सिद्धार्थ गौतम बुद्धांनंतर चार हजार वर्षांनी मैत्रेय हा चोवीसावा बुद्ध म्हणून अवतरणार आहे, अशी कल्पना पाली ग्रंथांत आढळते. ‘मैत्रेय’ हा शब्द पालीमधील ‘मेत्ता’ (Mettā) म्हणजे ‘मैत्री’ या शब्दापासून निर्माण झाला असून, तो मैत्रेय बुद्धांच्या करुणाभावाचे प्रतीक मानला आहे.

संस्कृतमध्ये मैत्रेय बुद्ध असा उल्लेख आहे. महायान बौद्ध कालक्रमानुसार सध्या महाभद्रकल्प (Mahābhaddakappa) सुरू असून या कल्पातील ककुसंध, कोणागमन, कश्यप (कस्सप) आणि गौतम बुद्ध यांच्यानंतर मेत्तेय (Metteyya) हे बुद्ध असतील. हे सध्या बोधिसत्त्व (Bodhisatta) रूपात तुषित (Tusita) लोकात वास्तव्य करत असून, योग्य काळाची प्रतीक्षा करत असल्याचा उल्लेख बौद्ध वाङ्मयात आढळतो. शाक्यमुनी गौतम बुद्धांनी सांगितलेला दुःखमुक्तीचा मार्ग (सद्धम्म) संपूर्ण जगातून पूर्णपणे लोप पावेल, त्यावेळेस मैत्रेय बुद्ध मनुष्य व देवलोकातील प्रजेला उपदेश करण्यासाठी येतील असे ‘चक्कवत्ति-सीहनाद सुत्ता’ (Cakkavatti-sīhanāda Sutta) मध्ये म्हटले आहे. विसुद्धिमग्ग’ (Visuddhimagga), ‘अनागतवंस’ (Anāgatavaṃsa) या ग्रंथांनुसार मैत्रेय बुद्धांचा जन्म केतुमती (Ketumatī – सध्याचे वाराणसी) नावाच्या समृद्ध शहरात होईल. त्यांच्या वडिलांचे नाव सुब्रह्मा (Subrahmā) आणि आईचे नाव ब्रह्मवती (Brahmavatī) असणार आहे. प्रव्रजित होण्यापूर्वीचे त्यांचे नाव अजित (Ajita) असेल. त्या काळातील चक्रवर्ती राजा शंख (Saṅkha) त्याच्या राज्याचा आणि सात रत्नांचा त्याग करून मैत्रेय बुद्धांचा अनुयायी होईल. त्यांचाही गौतम बुद्धांसारखाच हजारो शिष्यांचा विशाल भिक्षुसंघ असेल, अशी माहिती सुत्तपिटकातील दीघनिकायातील ‘चक्कवत्ति-सीहनाद सुत्ता’ (Cakkavatti-sīhanāda Sutta) मध्ये आलेली आहे.

भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध संघ हीनयान-थेरवाद (Theravāda) आणि महायान (Mahāyāna) अशा दोन पंथांमध्ये विभागला गेला. थेरवादात ‘अर्हत’पद तर महायानात ‘बोधिसत्त्व’ आदर्श मानला जातो. स्वतःसाठी निर्वाण (निब्बाण) प्राप्त करणे हे एकमेव उद्दिष्ट न ठेवता, सर्व सजीवांना दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणे हे बोधिसत्वांचे कार्य आहे. सर्व सजीवांप्रती असणाऱ्या करुणामय भावनेमुळे चीन, जपान, तिबेट आणि कोरिया यांसारख्या महायान पंथाचा प्रभाव असणाऱ्या देशांमध्ये मैत्रेय बुद्धांना विशेष पूजनीय स्थान दिले जाते. बुद्धवंश, ‘विसुद्धिमग्ग’ (Visuddhimagga), ‘अनागतवंस’ (Anāgatavaṃsa), ‘महावस्तु’, ‘ललितविस्तर’ आणि ‘सद्धर्म पुण्डरिक’ यांसारख्या ग्रंथांमध्ये मैत्रेय बुद्धांची विस्तृत माहिती मिळते.

मैत्रेय  बुद्धांची मूर्ती अत्यंत अलंकृत असते. त्यांच्या डोक्यावर राजेशाही मुकुट, अलंकार, रत्नजडित हार आणि मुखावर स्मित हास्य असते. ते सहसा सिंहासनावर अभयमुद्रेत किंवा प्रलंबपाद आसनात स्थित असतात. विशेषतः ३ ऱ्या शतकातील गांधार कलाशैलीतील ग्रीक-बौद्ध मूर्तींमध्ये हे वैशिष्ट्य दिसून येते.तसेच साधनमाला या ग्रंथात मैत्रेयाच्या प्रतिमेचे व साधनेचे वर्णन आढळते.

संदर्भ :

  • Jones, J.J., The Mahavastu, vol-3, Luzac & Company Ltd, London, 1956.
  • Miniyef, J., Anagatavamsa, Journal of Pali Text Society, London,1886.
  • Sharma, R.C.,Buddhist Art of Mathura, Agam Kala Prakashan, Delhi,1984.
  • Walshe, Maurice.The Long Discourses of the Buddha (Digha Nikaya Translation), Wisdom Publications. Boston.1987.
  • कौसल्यायन,भदन्त आनंद, महावंश (मराठी अनुवाद), नागपूर.
  • स्वामीशास्त्री, द्वारिकादास ,विशुद्धिमग्गो  (हिंदी अनुवाद), बौद्धभारती, वाराणसी, २००२.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                समीक्षक : जाई परांजपे