इजिप्तची राजधानी कैरो येथील एक प्रसिद्ध विद्यापीठ. इस्लामिक शिक्षणाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणारे जगातील सर्वांत प्राचीन आणि सातत्याने कार्यरत असलेल्या
विद्यापीठांपैकी हे एक विद्यापीठ आहे. विशेषतः या विद्यापीठाची सुन्नी इस्लामिक विचारसरणीचे जागतिक केंद्र म्हणून ओळख आहे. ‘मशिदीशी संलग्न मदरसा’ या पारंपरिक संकल्पनेतून विकसित होत आधुनिक, बहुविद्याशाखीय जागतिक विद्यापीठ असा सुमारे १,००० वर्षांचा प्रवास या विद्यापीठाने केला आहे. हे विद्यापीठ इस्लामिक जगतातील बौद्धिक, धार्मिक, सामाजिक व नैतिक नेतृत्वाचे आणि जागतिक स्तरावर धार्मिक संतुलनाचे केंद्र मानले जाते.
इतिहास : अल-अज़हर विद्यापीठाची स्थापना इ. स. ९७० ते इ. स. ९७२ या कालखंडात फातिमी राजवटीत (फातिमीद कॅलिफत) करण्यात आली. परिणामी फातिमी राजवटीच्या राजकीय-धार्मिक धोरणांचा प्रभाव विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर स्पष्टपणे दिसून येतो. फातिमी खलिफा अल-मुइझ लि-दिन अल्लाह यांच्या आदेशानुसार सेनापती जव्हार अल-सिकिली याने कैरो शहरात अल-अज़हर मशीद उभारली. सुरुवातीला ही मशीद केवळ उपासना व धार्मिक शिक्षणाचे केंद्र होती; मात्र कालांतराने ती एक सुसंघटित शैक्षणिक संस्था म्हणून विकसित झाली. ‘अल-अज़हर’ हे नाव प्रेषित मुहंमद पैगंबर यांची कन्या फातिमा-अल्-झहरा यांच्या नावावरून देण्यात आले आहे. ‘अज़हर’ या अरबी शब्दाचा अर्थ ‘तेजस्वी’ किंवा ‘प्रकाशमान’ असा होतो. त्यामुळे हे नाव धार्मिक, तसेच सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत प्रतिकात्मक मानले जाते.
स्थापनेच्या प्रारंभी अल-अज़हर विद्यापीठामध्ये शिया इस्माइली पंथाचे तत्त्वज्ञान, कुराणचे अध्ययन, हदीस, फिकह (इस्लामिक कायदा), अरबी भाषा आणि तर्कशास्त्र यांचे शिक्षण दिले जात असे. इ. स. ११८३ मध्ये सुल्तान सलाद्दीन अयुबिद याने इजिप्तवर नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर अल-अज़हर विद्यापीठाच्या इतिहासात निर्णायक वळण आले. सलाउद्दीन याने शिया इस्माइली प्रभाव कमी करून विद्यापीठाचे सुन्नी इस्लामिक शिक्षणाचे आणि सुन्नी विचारसरणीचे प्रमुख आधारस्तंभ बनल्यामुळे त्याची जागतिक प्रतिष्ठा अधिक दृढ झाली. मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत विद्यापीठाने इस्लामिक शिक्षणाची अखंड परंपरा जपली. राजकीय उलथापालथी, साम्राज्यांचे पतन, वसाहतवादी काळ आणि आधुनिक राष्ट्र-राज्यांचा उदय या सर्व टप्प्यांतून आपली शैक्षणिक ओळख विद्यापीठाने टिकवून ठेवली. इस्लामिक धर्मशास्त्र, नैतिकता, कायदा आणि सामाजिक विचार यांवर अल-अज़हर विद्यापीठाच्या विद्वानांचे योगदान जागतिक पातळीवर मान्यता पावले. हजार वर्षांहून अधिक काळ अखंडपणे कार्यरत असलेली ही संस्था मवाळ इस्लामचा प्रातिनिधिक चेहरा म्हणून जागतिक स्तरावर ओळखला जातो.
क्षेत्रफळ व विस्तार : अल-अज़हर विद्यापीठाचा भौगोलिक विस्तार आणि शैक्षणिक व्याप्ती ही जागतिक महत्त्व आणि सामाजिक प्रभावाचे द्योतक मानले जाते. हे विद्यापीठ केवळ एका शहरापुरते मर्यादित न राहता, काळाच्या ओघात संपूर्ण इजिप्तभर पसरलेली बहुकेंद्रित शैक्षणिक व्यवस्था म्हणून विकसित झाली आहे. विद्यापीठाचा मुख्य व ऐतिहासिक परिसर कैरो शहरातील अल-हुसेन या भागात स्थित आहे. याच परिसरात प्रसिद्ध अल-अज़हर मशीद, पारंपरिक धार्मिक शिक्षणाची केंद्रे, ऐतिहासिक सभागृहे आणि जुनी ग्रंथालये आहेत. हा परिसर धार्मिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. इस्लामिक शिक्षणाच्या परंपरेचे मूळ केंद्र म्हणून हा भाग आजही सक्रीय आहे.
कालांतराने वाढती विद्यार्थीसंख्या आणि आधुनिक विषयांच्या समावेशामुळे विद्यापीठाचा विस्तार कैरोच्या पलीकडे संपूर्ण इजिप्तमध्ये झाला. आज इजिप्तच्या विविध प्रांतांमध्ये विद्यापीठाच्या अनेक उपशाखा, विभागीय कॅम्पस आणि संलग्न महाविद्यालये कार्यरत आहेत. या उपकेंद्रांमध्ये धार्मिक, तसेच आधुनिक विषयांचे शिक्षण दिले जाते. या भौगोलिक विस्तारामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र केवळ शहरी केंद्रांपुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक जाळे म्हणून विकसित झाले आहे.
अल-अज़हर विद्यापीठाच्या विस्ताराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याशी संलग्न असलेली प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची (मद्रसा) विस्तृत यंत्रणा. इजिप्तभर हजारो अल-अज़हर संलग्न शाळा कार्यरत असून त्यांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये धार्मिक शिक्षणासोबतच मूलभूत आधुनिक विषयांचेही अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरापासूनच विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेशी जोडले जाते आणि पुढील उच्च शिक्षणासाठी ते विद्यापीठाशी नैसर्गिकरित्या संलग्न होतात.
स्वरूप आणि रचना : अल-अज़हर विद्यापीठाच्या इतिहासात इ. स. १९६१ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांनी एका विशेष कायद्याद्वारे अल-अज़हर विद्यापीठाचे आधुनिक, बहुविद्याशाखीय विद्यापीठात रूपांतर केले. या कायद्यामुळे अल-अज़हर विद्यापीठाची ओळख केवळ पारंपरिक इस्लामिक शिक्षणापुरती मर्यादित न राहता आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रांपर्यंत विस्तारली. या संरचनात्मक सुधारणेचा मुख्य उद्देश म्हणजे धार्मिक शिक्षण आणि आधुनिक ज्ञान यांचा समन्वय साधणे, तसेच इस्लामिक मूल्यांशी सुसंगत आधुनिक विद्वान निर्माण करणे हा होता. परिणामी, हे विद्यापीठ एकाच वेळी परंपरा जपणारे आणि आधुनिकतेला सामावून घेणारे विद्यापीठ म्हणून उदयास आले.
विभाग : अल-अज़हर विद्यापीठाची शैक्षणिक रचना मुख्यतः पारंपरिक विभाग आणि आधुनिक विभाग या दोन प्रमुख विभागांमध्ये विभागलेली आढळते. ही विभागणी अल-अज़हर विद्यापीठाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.
अ) पारंपरिक विभाग : पारंपरिक विभाग हा अल-अज़हर विद्यापीठाचा मूलाधार आहे. यात इस्लामिक धार्मिक व भाषिक शिक्षणावर भर दिला जातो.
- इस्लामिक धर्मशास्त्र : कुराण, हदीस, तफसीर, अकाइद आणि इस्लामिक तत्त्वज्ञान यांचे सखोल अध्ययन.
- शरिया कायदा : फिकह, इस्लामिक कायदे, न्यायशास्त्र आणि समकालीन कायदेशीर प्रश्नांवरील इस्लामिक दृष्टिकोण.
- अरबी भाषा व साहित्य : व्याकरण, साहित्य, भाषाविज्ञान आणि अरबी सांस्कृतिक परंपरा या तीन प्रमुख विद्याशाखांचा समावेश होतो. या विभागातून धार्मिक विद्वान (उलेमा), न्यायविद, धर्मोपदेशक आणि संशोधक घडविले जातात.
ब) आधुनिक विभाग : इ. स. १९६१ नंतर सुरू झालेला आधुनिक विभाग हा अल-अज़हर विद्यापीठाच्या ज्ञानविस्ताराचे द्योतक आहे. या विभागात समकालीन विज्ञान व व्यावसायिक शिक्षण दिले जाते. आधुनिक विभागात औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय विज्ञान, अभियांत्रिकी, कृषीशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणितशास्त्र इत्यादी प्रमुख शाखा आहेत. या आधुनिक शाखांमध्ये अध्यापन करताना इस्लामिक नैतिक मूल्ये आणि व्यावसायिक आचारसंहिता यांचा समन्वय साधला जातो, ही विद्यापीठाची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे.
महिला शिक्षणाची रचना : अल-अज़हर विद्यापीठाच्या सामाजिक सुधारणांमध्ये महिला शिक्षणाला विशेष स्थान आहे. इ. स. १९६२ मध्ये महिलांसाठी स्वतंत्र विद्याशाखा सुरू करण्यात
आल्या. या शाखांमध्ये धार्मिक, तसेच आधुनिक विषयांचे शिक्षण दिले जाते. महिला महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र प्रशासन, अध्यापन व्यवस्था आणि अभ्यासक्रम राबविले जातात. यामुळे परंपरेचा सन्मान राखत महिलांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा समतोल दृष्टिकोण विद्यापीठाने स्वीकारलेला दिसून येतो.
या विद्यापीठाचे स्वरूप आणि रचना ही परंपरा व आधुनिकता यांच्या समन्वयाचे जीवंत उदाहरण आहे. धार्मिक अधिष्ठान अबाधित ठेवत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणाचा स्वीकार करणे ही विद्यापीठाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. त्यामुळे हे विद्यापीठ केवळ धार्मिक शिक्षण देणारी संस्था नसून जागतिक पातळीवर प्रभाव टाकणारे, बहुविद्याशाखीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.
उद्देश : अल-अज़हर विद्यापीठाचे उद्देश पुढील प्रमाणे :
- इस्लामिक संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार करणे; तसेच अरबी भाषेचा जागतिक स्तरावर विकास घडवून आणणे.
- कुराण, हदीस, शरिया कायदा आणि इस्लामिक तत्त्वज्ञान यांच्या प्रामाणिक आणि प्रस्थापित परंपरेचे संरक्षण करणे.
- धार्मिक ग्रंथांचे शास्त्रीय अध्ययन, त्यांचे भाष्य आणि आधुनिक संदर्भातील अर्थस्पष्टीकरण करून इस्लामिक ज्ञान परंपरेचे सातत्य राखणे.
- अरबी भाषा ही केवळ धार्मिकच नव्हे, तर ती सांस्कृतिक व बौद्धिक वारसा म्हणून जतन व प्रसारित करणे.
- अरबी व्याकरण, साहित्य, भाषाविज्ञान आणि भाषांतर अभ्यास यांच्या माध्यमातून अरबी भाषेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणे.
- धार्मिक सहिष्णुता, शांतता आणि संवाद यांचा प्रसार करणे.
- विविध देशांतील, विविध संस्कृतीतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून इस्लामिक मूल्यांच्या आधारे नैतिक, सामाजिक आणि बौद्धिक नेतृत्व घडवणे.
कार्यपद्धती : अल-अज़हर विद्यापीठाची कार्यपद्धती ही परंपरा आणि आधुनिकता यांच्या संतुलित समन्वयावर आधारित आहे. शिक्षण, संशोधन, प्रशासन आणि सामाजिक मार्गदर्शन या सर्व स्तरांवर ही कार्यपद्धती दिसून येते. शैक्षणिक कार्यपद्धतीच्या दृष्टीने विद्यापीठामध्ये पारंपरिक मदरसा पद्धती आणि आधुनिक विद्यापीठीय शिक्षण प्रणाली यांचा संगम आढळतो. धार्मिक विषयांचे अध्यापन शास्त्रीय ग्रंथांवर आधारित असून आधुनिक विषयांचे अध्यापन समकालीन अभ्यासक्रम, प्रयोगशाळा आणि संशोधन पद्धतींच्या साहाय्याने केले जाते. हे विद्यापीठ जागतिक इस्लामिक शिक्षणाचे केंद्र असल्यामुळे जगातील १०० पेक्षा अधिक देशांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यामुळे बहुसांस्कृतिक वातावरणात शिक्षण देणे, विविध भाषिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल व्यवस्था करणे हेसुद्धा कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग आहे.
प्रशासनात्मक दृष्ट्या विद्यापीठाचे नेतृत्व ‘शेख अल-अज़हर’ किंवा ‘ग्रँड इमाम’ यांच्याकडे असते. ते केवळ विद्यापीठाचे प्रमुख नसून सुन्नी मुस्लिम जगतातील सर्वोच्च धार्मिक नेतृत्व म्हणून त्यांना मान्यता आहे. धार्मिक फतवे, नैतिक मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय इस्लामिक प्रश्नांवर संतुलित भूमिका मांडणे ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते.
अल-अज़हर विद्यापीठाचा उद्देश आणि कार्यपद्धती या इस्लामिक परंपरेच्या जतनासोबतच जागतिक बौद्धिक संवाद साधण्याच्या व्यापक दृष्टिकोणावर आधारित आहेत. त्यामुळे हे विद्यापीठ केवळ शिक्षणसंस्था न राहता धार्मिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक नेतृत्वाचे जागतिक केंद्र म्हणून कार्यरत आहे.
महत्त्व : विद्यापीठाचे महत्त्व पुढील प्रमाणे :
- समतोल आणि विवेकशील इस्लामिक विचारसरणीचा प्रसार करणे; कट्टरतावादी, हिंसक किंवा संकुचित धार्मिक मते यांना शास्त्रीय आणि तर्काधिष्ठित पद्धतीने विरोध करणे; कुराण, हदीस आणि इस्लामिक न्यायशास्त्राच्या सखोल अभ्यासाच्या आधारे समकालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांवर मध्यममार्गी भूमिका मांडणे इत्यादी.
- ख्रिस्ती, यहुदी आणि इतर धर्मीय विद्वानांशी संवाद साधून धार्मिक सहअस्तित्व, परस्पर आदर, मानवी मूल्यांचा पुरस्कार, शांतता, मानवता आणि सहिष्णुता यांचे प्रतिनिधित्व करणे.
- इस्लामिक जगतातील वैचारिक दिशा घडविणे.
- जगातील विविध देशांतील धर्मगुरू, शिक्षक, न्यायवीद आणि समाजनेते अल-अज़हरमध्ये शिक्षण घेतात.
- सामाजिक न्याय, मानवी हक्क, स्त्रियांचे शिक्षण, शांततामय सहअस्तित्व, सामाजिक सलोखा यांसारख्या विषयांवर वेळोवेळी संतुलित आणि जबाबदार भूमिका घेणे.
- धर्म, शिक्षण आणि मानवतावाद यांचा समन्वय साधणे. तसेच धार्मिक परंपरेला आधुनिक विचारांशी जोडत विवेक, सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणे.
- धार्मिक कट्टरतेला विरोध, आंतरधर्मीय संवादाचा पुरस्कार आणि जागतिक शांततेसाठी योगदान देणे.
ग्रंथालय : विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत अल-अज़हर ग्रंथालयाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे ग्रंथालय इस्लामिक जगातील अत्यंत मौल्यवान ग्रंथालयांपैकी एक मानले जाते. येथे सुमारे ७ लाखांहून अधिक हस्तलिखिते, दुर्मिळ ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तऐवज जतन केले आहेत. संशोधन, संदर्भ अध्ययन आणि ग्रंथसंपदा संरक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.
अल-अज़हर विद्यापीठाची धार्मिक सहिष्णुता, बौद्धिक संवाद, परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वयक म्हणून ओळख आहे. त्यामुळे विद्यापीठाचा एका ऐतिहासिक मशिदीपासून सुरू झालेली ही संस्था आज संपूर्ण देशव्यापी शैक्षणिक व्यवस्थेत रूपांतरित झाली आहे. इस्लामिक जगताच्या बौद्धिक वाटचालीचा आरसा म्हणून हे विद्यापीठ राष्ट्रीय आणि जागतिक शैक्षणिक वारशाचे प्रतीक बनले आहे.
संदर्भ :
- Berkey, J. P., The Formation of Islam : Religion and Society in the Near East, 600 –1800, Cambridge University Press, 2003.
- Encyclopaedia of Islam, Brill, 2002.
- Esposito, J. L., Islam : The Straight Path, Oxford University Press, 2011.
- Hourani, A., A History of the Arab Peoples, Harvard University Press, 1991.
- Lapidus, I. M., A History of Islamic Societies, Cambridge University Press, 2014.
- Voll, J. O., Islam : Continuity and Change in the Modern World, Syracuse University Press, 1994.
- Winter, M., Egyptian Society under Ottoman Rule, 1517–1798, Routledge, 1992.
समीक्षक : कविता साळुंके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.