत गेले आणि आज जागतिक पातळीवर गणितातील हा सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.
पुरस्कार कोणाला दिला जातो : फील्ड्स पदक देतेवेळी एक अत्यंत महत्त्वाची अट पाळली जाते ती म्हणजे, पुरस्काराच्या वर्षी ज्या गणितज्ञाचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असते त्यालाच हा सन्मान दिला जातो. यामागील उद्देश असा की, या वयात अनेक संशोधक त्यांच्या संशोधनाची सुरुवात करतात किंवा त्यांचे संशोधन कार्य मध्यावस्थेत असते; त्यामुळे पुढील संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे. हा पुरस्कार विद्यमान संशोधनातील उत्कृष्ट गणितीय कामगिरीची दखल घेण्यासाठी, तसेच भविष्यातील उल्लेखनीय कार्याची क्षमता असणाऱ्या कामासाठी दिला जातो.
पुरस्काराचे स्वरूप : फील्ड्स पुरस्कारामध्ये प्रामुख्याने “पदक” म्हणजे पारंपरिक अर्थाने धातूच्या नाण्यासारखे गोलाकार सन्मानचिन्ह समाविष्ट असते. यासोबत एक प्रमाणपत्र आणि काही आर्थिक रक्कमही दिली जाते. इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसारखी मोठी आर्थिक रक्कम यात नसली तरीही ह्या पुरस्काराची प्रतिष्ठा ही केवळ संशोधनातील उत्कृष्टतेवर आधारित आहे.
फील्ड्स पदकाची निवड आंतरराष्ट्रीय गणित संघटना (IMU) करते. प्रत्येक चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणितज्ञ परिषदेत (ICM) हा पुरस्कार प्रदान केला जातो. निवड समितीमध्ये जगभरातील विविध गणित शाखांतील तज्ज्ञांचा समावेश असतो. हे तज्ज्ञ शेकडो संशोधन लेख, प्राप्त नामांकने, जागतिक दर्जाचे संशोधन योगदान आणि त्याच्या भावी दिशा यांचा अभ्यास करून अंतिम निवड करतात. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवली जाते आणि अंतिम विजेत्यांची घोषणा पुरस्कार समारंभात होते.
पुरस्कार प्राप्त उल्लेखनीय गणितज्ञ : आत्तापर्यंत अनेक महान गणितज्ञांना फील्ड्स पदक मिळाले असून त्यांनी आधुनिक गणिताची दिशा बदलली आहे. उदाहरणार्थ,
- जे. पी. सेर (१९५५) : समजातिक बीजगणित (Homological Algebra) व बीजगणितीय सांस्थितिकी (Algebraic Topology) ह्या विषयांतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी
- अलेक्झान्डर ग्रोथेनडिक (१९६६) : बीजगणितीय भूमितीतल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी.
- टेरेन्स टाओ (२००६) : आंशिक अवकल समीकरणे (Partial Differential Equations), संवादी विश्लेषण (Harmonic Analysis) या क्षेत्रातील असामान्य कामगिरी.
- मंजुल भार्गव (२०१४) : पूर्ण संख्यांची भूमिती मधील नावीन्यपूर्ण संशोधनासाठी पुरस्कार
- पीटर शॉल्झ (२०१८) : अंक-बीजगणितीय भूमितीत (Arithmetic Algebraic Geometry) महत्त्वपूर्ण संकल्पना विकसित करणारे.
फील्ड्स पदकासंदर्भात खालील काही विशेष बाबींचीही नोंद घेतली पाहिजे :
- मरयम मिर्झाखानी (Maryam Mirzakhani) (२०१४) फील्ड्स पदक मिळवणारी पहिली महिला; रिमान पृष्ठभाग (Reimann Surfaces) व जीओडेसिक प्रवाहातील संशोधनासाठी पुरस्कार.
- मार्यना वियाझोवस्का (Maryna Viazovska) (२०२२) फील्ड्स पदक मिळवणारी दुसरी महिला; फूरिअर विश्लेषणातील विशेष योगदानासाठी पुरस्कार.
- अँड्र्यू वाइल्स (Andrew Wiles) यांना पदक मिळाले नाही पण फेर्माच्या शेवटच्या प्रमेयाच्या पुराव्यामुळे त्यांचा उल्लेख नेहमी होतो.
- एडवर्ड विटन (Edward Witten) (1990) फील्ड्स पदक मिळवणारे पहिले भौतिकशास्त्रज्ञ.
हे विजेते केवळ व्यक्तिगत उत्कृष्टतेचे नव्हे तर आधुनिक गणिताच्या प्रगतीचे प्रतिक आहेत.
६. पदकाची रचना : फील्ड्स पदकाची रचना अत्यंत प्रतिकात्मक आहे. पुढील बाजूस (obverse side) प्राचीन ग्रीक गणितज्ञ आर्किमिडीज यांचा चेहरा व त्यासोबत लॅटिन भाषेतील वाक्य “Transire suum pectus mundoque potiri” कोरलेले आहे, ज्याचा अर्थ – “स्वतःच्या आकलनाच्या पलीकडे जाणे आणि जगावर प्रभुत्व मिळवणे” असा आहे. पदकाच्या मागील बाजूस (reverse side) पुढील वाक्य कोरलेले आहे “Congregati ex toto orbe mathematici ob scripta insignia tribuere” ज्याचा अर्थ “जगभरातून एकत्र आलेल्या गणितज्ञांनी उत्कृष्ट लेखनाबद्दल हे पदक प्रदान केले” असा होतो. पार्श्वभूमीत आर्किमिडीजच्या गोलकाचे (Sphere) दंडगोलामध्ये (Cylinder) अंतःस्थापित असलेले प्रतिरूप दर्शविले आहे.
काही महत्त्वाच्या बातम्या / नोंदी :
- २०१४ मध्ये मरयम मिर्झाखानी (Maryam Mirzakhani) यांना फील्ड्स पदक मिळणे हा ऐतिहासिक क्षण होता, कारण त्या फील्ड्स पदक प्राप्त पहिल्या महिला आणि पहिल्या इराणी संशोधक ठरल्या.
- २००६ मध्ये ग्रिगोरी पेरेल्मन (Grigori Perelman) यांनी पदक स्वीकारण्यास नकार दिला. प्रसिद्ध प्वाँकरे अटकळीची (Poincare Conjecture) सिद्धता दिल्यानंतर त्यांनी कोणताही पुरस्कार स्वीकारण्यास नकार देत जगभरात चर्चेचा विषय बनले.
- भारतीय वंशाचे मंजुल भार्गव (२०१४) व नंतर अक्षय वेंकटेश (२०१८) यांना पदक मिळाल्याने भारतातील तरुण संशोधकांमध्ये गणिताविषयी उत्साह वाढल्याचे सांगितले जाते.
- प्रत्येक चार वर्षांनी जेव्हा ICM परिषद होते, तेव्हा कोणाला पदक मिळणार याविषयी संपूर्ण गणितविश्वात उत्सुकता असते, अगदी नोबेलसारखीच.
निष्कर्ष : फिल्ड्स मेडल हा केवळ एक पुरस्कार नसून, तो गणिताच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचा आणि गणितीय पद्धतींचा गौरव आहे. तरुण संशोधकांना प्रोत्साहन देण्याचा आणि गणिताच्या क्षितिजाचा सातत्याने विस्तार करण्याचा हा प्रयत्न आहे. संशोधनातील निष्ठा, स्वातंत्र्य आणि जिज्ञासेला दिलेला हा मान हे खऱ्या अर्थाने आधुनिक समाजाचे प्रतिक आहे.
संदर्भ :
- Riehm, Carl The Early History of the Fields Medal, Notices of the AMS.
- Tropp, Henry S. The origins and History of the Fields Medal, Historia Mathematica – 3, 1976.
समीक्षण : मराठी विश्वकोश संपादक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
